भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही देशांमध्ये लॉर्ड्सवर होत असलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या (Anderson Tendulkar Trophy) तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लंडच्या ‘बॉडीलाइन’ रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसऱ्या दिवशी स्टम्प्सला नाबाद परतलेला रिषभ पंत आणि केएल राहुल (Rishbh Pant & KL Rahul) आरामात खेळत होते. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांना अडचणीत आणण्यासाठी शॉर्ट बॉलपासून स्पिनपर्यंत अनेक डावपेच वापरले.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात एक वेळ अशी आली की, इंग्लंडने विकेट घेण्यासाठी लेग साइडवर तब्बल सात क्षेत्ररक्षक उभे केले. गावस्कर यांच्या मते, इंग्लंडने गोलंदाजीत बॉडीलाइन रणनितीचा अवलंब केला. जरी त्यांनी फारसे बाऊन्सर टाकले नाहीत, तरीही भारताच्या माजी कर्णधाराने इंग्लंडच्या या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. गावस्करांनी बॉडीलाइन (1932-43 च्या अॅशेस मालिका) आणि हॅरोल्ड लारवुडपर्यंत उल्लेख केला आणि आयसीसी पुरुष क्रिकेट समितीचे प्रमुख सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी यात हस्तक्षेप करावा अशी त्यांनी मागणी देखील केली.
सोनी स्पोर्ट्सवरील कॉमेंट्रीदरम्यान गावस्कर म्हणाले, सात खेळाडू लेग साइडला ठेवून इंग्लंडचे गोलंदाज राउंड द विकेट गोलंदाजी करत आहेत. माझ्या मते हे क्रिकेट नाही. हे अगदी बॉडीलाइन सिरीजसारखे आहे.” गावस्कर रागावून म्हणाले, हे अजिबात क्रिकेट नाही. आयसीसी क्रिकेट समितीचे प्रमुख सौरव गांगुली हे ऐकत असतील, तर कृपया खात्री करा की लेग साइडवर केवळ सहाच क्षेत्ररक्षक असावेत.
केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी केली. लंचपूर्वी रिषभ पंत धावबाद झाला. पण त्यापूर्वी या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचे सगळे प्रयत्न निष्फळ केले. इंग्लंडने बॉडीलाइन रणनितीचा आधार घेत 7 क्षेत्ररक्षक लेग साइडवर ठेवून गोलंदाजी सुरु केली.






