जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या तेराव्या हंगामाची सर्व फ्रंचायझी जोरदार तयारी करत आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान खेळल्या जाणाऱ्या या लीगच्या १३ व्या हंगामासाठी यावर्षी अनेक संकटांचा सामना करावा लागला.
खरं तर आयपीएलचा तेरावा हंगाम २९ मार्चलाच चालू होणार होता. पण, कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. पण, कोरोनाची स्थिती थोडीफार बदल्याचे दिसताच, बीसीसीआय आयपीएल २०२०च्या आयोजनाच्या तयारीला लागली. अखेर, अनेक खटाटोपांनंतर आयपीएल २०२०चे आयोजन संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये करण्यात आले.
त्यानंतर बीसीसीआयच्या नियोजनानुसार सर्व फ्रंचायझी २१-२२ ऑगस्टपर्यंत युएईला पोहोचले. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम चेन्नई सुपर किंग्सचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. अशात, मिस्टर आयपीएल सुरेश रैना आणि दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली. तर, जेसन रॉय, लसिथ मलिंगा, केन रिचर्डसन अशा परदेशी खेळाडूंनीही काही ना काही कारणामुळे आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे आयपीएलमधून बाहेर पडलेल्या या खेळाडूंच्या आयपीएल फ्रंचायझींना योग्य पर्यायी खेळाडूंचा शोध आहे. याचा आयपीएल २०२०च्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंना चांगलाच फायदा झाल्याचे दिसत आहे. या लेखात, त्या ५ अनसोल्ड खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांना रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून संघात सामील करण्याचा आयपीएल फ्रंचायझी विचार करु शकतात. 5 Unsold Indian Players Of IPL May Play As Replacement Player
तर बघूयात, कोण असतील ते खेळाडू…
यूसुफ पठान
आयपीएलच्या इतिहासात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज यूसुफ पठानचे मोठे नाव राहिले आहे. या अष्टपैलू खेळाडूने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १७४ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३२०४ धावा आणि ४२ विकेट्सची कामगिरी केली आहे. त्याने आपल्या दमदार फलंदाजी प्रदर्शनाच्या आधारावर संघाला कित्येक सामने जिंकू देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
असे असले तरी, आयपीएल २०२०च्या लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. परंतु, आता अनेक खेळाडूंच्या आयपीएलमधून माघार घेण्यामुळे यूसुफचे आयपीएलमध्ये पुनरामन करण्याचे संकेत दिसत आहेत. तो आता ३७ वर्षांचा झाला आहे, तरी त्याच्या प्रदर्शनामध्ये जास्त फरक पडलेला नाही.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात आपल्या राजस्थान रॉयल्स संघाला विजेता बनवण्यात त्याने मोलाचा वाटा दिला होता. या हंगामात तोच संघ त्याला आपल्या ताफ्यात घेण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आयपीएल लिलावात जरी यूसुफ अनसोल्ड राहिला असला, तरी तो यंदा आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
मनोज तिवारी
देशांतर्गत क्रिकेट संघातील बंगाल संघाचा कर्णधार मनोज तिवारीला भारताकडून जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु, त्याने आयपीएलमध्ये आपले प्रदर्शन दाखवत स्वत: एक दमदार खेळाडू असल्याचे सिद्ध केले. तो आतापर्यंत आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, राइजिंग पुणे सुपरजायंट्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघांचा भाग राहिला आहे.
तिवारीने आतापर्यंत ९८ सामन्यांपैकी ८५ डावात फलंदाजी करताना १६९५ धावांची कामगिरी केली आहे. तरीही त्याला यंदाच्या आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने विकत न घेतल्यामुळे तो खूप निराश झाला होता. परंतु, अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे तो कोणत्या ना कोणत्या संघात रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
चेतेश्वर पुजारा
चेतेश्वर पुजारा या भारतीय क्रिकेटपटूला एक दमदार कसोटीपटू म्हणून ओळखले जाते. पण, त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने आतापर्यंत केवळ ५ वनडे सामने खेळले आहेत. तर, टी२० क्रिकेटमध्ये त्याने अजून एकही सामना खेळलेला नाही. पण, २० षटकांच्या आयपीएलमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली होती.
२०१० पासून ते २०१४पर्यंत तो आयपीएलचा भाग होता, दरम्यान त्याने ३० सामन्यातील २२ डावात फलंदाजी करताना एका अर्धशतकाच्या मदतीने ३९० धावा केल्या होत्या. त्याच्या या आकडेवारीवरुन तो टी२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करु शकतो, असे दिसून येते. मात्र, त्याला गेल्या ६ वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
आयपीएल २०२०च्या लिलावातही तो अनसोल्ड राहिला होता. असे असले तरी, यंदा बरेच खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत, म्हणून पुजाराला कोणता ना कोणता तरी आयपीएल संघ आजमावू शकतो.
जलज सक्सेना
देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून आपल्या प्रदर्शनाची छाप पाडणारा खेळाडू म्हणजे जलज सक्सेना. तो सलग ३ वर्षे बीसीसीआयचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू राहिला आहे. काही दिवसांपुर्वी चेन्नई सुपर किंग्स संघातील फिरकीपटू हरभजन सिंगने वैयक्तिक कारणामुळे आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हरभजनच्या जागी सक्सेनाला सीएसकेमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
सक्सेनाचे देशांतर्गत टी२० क्रिकेटमधील प्रदर्शनदेखील उल्लेखनीय राहिले आहे. त्याने देशांतर्गत स्तरावरील टी२० क्रिकेटमध्ये ५४ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ४८ डावात फलंदाजी करत ६३३ धावा आणि ४६ डावात गोलंदाजी करत ४९ विकेट्स चटकावल्या आहेत.
विनय कुमार
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज विनय कुमार आतंरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळला आहे. मात्र, त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने आतापर्यंत भारताकडून ३१ वनडे, ९ टी२० आणि १ कसोटी सामना खेळला आहे. असे असले तरी, त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी दमदार राहिली आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
२०१८ साली तो आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. मात्र, संघाने त्याला पूर्ण हंगामात केवळ २ सामने खेळण्याची संधी दिली. त्यात त्याने २ विकेट्स चटकावल्या. तेव्हापासून तो आयपीएलमध्ये खेळताना दिसला नाही. यंदाच्या आयपीएल लिलावातही तो अनसोल्ड राहिला होता. परंतु, यंदा संघांना दमदार पर्यायी खेळाडूंची गरज आहे आणि त्याच्या आयपीएलमधील आकडेवारीला पाहता, संघ त्याला संधी देऊ शकतात. त्याने आयपीएलमध्ये १०५ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
जर तेव्हा टी-२० क्रिकेट असते तर, हे ५ दिग्गज खेळाडू ठरले असते हिरो
आयपीएलमधील असे ५ मोठे विक्रम जे मोडणे आहे अशक्य
५ अतिशय मोठे विक्रम, जे या आयपीएलमध्ये मोडले जाण्याची आहे दाट शक्यता
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२० बाबत विराट कोहली म्हणतो, मला २०१६ सारखं…
त्याला फटकेबाजी करताना रोखणे केवळ अशक्य, आम्हाला प्लॅनच बदलावा लागणार
मॅक्सवेल संघात असल्याने सर्वोत्तम अष्टपैलूला पंजाब संघात स्थान मिळणे झाले महाकठीण






