भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीवर आहे. आता मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडकडे भारतामध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे. राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात किवी संघाने 7 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यातही न्यूझीलंडने जोरदार टक्कर दिली होती, पण असे असूनही भारताच्या भूमीवर मालिका जिंकण्याचे त्यांचे स्वप्न यंदा अधुरेच राहण्याची शक्यता आहे. शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंडचे हे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही.
इंदूरच्या या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड अतिशय जबरदस्त आहे. भारतीय संघ या मैदानावर आतापर्यंत 7 वनडे सामने खेळला आहे आणि या 7 ही सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. म्हणजेच, होळकर स्टेडियमवर पराभव काय असतो, हे भारतीय संघाला अद्याप ठाऊक नाही.
आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपला हा विजयाचा सिलसिला कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे, जर न्यूझीलंडला पहिल्यांदाच भारतात मालिका जिंकायची असेल, तर त्यांना इंदूरचा हा इतिहास पुसून नवा पराक्रम करावा लागेल.
इंदूरचे होळकर स्टेडियम फलंदाजांसाठी ‘स्वर्ग’ मानले जाते. या खेळपट्टीवर चांगला बाऊन्स असल्यामुळे चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. तसेच, या मैदानाची बाउंड्री छोटी असल्याने येथे चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. याचाच अर्थ भारत आणि न्यूझीलंडमधील या तिसऱ्या सामन्यातही धावांचा डोंगर उभा राहिलेला पाहायला मिळू शकतो. फलंदाजांसाठी ही खेळपट्टी जेवढी सोपी आहे, तेवढेच धावा रोखण्याचे आव्हान गोलंदाजांसमोर असणार आहे.






