इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला आहे. यासह कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.
या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला होता. परंतु तिसऱ्या कसोटी सामन्यातील एका डावाच्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नावे नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. हे त्याने इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात दाखवून दिले होते. परंतु, तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला डावाने पराभवाचा सामना करावा लागला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा भारतीय संघाला एका डावाने पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी देखील २०१८ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंड संघानेच भारतीय संघाला एक डाव राखून पराभूत केले होते.
लॉर्ड्समध्ये इंग्लंडने १ डाव आणि १५९ धावांनी केले होते पराभूत
लॉर्ड्सच्या मैदानावर २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला १ डाव आणि १५९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव १०७ धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने ३९६ धावा करत डाव घोषित केला होता. यासह इंग्लंड संघाने या सामन्यात २८९ धावांची आघाडी घेतली होती.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला अवघ्या १३० धावा करता आल्या होत्या. त्यावेळी विराटच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदा डावाने पराभूत झाला होता. (This is India’s second defeat by an innings under Virat Kohli’s captaincy)
लीड्स कसोटीत भारतीय संघाचा १ डाव ७६ धावांनी पराभव
या सामन्यातील पहिल्या डावात भारताला ७८ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंड संघाने ४३२ धावा करत ३५४ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवशी मजबूत पकड बनवल्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज चांगली फलंदाजी करतील अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
दिवसाच्या सुरुवातीलाच चेतेश्वर पुजारा ९१ धावा करत माघारी परतला. त्याच्या पाठोपाठ विराट कोहली देखील ५५ धावा करत माघारी परतला. तसेच अजिंक्य रहाणे अवघ्या १० तर रिषभ पंत १ धाव करत स्वस्तात माघारी परतले. शेवटी जडेजाने ३० धावांची झुंज दिली. परंतु, ही झुंज अपयशी ठरली. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २७८ धावांवर संपुष्टात आला. हा सामना इंग्लंड संघाने १ डाव आणि ७६ धावांनी आपल्या नावावर केला. यासह मालिका १-१ च्या बरोबरीत आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! भारताला धोबीपछाड देणारा इंग्लंड संघच सर्वाधिकवेळा डावाने पराभूत, भारत ‘या’ क्रमांकावर
विराटच्या नव्या साथीदाराचा सीपीएलमध्ये पदार्पणातच जलवा, २०० च्या स्ट्राईकरेटने केली अर्धशतकी खेळी
डीआरएसने केला पुजाराचा घात, अवघ्या ९ धावांनी हुकलं कसोटी शतक, पाहा व्हिडिओ