भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेला आज (७ जानेवारी) सिडनी क्रिकेट मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या अंतिम अकराच्या संघात दोन बदल केले.
ऑस्ट्रेलियाचा नियमित सलामीवीर डेविड वॉर्नर संघात परतल्याने जो बर्न्सला संघातून वगळण्यात आले. तर युवा विल पुकोवस्कीला पदार्पणाची संधी मिळाल्याने डावखुरा फलंदाज ट्रॅविस हेडला संघाबाहेर जावे लागले. कर्णधार टीम पेनने नाणेफेकीच्या वेळी या निर्णयामागचे कारण सांगितले.
संघाचे संतुलन साधणे गरजेचे
संघनिवडीबाबत विचारले असता पेन म्हणाला, “संघात एक अष्टपैलू खेळाडू आल्याने संघाचे संतुलन बदलले आहे. आम्ही आमची सलामीवीरांची जोडी दीर्घ काळासाठी कायम ठेवण्याचा प्रयत्न करू इच्छितो. त्यामुळे या सामन्यासाठी कोणाला ना कोणालातरी संघाबाहेर बसावे लागणार होते. ज्या फलंदाजाची सरासरी ४०च्या आसपास आहे, त्याला आम्ही नक्कीच संघाबाहेर ठेवू शकत नाही. परंतु अशा प्रकारे संघनिवडीची डोकेदुखी असणे, हे संघासाठी सकारात्मक लक्षण आहे. मात्र हो, ट्रॅविस हेड यावेळी दुर्दैवी ठरला.”
ऑस्ट्रेलियाने डेविड वॉर्नर आणि विल पुकोवस्की यांना नियमित सलामीवीर म्हणून सिडनी कसोटीत संधी देण्याचे ठरवले. तर पहिल्या दोन कसोटीत सलामीला फलंदाजी केलेल्या मॅथ्यू वेडला मधल्या फळीत ट्रॅविस हेडच्या जागी संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी केली होती टीका
पहिल्या दोन कसोटी सामन्यातील ट्रॅविस हेडच्या कामगिरीनंतर अनेक माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली होती. माजी दिग्गज फलंदाज इयान चॅपेल म्हणाले होते, “ट्रॅविस हेडने तो कसोटी क्रिकेट खेळू शकतो हे अजिबात सिद्ध नाही केले आहे. वरच्या फळीतील फलंदाज म्हणून तो आपले अस्तित्व सिद्ध करू शकला नाही. मी जर विरोधी संघात असेल, तर त्याला बाद करण्याचे अनेक मार्ग माझ्याकडे उपलब्ध असतील.” याशिवाय ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने देखील हेडवर टीका केली होती. “हेड भविष्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करू शकतो, मात्र आत्ता संघात त्याचे स्थान पक्के नाही”, असे वॉर्न म्हणाला होता.
संबंधित बातम्या:
IND vs AUS : पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; पुकोवस्की-लॅब्यूशानेची अर्धशतकी खेळी
AUS v IND : पुरुषांच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच महिलेने केले अंपायरींग, सिडनीत रचला इतिहास
दहा मिनिटात दोन झेल सोडल्याने रिषभ पंतवर चाहत्यांची आगपाखड, मीम्स व्हायरल