टी20 विश्वचषक 2026 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाणार आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत भारतीय संघाचे पारडे पाकिस्तानवर जड राहिले आहे. 8 पैकी 7 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत, तर पाकिस्तानी संघाला केवळ एकदाच विजय मिळवता आला आहे. कोलंबोमध्ये हा सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने पाकिस्तानचा एकप्रकारे अपमानच केला आहे. आम्ही असे का म्हणतोय, ते जाणून घेऊया.
आयसीसीशी (ICC) बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले की, “मी या गोष्टीसाठी अभिषेक शर्माच्या नावाचा विचार केला असता, पण त्याची प्रकृती सध्या ठीक नसल्यामुळे मी वरुण चक्रवर्तीचे नाव घेईन. जर बुमराह, अर्शदीप आणि हार्दिकने नवीन चेंडूवर विकेट्स घेतल्या, तर डावाच्या मधल्या षटकांत वरुण पाकिस्तानच्या 2, 3 किंवा 4 फलंदाजांना बाद करू शकतो.” यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाँटिंगने एकाही पाकिस्तानी खेळाडूचे नाव घेतले नाही.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing 11) दोन मोठे बदल पाहायला मिळू शकतात. समोर आलेल्या माहितीनुसार, अभिषेक शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त होऊन या विश्वचषकात पुनरागमन करण्यास सज्ज असेल. तर दुसरीकडे, खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने अर्शदीप सिंगच्या जागी कुलदीप यादवला संघात संधी मिळू शकते. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात सर्वांच्या नजरा अभिषेक शर्मावर असतील. पाक संघाविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट 189 चा आहे, तर सरासरी देखील 36 च्या वर आहे.






