---Advertisement---

IND vs ENG: लेकीच्या जन्मानंतर राहुलचं पहिलं कसोटी शतक, पत्नी अथियाची खास पोस्ट!

---Advertisement---

टीम इंडियाच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीत दोन्ही डावांमध्ये चांगली फलंदाजी करत इंग्लंड संघाला मोठ्या धावसंख्येचं आव्हान दिलं आहे. पहिल्या कसोटीत भारताच्या 5 खेळाडूंनी शतक झळकावलं आहे. याशिवाय भारताने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. दुसऱ्या डावात केएल राहुलने (KL Rahul) शानदार फलंदाजी करत शतक झळकावत संघाचा डाव सावरला आहे. या शतकानंतर केएल राहुलच्या पत्नीने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

दुसऱ्या डावात भारताची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. भारताने लवकर 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण सलामीला आलेल्या राहुलने संघाचा डाव एका टोकाकडून सावरला. यानंतर रिषभ पंत आणि केएल राहुलने मोठी भागीदारी रचत भारतीय संघाला 300 धावांच्या आघाडीपर्यंत पोहोचवले. चौथ्या दिवसाचं पहिलं सत्र फलंदाजीसाठी खूप अवघड होतं. पण पंत आणि राहुलने काळजीपूर्वक फलंदाजी करत विकेट्स राखून ठेवले.

राहुल-पंतने त्यानंतर दुसऱ्या सत्रात आक्रमक फटके खेळत आपली अर्धशतके झळकावली. केएल राहुलने पहिल्या डावातही चांगली फलंदाजी केली होती, पण अर्धशतक झळकावण्यात अपयशी ठरला. पण या डावात तो शतक पूर्ण करूनच माघारी परतला. राहुल 247 चेंडूत 18 चौकारांसह 137 धावांची शानदार खेळी करत माघारी परतला. त्याला ब्रायडन कार्सने बोल्ड करत बाद केलं.

केएल राहुलच्या या शतकानंतर त्याची पत्नी अथिया शेट्टीने त्याच्यासाठी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. अथियाने राहुलसाठी एक स्पेशल मेसेजही स्टोरीमध्ये लिहिला. तिने राहुलचा मैदानातील फोटो शेअर करत ही खेळी खूप खास होती, असं कॅप्शन लिहिलं आहे आणि पुढे हार्ट इमोजीदेखील टाकला आहे. केएल राहुल आणि आथिया शेट्टी नुकतेच एका गोंडस मुलीचे आई-बाबा झाले आहेत. इवारा असं त्यांनी आपल्या लेकीचं नाव ठेवलं आहे. लेकीच्या जन्मानंतर राहुलचं हे पहिलं आंतरराष्ट्रीय शतक होतं.

राहुल एक चांगला फलंदाज असला तरी त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कसोटीतून निवृत्तीमुळे तो संघाचा सलामीवीर म्हणून त्याच्या आवडत्या जागी परतला आहे. राहुलचा हॅरी ब्रुकने (Harry Brook) एक झेल सोडला आणि त्याला एक जीवदान मिळालं, पण त्याशिवाय संपूर्ण सामन्यात तो सहज फलंदाजी करत धावा काढताना दिसला. या खेळीसह, राहुलने गावस्कर (Sunil Gavaskar) आणि द्रविडला (Rahul Dravid) मागे टाकलं आहे आणि इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकं करणारा भारतीय सलामीवीर फलंदाज बनला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---