भारत विरुद्ध इंंग्लंड संघात झालेला २००३ मधील विश्वचषकातील सामना कोणीच विसरणार नाही. पहिल्या ६ संघांच्या यादीत स्थान मिळविण्यासाठी भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धचा हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २५० धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडच्या संघासाठी हे लक्ष्य खूप कठीण वाटत नव्हते.
अशामध्ये डर्बनच्या वेगवान खेळपट्टीवर भारतीय संघाला अनुभवी गोलंदाजाची आवश्यकता होती. जो भारताला या सामन्यात विजय मिळवून देईल. त्यावेळी तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आशिष नेहराकडे (Ashish Nehra) ही जबाबदारी सोपविली होती. या सामन्यात त्यानेही एक अद्भुत कामगिरी केली जी खूपच कौतुकास्पद होती. नेहराने १० षटकांमध्ये केवळ २३ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या.
नेहराने केलेला हा कारनामा त्याच्या वनडे कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती. या सामन्यातच नेहराला जास्त थकव्यामुळे उलटीही आली होती. असे वाटत होते की, तो आता सामन्यात आपली १० षटके पूर्ण करू शकणार नाही. परंतु, तो मैदानावर परतला आणि भारताला विजय मिळवून देण्यात मोलाच योगदान दिले.
नेहराने आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९९९मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून केले होते. त्याने भारताकडून एकूण १७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ४४ विकेट्स घेतल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर वनडे क्रिकेट खेळण्यासाठी नेहराला जवळपास २ वर्षे वाट पहावी लागली होती. त्याने आपला पहिला वनडे सामना २००१मध्ये झिंबाब्वेविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने २ विकेट्स घेतल्या होत्या.
नेहराने भारताकडून एकूण १२० वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने १५७ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने २६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ३४ विकेट्स घेतल्या आहेत.
नेहराने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १ नोव्हेंबर २०१७मध्ये खेळला होता. हा टी२० सामना त्याने न्यूझीलंडविरुद्ध दिल्लीमध्ये त्याच्या घरच्या मैदानावर खेळला होता.
ट्रेंडिंग लेख-
-क्रिकेटमधील ‘हे’ अतरंगी नियम जे क्रिकेट फॅन्सला सहसा नसतात माहित
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष…
-बड्डे बाॅय आशिष नेहराची क्रिकेट कारकिर्द अशी राहिली