---Advertisement---

IND vs AUS : पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; पुकोवस्की-लॅब्यूशानेची अर्धशतकी खेळी

On: गुरूवार, जानेवारी 7, 2021 1:20 PM
---Advertisement---

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून(७ जानेवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ५५ षटकात २ बाद १६६ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशाने आणि विल पुकोवस्की यांनी अर्धशतके झळकावली आहेत.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. तिसऱ्या सत्रात पुकोवस्की आणि लॅब्यूशानेने सावध सुरुवात केली. मात्र तिसऱ्या सत्रातील चौथ्याच षटकात पुकोवस्कीला भारताकडून पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीने पायचीत केले. विशेष म्हणजे सैनी आणि पुकोवस्की या दोघांचाही हा पहिलाच कसोटी डाव आहे. पुकोवस्की ११० चेंडूत ४ चौकारांसह ६२ धावा करुन बाद झाला. तसेच त्याने लॅब्यूशानेसह १०० धावांची भागीदारी केली.

सैनीने पुकोवस्कीला बाद केल्यानंतर स्टिव्ह स्मिथ लॅब्यूशानेला साथ देण्यासाठी आला. या दोघांनीही काही आक्रमक फटके खेळले. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने स्मिथविरुद्ध अश्विन, जेडेजा या फिरकीपटूंना गोलंदाजीसाठी आणले. मात्र स्मिथ आणि लॅब्यूशानेने या दोघांचेही षटके चांगली खेळून काढली. या दोघांनी एकेरी दुहेरी धावांवरही लक्ष केंद्रित करत धावफलक हलता ठेवला.

लॅब्यूशानेने ४३ व्या षटकात त्याचे १०८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने त्याचा चांगला खेळ कायम ठेवत स्मिथबरोबर अर्धशतकी भागीदारी केली.

पहिल्या दिवसाखेरपर्यंत भारताला मात्र या दोघांच्या विकेट्स घेण्यात यश आले नाही. पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ५५ षटकात २ बाद १६६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथ ३१ धावांवर आणि लॅब्यूशाने ६७ धावांवर नाबाद आहे. या दोघांमध्ये ६० धावांची नाबाद भागीदारी झाली आहे.

पदार्पणवीर पुकोवस्कीचे अर्धशतक –

ऑस्ट्रेलियाकडून लॅब्यूशाने आणि पुकोवस्कीने २० षटकानंतरही संयमी खेळ केला. पण २५ व्या षटकात सिराजच्या गोलंदाजीवर पुकोवस्कीचा झेल रिषभ पंतकडून सुटला. त्यावेळी असे वाटले होते की पंतने तो झेल घेतला आहे. पण जेव्हा रिप्ले पाहाण्यात आला तेव्हा चेंडूने जमीनीला स्पर्श केल्याचे दिसले. त्यामुळे पुकोवस्कीला जीवदान मिळाले. ज्याचा त्याने चांगला फायदा घेतला.

तसच २९ व्या षटकातही दुहेरी धावा घेताना लॅब्यूशाने आणि पुकोवस्कीमध्ये गोंधळ झाला होता. त्यामुळे भारताकडे पुकोवस्कीला बाद करण्याची संधी होती. मात्र चेंडू यष्टीरक्षक पंतकडे पोहचेपर्यंत पुकोवस्की क्रिजमध्ये परतला होता. अखेर पुकोवस्कीने नवदीप सैनीच्या सलग २ चेंडूंवर दोन चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे पहिलेच अर्धशतक आहे.

डावाच्या ३१ व्या षटकानंतर दुसरे सत्र थांबवण्यात आले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने १ बाद ९३ धावा केल्या होत्या. तसेच पुकोवस्की ५४ आणि लॅब्यूशाने ३४ धावांवर नाबाद खेळत होते. या दोघांमध्ये नाबाद ८७ धावांची भागीदारी झाली होती.

लॅब्यूशाने – पुकोवस्कीची संयमी सुरुवात 

पहिल्या सत्रात पावसाचा व्यत्यय आल्याने केवळ ७.१ षटकाचाच खेळ झाला. पण त्यानंतर अखेर पावसाचा जोर ओसरल्यानंतर पुन्हा भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता खेळाला सुरुवात झाली. दुसऱ्या सत्रात मार्नस लॅब्यूशाने आणि पदार्पण करणाऱ्या विल पुकोवस्कीने सावध खेळ केला. या दोघांनी १५ षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाला ४० धावांचा टप्पा पार करुन दिला. दरम्यान जसप्रीत बुमराह १४० ताशी किलोमीटर पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करताना दिसून येत होता.

ऑस्ट्रेलियाने २० षटकापर्यंत १ बाद ४६ धावा झाल्या आहेत. लॅब्यूशाने १८ धावांवर तर पुकोवस्की २३ धावांवर नाबाद खेळत आहेत.

पहिल्या सत्रात पावसाचा व्यत्यय –

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खास झाली नाही. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा डेव्हिड वॉर्नर ८ चेंडूत ५ धावा करुन बाद झाला. त्याने मोहम्मद सिराज टाकत असलेल्या डावातील चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्लिपमध्ये चेतेश्वर पुजाराकडे सोपा झेल दिला.

त्यानंतर काहीवेळातच पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर चांगला असल्याने पहिले सत्र लवकर संपवण्यात आले. पहिल्या सत्रात ७.१ षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद २१ धावा केल्या. विल पुकोवस्की १४ तर मार्नस लॅब्यूशाने २ धावांवर नाबाद आहेत.

ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक 

या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात प्रत्येकी दोन बदल करण्यात आले आहेत .ऑस्ट्रेलियाने अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व विल पुकोवस्कीला  जो बर्न्स आणि ट्रेविस हेड ऐवजी संघात स्थान दिले आहे, तर भारताकडून रोहित शर्मा व नवदिप सैनीला मयंक अगरवाल आणि उमेश यादव संधी देण्यात आली आहे.

असे आहेत संघ –

भारत –

रोहित शर्मा (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत(यष्टीरक्षक), हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.

ऑस्ट्रेलिया – 

डेविड वॉर्नर, विल पुकोवस्की, मार्नस लॅब्यूशाने, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, टीम पेन(कर्णधार/यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, जोस हेजलवूड, मिशेल स्टार्क, नॅथन लायन.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---