भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना याने माजी कर्णधार एमएस धोनी याच्याविषयी मोठे भाष्य केले आहे. रैनाने धोनीला आतापर्यंतचा सर्वात कठीण गोलंदाज म्हटले आहे. या वक्तव्यानंतर ज्यांनी धोनीविरुद्ध गोलंदाजी केली आहे, ते सर्व भारतीय गोलंदाज नक्कीच हैराण होतील. चला तर, रैनाच्या वक्तव्याविषयी जाणून घेऊयात…
माजी फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) याने दावा केला आहे की, त्याने जितक्या गोलंदाजांचा नेट्समध्ये सामना केला आहे, त्यात एमएस धोनी (MS Dhoni) याच्याविरुद्ध खेळणे सर्वात कठीण होते. रैना आणि धोनी दीर्घ काळ भारतीय संघ आणि आयपीएल (IPL) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून खेळले. त्यामुळे दोघांमध्ये क्रिकेटच्या मैदानाबाहेरही एक खास नाते आहे.
धोनीच्या नावावर वनडे सामन्यात फक्त एक विकेट आहे. तसेच, त्याने कसोटीत 96 चेंडू टाकले आहेत. मात्र, त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. कसोटीत धोनीने केवीन पीटरसन याची विकेट जवळपास घेतली होती, परंतु त्याला तिसऱ्या पंचांनी नाबाद ठरवले. या घटनेवरून आजही पीटरसन भारतीय खेळाडूंसोबत सोशल मीडियावर मजेशीर अंदाजात वाद घालत असतो.
अशातच रैनाने खुलासा केला आहे की, धोनी नेट्समध्ये सर्वात खतरनाक गोलंदाज होता. जिओ सिनेमाशी बोलताना, रैनाला विचारण्यात आले की, त्याच्यासाठी कोणत्या गोलंदाजाविरुद्ध खेळणे सर्वात कठीण होते. यावर तो म्हणाला की, “नेट्समध्ये धोनीचा सामना करणे सर्वात कठीण होते.”
रैना म्हणाला की, जर तुम्हाला सीएसकेच्या कर्णधाराने कधी बाद केले, तर तो अनेक दिवस तुमची खिल्ली उडवायचा आणि फिरकीपासून ते मध्यमगतीने चेंडू फेकायचा. रैनाने असेही म्हटले की, जर धोनीला कसोटी सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळायची, तेव्हा तो त्या संधीचा फायदा घ्यायचा. तसेच, तो इंग्लंडमध्ये चेंडू चांगला स्विंगही करायचा.
काय म्हणाला रैना?
“मला वाटते की, मुरलीधरन आणि मलिंग यांचा सामना करणे सर्वात कठीण होते. मात्र, नेट्समध्ये असे एमएस धोनीविषयी वाटायचे. जर त्याने तुम्हाला नेट्समध्ये बाद केले, तर तुम्ही त्याच्यासोबत दीड महिना बसू शकणार नाहीत. कारण, तो इशारे करत राहील आणि आठवण करून देईल की, त्याने तुम्हाला कशाप्रकारे बाद केले होते. तो ऑफ-स्पिन, मीडियम पेस, लेग स्पिन आणि प्रत्येक प्रकारची गोलंदाजी करायचा. नेट्समध्ये तो आपला फ्रंट फूट नो-बॉलही योग्य ठरवायचा. कसोटीत त्याला मिळालेली गोलंदाजीची संधीही त्याने स्वीकारली होती.”
खरं तर, एमएस धोनी याने 15 ऑगस्ट, 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्या या घोषणेच्या काही तासांनंतर रैनानेही क्रिकेटला अलविदा म्हटले होते. विशेष म्हणजे, रैना आयपीएलमधूनही निवृत्त झाला आहे, तर धोनी अजूनही आयपीएल खेळतो. आयपीएल 2024 हंगामात शरारीने साथ दिली, तर खेळणार असल्याचे धोनीने स्पष्ट केले होते. (this cricketer said that ms dhoni is the toughest bowler)
महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण पुण्याचा कुठं! एलिमिनेटर सामन्यात ‘बाप्पा’चा दणदणीत विजय, अद्वयमुळे ‘क्वालिफायर 2’मध्ये एन्ट्री
भारताच्या आयर्लंड दौऱ्याची घोषणा! वनडे विश्वचषकापूर्वी संघ खेळणार महत्वाची मालिका