आयपीएल २०२२ची यशस्वी सांगता झाली. यावर्षी १० टीम्सच्या झालेल्या या जगातील सर्वात मोठ्या टी२० लीगला पाच वर्षानंतर नवा विजेता मिळाला. आयपीएल सुरू करताना जी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली गेलेली ती म्हणजे नवनवे युवा खेळाडू घडवणे. त्याच उद्दिष्टाला साध्य करत या वर्षीदेखील भारतीय क्रिकेटला अनेक नवे हिरे मिळाले. आयपीएलमधील परफॉर्मन्सच्या जोरावर तर सनरायझर्स हैदराबादचा उमरान मलिक आयपीएल संपण्याआधीच टीम इंडियात सामील झाला. तिलक वर्मा, मोहसीन खान त्या टप्प्यावर आहेत की, त्यांना कधीही राष्ट्रीय संघात स्थान दिले जाऊ शकते. मात्र, आयपीएल २०२२ गाजवू शकले असते असे काही खेळाडू, एक संधी मिळवण्यासाठी तरसले. हे युवा खेळाडू पहिल्याच मॅचला प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसतील, असे सर्वांना वाटले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांना एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. अशाच पाच यंगस्टर्सवर आपण नजर टाकूया.
यश धूल
भारतीय क्रिकेटचा उगवता तारा म्हणून ज्याची गेल्या सहा महिन्यात सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे यश धूल. अंडर नाईन्टीन आशिया कप आणि वर्ल्डकप भारताला जिंकून देणारा कर्णधार. आपल्या बॅटिंग स्टाइलने यशने सर्वांना मोहित केले. एशिया कप, वर्ल्डकप दोन्हींमध्ये त्याची स्वतःची कामगिरी टॉप होती. वर्ल्डकपनंतर दिल्लीसाठी त्याने रणजी ट्रॉफी डेब्यू केला आणि आपला खरा दर्जा दाखवला. तीन मॅचमध्ये तीन शतके त्यातही एक द्विशतक. असा त्याचा परफॉर्मन्स होता. त्यानंतर आयपीएल ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सनेच ५० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील केले. वॉर्नर-शॉ अनेकदा उपलब्ध नसल्याने यशला संधी मिळेल असे वाटले. परंतु, रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वातील दिल्ली मॅनेजमेंटने त्याला संपूर्ण सिझन बेंचवर बसवून ठेवले.
राजवर्धन हंगारगेकर
यश धूलप्रमाणेच अंडर नाईन्टीन वर्ल्डकप गाजवलेल्या महाराष्ट्राच्या राजवर्धन हंगारगेकर याच्यावर देखील सर्वांची नजर होती. तेजतर्रार बॉलिंग आणि हार्ड हिटिंग बॅटिंग अशी खुबी असलेला राजवर्धन आयपीएल ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झाला. अंडर नाईंटीन वर्ल्डकपमधील त्याची कामगिरी पाहता अगदी पहिल्या मॅचपासून तो प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसेल असे सर्वांना वाटले. दीपक चहरच्या अनुपस्थितीत तो तसाच स्विंग बॉलिंग करून योगदान देईल अशी आशा सर्वांना होती. मात्र, यापैकी काहीच घडले नाही. सीएसके मॅनेजमेंटने मुकेश चौधरी व सिमरजीत सिंग या राजवर्धनपेक्षा अनुभवी बॉलरवर विश्वास ठेवला. अखेर, त्याला संपूर्ण सिझनमध्ये एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
अर्जुन तेंडुलकर
संपूर्ण आयपीएलमध्ये ज्याच्या नावाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे अर्जुन तेंडुलकर. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेला अर्जुन सलग दुसऱ्या वर्षी मुंबई इंडियन्स संघात खेळत होता. मात्र, दुर्दैवाने मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्याला एकही मॅच खेळण्याची संधी दिली गेली नाही. फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर असलेला अर्जुन सीजनच्या शेवटी डेब्यू करेल अशी शक्यता निर्माण झालेली. मात्र, शेवटी त्याला ती संधी मिळालीच नाही. स्वतः वडील टीम मॅनेजमेंटमध्ये असल्याने, टीका होईल या कारणाने अर्जुनला संधी मिळत नाही का?, असा सवाल अनेक क्रिकेटप्रेमी विचारत आहेत.
अथर्व तायडे
मागील तीन वर्षांपासून विदर्भ क्रिकेट संघासाठी सातत्याने चमकदार कामगिरी करणारा फलंदाज अथर्व तायडे याला या वर्षी आयपीएल लिलावात बोली लागली. पंजाब किंग्सने २० लाखांच्या बेस प्राईसमध्ये त्याला खरेदी केले. टॉप ऑर्डर बॅटर असलेल्या अथर्वला मात्र या संपूर्ण स्पर्धेत संधी मिळाली नाही. पंजाबच्या टॉप ऑर्डरमध्ये मयंक अगरवाल, शिखर धवन, जॉनी बेअरस्टो व भानुका राजपक्षे हे बडे खेळाडू सामील असल्याने, अथर्वला यावर्षी केवळ बदली खेळाडू म्हणूनच मैदानात उतरत आले.
विकी ओस्तवाल
अंडर नाईन्टीन वर्ल्डकपमध्ये भारतीय स्पिन बॉलिंगची धुरा ज्याने सांभाळली तो म्हणजे महाराष्ट्राचा विकी ओस्तवाल. लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग करणाऱ्या विकीने १२ विकेट्ससह भारताच्या विश्वविजयात मोलाचा हातभार लावला. त्यानंतर महाराष्ट्रासाठी रणजी डेब्यू करण्याची संधी देखील त्याला मिळाली. आयपीएल ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने अखेरच्या क्षणी २० लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये त्याला संघात निवडले होते. मात्र, आयपीएल सुरू होण्याच्या काही दिवस आधीच बीसीसीआयने ज्या गोलंदाजांवर, सस्पेक्ट बॉलिंग ॲक्शनसाठी लक्ष असेल, त्या गोलंदाजांची यादी जाहीर केली त्यामध्ये विकीचे नाव होते. याच कारणाने विकीला संपूर्ण सीजनमध्ये बेंचवर बसावे लागले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुढच्या आयपीएलमध्ये सीएसके काय बदल करणार? खूपच मोठीये यादी
एवढं कौतुक झालेल्या राजवर्धनला चेन्नईने बसूनच ठेवलं, का नाही मिळाली संधी?
युझीचा ‘किल्लर’ लूक, टीम इंडियात पुनरागमन करण्याआधी चहलने केली नवी हेयरस्टाईल