गौतम गंभीर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक (Head Coach) झाल्यापासून कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यामुळे त्यांना हटवून नवीन प्रशिक्षक नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू योगराज सिंग (Yograj singh) यांनी बीसीसीआयला एका दिग्गज खेळाडूचे नाव सुचवले आहे, ज्याने भारताला दोन वेळा विश्वचषक जिंकून दिला आहे. विशेष म्हणजे, या दिग्गजाने घडवलेले खेळाडू सध्या भारतीय संघात चमकदार कामगिरी करत आहेत.
माजी अष्टपैलू खेळाडू योगराज सिंग यांनी ‘रवीश बिष्ट’ यांच्या चॅनेलवर बोलताना बीसीसीआयसमोर एक मोठी मागणी ठेवली आहे. त्यांनी युवराज सिंगला (Yuvraj Singh) भारतीय कोचिंग सेटअपमध्ये सामील करून घेण्याचे सुचवले आहे. मात्र, युवराजला नक्की कोणत्या भूमिकेत पाहायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाची तीन महत्त्वाची पदे आहेत. ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे प्रमुख (व्हीव्हीएस लक्ष्मण), टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक (गौतम गंभीर) आणि इंडिया-ए व अंडर-19 संघाचे प्रशिक्षक (सुनील जोशी).
युवराज सिंग सध्या अधिकृत पद नसतानाही अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे. त्याने शुबमन गिल, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या यांसारख्या खेळाडूंना फलंदाजी सुधारण्यास मदत केली आहे. या खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय युवराजला दिले आहे, विशेषतः अभिषेक शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय यशाचे पूर्ण श्रेय युवीला दिले आहे. चाहत्यांनाही युवराज सिंगला भारतीय संघाच्या प्रशिक्षक भूमिकेत पाहायला आवडेल. मात्र, सध्याच्या करारानुसार गौतम गंभीर 2027 पर्यंत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहणार आहेत.




