भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी रांचीमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ विकेट्स राखन विजय मिळवला. या विजयासह भारताने न्यूझीलंडवर २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाने एकूण तीन विकेट्स गमावले आणि हे तीनही विकेट्स एकाच गोलंदाजने घेतले, तो म्हणजे न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज टिम साऊदी. साऊदीने या सामन्यात स्वतःच्या नावावर एका नवीन विक्रमाची नोंद केली आहे.
टी२० विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांचे वरिष्ट खेळाडू विश्रांतीवर आहेत. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन देखील या मालिकेत विश्रांतीवर आहे आणि त्याच्या जागी वेगवान गोलंदाज साऊदी सध्या संघाचे नेतृत्व करतोय. साऊदीने दुसऱ्या सामन्यात त्याच्यावर टाकण्यात आलेल्या जबाबदारीला साजेशी गोलंदाजी केली. न्यूझीलंडने जरी त्याच्या नेतृत्वात सलग दोन सामने गमावले असले, तरी त्याचे वैयक्तिक प्रदर्शन समाधानकारक राहिले आहे.
साऊदीने या दुसऱ्या टी२० सामन्यात त्याच्या चार षटकात अवघ्या १६ धावा दिल्या आणि तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. या सामन्यातील कामगिरीनंतर, साऊदी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने श्रीलंकेच्या दुष्मंथा चमीराला मागे टाकले आहे. सध्या चमीराने भारताविरुद्ध टी२० मध्ये १४ आणि साऊदी या सामन्यातील तीन विकेट्सच्या मदतीने १५ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. या यादीत पहिल्या स्थानाव न्यूझीलंडचा ईश सोढी आहे, ज्याच्या भारताविरुद्ध टी२० मध्ये सर्वाधिक १९ विकेट्स आहेत.
दरम्यान, या सामन्यात टिम साऊदी सोडून न्यूझीलंडचा इतर कोणताच गोलंदाज विकेट्स घेऊ शकला नाही आणि परिणामी न्यूझीलंड संघ या सामन्यात पराभूत झाला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष १७.२ षटकात गाठले.