आयपीएल २०२१ च्या ५१ व्या सामन्यात मंगळवारी (५ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला. दोन्ही संघांसाठी ‘करा किंवा मरा’ अशा स्थितीतील होता. पण मुंबई संघाने हा सामना एकतर्फी जिंकला. मुंबईने राजस्थानचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयात मुंबई संघाच्या गोलंदाजांची महत्त्वपूर्ण योगदान राहिले. याशिवाय ईशान किशनच्या आक्रमक अर्धशतकीय खेळीने हा सामना नवव्या षटकातच संपला. या पराभवानंतर राजस्थान संघावर एक नामुष्की ओढावली.
आयपीएलमध्ये असे पहिल्यांदाच झाले आहे, जेव्हा एखाद्या संघाने संपूर्ण २० षटके फलंदाजी करून दिलेले लक्ष्य विरुद्ध संघाने केवळ दहा षटकांच्या आत पूर्ण केले. राजस्थान रॉयल्सवर ही नामुष्की आपल्या खराब प्रदर्शनामुळे ओढावली आहे. आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होत आहे.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजानी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाला अवघ्या ९० धावांवर रोखलं. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाने अतिशय खराब फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. राजस्थानकडून सर्वाधिक धावा सलामीवीर एविन लुईसने केल्या, तो २४ धावा करून बाद झाला.
लुईस बाद झाल्यानंतर राजस्थानचा एकही फलंदाजाला मुंबई समोर तग धरू शकला नाही. कर्णधार संजू सॅमसनही फक्त ३ धावा करुन बाद झाला. लुईसशिवाय यशस्वी जयस्वालने १२ धावा केल्या, डेविड मिलरने १५ धावा केल्या, तर राहुल तेवतिया १२ धावा करून बाद झाला. इतर फलंदाज दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. मुंबईकडून उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. नॅथन कुल्टर- नाईलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच जिमी निशमने ३ आणि बुमराहने २ विकेट्स घेतल्या.
मुंबई समोर ९१ धावांचं सोपं लक्ष्य असताना मुंबईचा सलामीवीर कर्णधार रोहितने चांगली सुरुवात केली. पण तो २२ धावांवर बाद झाला, त्याला चेतन सकारियाने बाद केलं. त्यानंतर सूर्यकुमारही १३ धावा करुन बाद झाला. मुस्तफिजूरने त्याची विकेट घेतली. पण सलामीवीर इशान किशन मात्र एका बाजूने तुफानी फलंदाजी करतच राहिला. त्याने अवघ्या २५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार ठोकत ५० धावा केल्या आणि मुंबईला अवघ्या ८.२ षटकांमध्ये विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
अरर! उर्वशी रौतेलाने एकदिवस उशीरा दिल्या पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल
विराट ‘रनमशीन’ असेल तर रोहित ठरतोय भारताचा ‘सिक्सरमशीन’! ४०० वा षटकार मारत केलाय मोठा पराक्रम