न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज टीम साउदी हा आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या स्विंग गोलंदाजीने त्याने अनेक दिग्गज फलंदाजांना पवेलियनमध्ये पाठवले आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात देखील टीम साउदीने आपल्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले आहे. तसेच न्यूझीलंड संघ अडचणीत असताना त्याने तुफानी फटकेबाजी देखील केल्याचे दिसून आले आहे. या खेळीदरम्यान त्याने रोहित शर्मासारख्या विस्फोटक फलंदाजालाही मागे टाकले आहे.
टीम साउदीने भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात, ४६ चेंडूंमध्ये ३० धावांची खेळी केली होती. त्याने या खेळीदरम्यान दोन षटकार लगावले. यासह त्याच्या नावे कसोटी कारकिर्दीत एकूण ७५ षटकार झाले आहेत. ही खेळी खेळण्यापूर्वी रिकी पाँटिंग आणि टीम साऊदी हे दोघेही ७३-७३ षटकारांसह बरोबरीत होते. परंतु साऊदीने लगावलेल्या २ षटकारांनंतर ही संख्या ७५ झाली आहे. (Tim Southee surpassed Ricky ponting in most sixes record)
दिग्गज खेळाडूंना टाकले मागे
टीम साउदीने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, रोहित शर्मा, रिकी पाँटिंग, एबी डिविलियर्स या दिग्गज फालंदाजांना मागे टाकले आहे. तसेच भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज, एमएस धोनी या यादीत ७८ षटकारांसह १४ व्या क्रमांकावर आहे. धोनीला मागे टाकण्यासाठी साउदीला अवघ्या ३ षटकारांची आवश्यकता आहे.
भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागने सर्वाधिक ९१ षटकार लगावले आहेत. सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सेहवाग जगातील ५ वा फलंदाज आहे. तसेच सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये ६९ षटकार लगावले आहेत. यासोबतच सौरव गांगुलीने कसोटी क्रिकेटमध्ये ५७ षटकार लगावले आहेत. तर आधुनिक क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावे कसोटीत ५९ षटकार आहेत. तर कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये २२ षटकार लगावले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
WTC Final, INDvNZ: आयसीसीने जाहीर केले राखीव दिवसाचे नवे नियम, जाणून घ्या सविस्तर
विशेष कट रचून न्यूझीलंडचा केला गेम, टीम इंडियाचा हुकमी एक्का शमीचा खुलासा






