गेले काही दिवस ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेन चांगलाच चर्चेत आहे. “भारतीय संघ लक्ष विचलित करण्यात माहीर आहे, ज्यामुळे त्यांना सामने जिंकता येतात”, असे वक्तव्य त्याने काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र त्यावरून कठोर टीकेचा सामना करावा लागला होता. विशेषतः भारतीय चाहत्यांनी निर्भत्सना केल्यावर त्याने या विधानावरून यु टर्न घेतला होता.
आता पुन्हा एकदा भारतासंबंधी टीम पेनने एक विधान केले आहे. मात्र हे विधान टीकेचे नाहीतर कौतुकाचे आहे. पेनने भारतीय कर्णधार विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केले आहे.
“कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज”
टीम पेनने कोहलीची प्रशंसा केली. तो म्हणाला, “कोहली बाबत मी हे नेहमीच म्हंटले आहे की तो असा खेळाडू आहे, जो तुम्हाला तुमच्या संघात कायम हवा असेल. तो अतिशय ईर्षेने खेळतो. तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध खेळणे हे एक आव्हान आहे. आणि तो तुमच्या नाकीनऊ आणल्याशिवाय राहत नाही. पण अर्थात २०१८-१९ च्या मालिकेत त्याच्यासह मैदानावर जी बाचाबाची किंवा स्लेजिंग झाले होते, त्यासाठी मी त्याला कधीच विसरू शकत नाही.”
भारतीय संघाने २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौर्यावरील कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. या मालिकेत टीम पेन आणि विराट कोहली अनेकदा आमनेसामने आले होते. त्यांच्यातील स्लेजिंग आणि कडवी टक्कर चर्चेचा विषय ठरली होती. त्यावेळचे त्यांचे संभाषण स्टंप मायक्रोफोन मध्ये रेकॉर्ड देखील झाले होते.
याबाबत बोलतांना पेन म्हणाला, “त्याने आमचे अनेक खेळाडू बाद झाल्यावर काहीशा अतिरिक्त उत्साहाने सेलिब्रेशन केले होते. मी त्याचा विचार केला आणि मला असे वाटले की मी स्वतःसाठी आणि संघासाठी काहीतरी भूमिका घ्यायला हवी. आणि म्हणून मी देखील कर्णधार म्हणून त्याच गोष्टींची परतफेड करण्याचा देखील प्रयत्न केला.”
महत्त्वाच्या बातम्या –
जिंदगी हो तो ऐसी! इमाम उल हकने भन्नाट मिम शेअर करत अविवाहित खेळाडूंची केली चेष्टा
व्हेंटिलेटरवर असलेल्या एका रुग्णासाठी देवदूत बनला युजवेंद्र चहल, ‘अशाप्रकारे’ केली मदत