---Advertisement---

इशानने टी२० विश्वचषकात करावी सलामीला फलंदाजी, ‘ही’ आहेत यामागची कारणे

On: मंगळवार, मार्च 16, 2021 12:35 PM
---Advertisement---

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेला दुसरा टी२० सामना युवा भारतीय फलंदाज इशान किशन याने गाजवला. या सामन्याद्वारे २२ वर्षीय इशानने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. याबरोबरच पदार्पणाच्या सामन्यात ताबडतोब अर्धशतक करत इंग्लंडचा धुव्वा उडवला.

सलामीवीर शिखर धवनच्या जागी संधी देण्यात आलेल्या इशानने दुसऱ्या टी२० सामन्यात संघाला दमदार सुरुवात करुन दिली. सलामीला फलंदाजी करत त्याने ३२ चेंडूत ५६ धावा चोपल्या. दरम्यान ४ खणखणीत षटकार आणि ५ चौकार मारले. याबरोबरच कर्णधार विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागिदारीही रचली. त्याच्या या जबरदस्त कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

इशानच्या अफलातून खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १७.५ षटकात इंग्लंडचे १६५ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि ७ विकेट्सने सामना खिशात घातला. यासह टी२० मालिका १-१ ने बरोबरीवरही आणली. त्यामुळे इशानला येत्या टी२० विश्वचषक २०२१ मध्ये संधी मिळण्याच्या अपेक्षा दुणावल्या आहेत.

या लेखात आम्ही इशानला टी२० विश्वचषकात सलामीला का संधी देण्यात यावी?, याचा आढावा घेतला आहे.

चला तर जाणून घेऊया…

१. पावरप्लेचा फायदा घेण्याची क्षमता

इशान हा एक असा फलंदाज आहे, जो पावरप्लेचा (डावातील सुरुवातीची षटके) पुरेपुर फायदा घेण्याची क्षमता राखतो. आक्रमक फटकेबाजी करत वेगाने धावा करण्यासाठी तो ओळखला जातो. आयपीएल, देशांतर्गत क्रिकेट याबरोबरच कारकिर्दीतील पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही त्याने सलामीला फलंदाजी केली आहे. अशात तो संघाला डावाची चांगली सुरुवात करुन देऊ शकतो. जेणेकरुन पुढे संघाला तगडे आव्हान उभारण्यात मदत होईल.

२. एका बाजूने धावांची गती सांभाळणे

इशान सहसा जोवर मैदानावर टिकून राहतो, तोवर ताबडतोब फलंदाजी करताना दिसतो. यामुळे तो मैदानावर असताना धावांची गती कमी होताना दिसत नाही. तो एका बाजूने सातत्याने धावा करत असतो. यामुळे दुसऱ्या बाजूवरील फलंदाजाचा दबाव कमी होतो. सोबतच त्यांच्यात मजबूत भागिदारीही होताना दिसते. दुसऱ्या टी२० सामन्यात इशानने कर्णधार विराटसोबत केलेली भागिदारी याचे ताजे उदाहरण आहे.

३. गोलंदाजांची लाइन लेंथ बिघडवण्याची क्षमता

इशान आपल्या फलंदाजीने जगातील कोणत्याही गोलंदाजाची लाइन लेंथ बिघडवण्याची क्षमता राखतो. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंविरुद्ध खेळण्याची अप्रतिम शैली त्याला अवगत आहे. त्यामुळे तो ताबडतोब मोठी आकडी खेळी करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करु शकतो. याचा फायदा संघातील इतर फलंदाजांना होतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---