ऑगस्ट २०१९ पासून सुरू झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा काही दिवसांपुर्वी शेवट झाला. एजेस बाउल स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. न्यूझीलंडने राखीव दिवशी (२३ जून) ८ विकेट्स राखून सामन्यासह जेतेपदावरही नाव कोरले. परंतु विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाच्या हाती मात्र निराशा आली. भारताच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन याने आपल्या एका कृतीबद्दल क्षमा मागितली आहे.
त्याचे झाले असे की, कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापुर्वी टीम पेनने या ऐतिहासिक सामन्याच्या विजेत्या संघाबद्दल भविष्यवाणी केली होती. “विराट आणि त्याचा संघ न्यूझीलंडला सहज पराभूत करत पहिलीवहिली कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकेल. ते बिनशर्त त्यांचे सर्वोत्कृष्ट देतील,” असे त्याने म्हटले होते. परंतु आता त्याची भविष्यवाणी चुकीची ठरल्याने त्याने सर्वांची क्षमा मागितली आहे.
न्यूजटॉक झेडबीशी बोलताना टीम पेन म्हणाला की, “आपण सर्वजणच कधी-कधी चूकीचे ठरत असतो. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला धूळ चारल्यानंतर न्यूझीलंडच्या चाहत्यांनी मला फैलावर घेतले. त्यामुळे मी विचार केला की, आपण ऑन एयर जाऊन त्यांची क्षमा मागावी. न्यूझीलंड संघाने अंतिम सामन्यात अतिशय दमदार प्रदर्शन केले आहे. त्यांना असे खेळताना पाहणे नेहमीच शानदार असते. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही केले आहे, त्याचा मी सन्मान करतो.”
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात विजेत्या न्यूझीलंड संघातील खेळाडूंनी तिन्ही विभागात लाजवाब कामगिरी केली. पहिल्या डावात न्यूझीलंडचे गोलंदाज भारतीय संघाला केवळ २१७ धावांवर रोखण्यात यशस्वी ठरले. भारताकडून केवळ उपकर्णधार अजिंक्य रहाणे (४९ धावा) आणि कर्णधार विराट कोहली (४४ धावा) ४० पेक्षा जास्त धावा करु शकले. वेगवान गोलंदाज कायल जेमिसनने ५ विकेट्स घेतल्या होत्या.
भारताच्या २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ २४९ धावांवर सर्वबाद झाला आणि त्यांनी नाममात्र ३२ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज केवळ १७० धावांवर गारद झाले आणि न्यूझीलंडला विजयासाठी १३९ धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी नाबाद ९५ धावांची भागिदारी केली. या दमदार भागिदारीच्या जोरावर ४६ षटकांतच न्यूझीलंडने भारताला पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या-
काय शॉट खेळलाय! गोलंदाजाने चेंडू टाकताच फलंदाजाने फिरून मारला रिव्हर्स स्वीप षटकार
संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवलं, तरीही फक्त ५ वनडे सामन्यांवर मानाव लागलं समाधान
एक पराभव अन् कोहलीवर टीकांचा वर्षाव, पण त्याची ‘ही’ कामगिरी भल्याभल्याची बोलती करेल बंद