fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा

-प्रणाली कोद्रे

तो वेगवान गोलंदाज असूनही त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द १८ वर्षे २५० दिवस एवढ्या दिवसांची होती. या कालावधीत त्याला तब्बल १२ शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले. असे असतानाही तो क्रिकेटवरील प्रेमापोटी सातत्याने मेहनत घेत प्रत्येक दुखापतीनंतर पुनरागमन करत राहिला. अनेकदा या दुखापतींमुळे त्याला संघातून बाहेर व्हावे लागले. तेही एखाददोन सामने नव्हे तर तब्बल सलग २-३ वर्षे. पण तोही हार मानणाऱ्यातला नव्हताच. त्याने प्रत्येकवेळी भारतीय संघात पुनरागन करुन दाखवले. असे सर्व असतानाही त्याचे भारतीय संघाकडून २ वनडे विश्वचषकात, २ आशियाई चषकात आणि ३ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रतिनिधित्व केले. तो गोलंदाज म्हणजेच आशिष नेहरा.

नेहराचा २९ एप्रिल १९७९ ला दिल्लीमध्ये जन्म झाला. तो लहानपणापासूनच क्रिकेट खेळायचा. त्याने १४ व्या वर्षापासून दिल्लीतील तारिक सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सोनेट क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिथे अनेकदा तो स्वत: खेळपट्टीला रोलिंगही करायचा. तिथे त्याने जवळ जवळ ५ वर्षे सराव केला. त्यानंतर त्याने १९ व्या वर्षी दिल्लीकडून १९९७-९८ च्या मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या मोसमात त्याने रणजी ट्रॉफीमध्ये ३ सामने खेळताना १२ विकेट्स घेतल्या. त्याच्या पुढच्याच मोसमात त्याने ८ रणजी सामन्यात २३ विकेट्स घेतल्या.

या दरम्यान त्याची विरेंद्र सेहवागबरोबर चांगली मैत्री झाली होती. ते दोघेही एकत्रच एकाच स्कूटीवरुन दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर जायचे. त्यावेळी सेहवाग सकाळी नेहराच्या घरी यायचा. त्यानंतर ते दोघे एकत्र मैदानावर जायचे. जाताना सेहवाग स्कूटी चालवायचा आणि नेहरा मागे त्याच्या किटबॅगवर झोपायचा. तर येताना नेहरा स्कूटी चालवायचा आणि सेहवाग झोपायचा. नेहराने त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील पहिल्या २ मोसमांनंतर लगेचच भारतीय संघात जागा मिळवली होती. त्याचे कोलंबो येथे आशियाई कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात २४ फेब्रुवारी १९९९ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. त्याला या सामन्यात मात्र १ विकेट घेण्यातच यश मिळाले. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.

Photo Courtesy: Twitter/ ICC

त्यानंतरही त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची चांगली कामगिरी करणे सुरु ठेवली होती. त्याने १९९९-०० च्या मोसमात रणजी ट्रॉफीमध्ये ६ सामन्यात २९ विकेट्स घेतल्या. तसेच त्याच्या पुढच्याच मोसमात तो रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला. त्याने २०००-०१ मोसमात ५ सामन्यात ३६ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवले. त्याने जून २००१ मध्ये भारतीय संघात पुनरागमन केले. त्याचबरोबर त्याने त्याचवर्षी वनडेमध्येही पदार्पण केले. त्याने त्याच्या दुसऱ्यात कसोटी सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना ५ विकेट्स घेतले. तो सामना भारत जिंकला. त्यावेळी १५ वर्षानंतर भारतीय संघ परदेशात विजय मिळवण्यात यशस्वी ठरला होता.

यानंतर नेहरा साधारण २००४-०५ पर्यंत भारतीय संघाचा नियमित सदस्य होता. या दरम्यान त्याने २००३ चा विश्वचषकही खेळला. त्या विश्वचषकात त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शनही केले. त्याने इंग्लंड विरुद्ध खेळताना १० षटकात २३ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे त्या सामन्याआधी नेहराला घोट्याची दुखापत झाली होती. त्याचा घोटा सुजला होता. पण त्याने २ दिवस त्या घोट्यावर मेहनत घेतली. कित्येक तास त्याने आईस बॅग घोट्याला बांधून ठेवली. त्याची ही मेहनत पाहून त्यावेळीचा कर्णधार गांगुलीनेही त्याला इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी दिली. त्या कालावधीदरम्यान ज्या ज्यावेळी नेहराला संघात संधी मिळत नसत त्या त्यावेळी तो गांगुलीला थेट प्रश्नही विचारायला जायचा की तू मला का खेळवत नाहीस. त्यावेळी गांगुलीला त्याला समजवावे लागे की तूला पण संधी देणार आहे. मात्र यादरम्यान त्याची स्पर्धा झहिर खानशीही होत होती. असे असले तरी त्याची झहिरशी मैत्रीही चांगली होती.

२००३ च्या विश्वचषकानंतर इरफान पठाणही संघात असल्याने नेहरासमोरची स्पर्धा आणखी वाढली. पण तरीही तो २००४-०५ दरम्यान इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान दौऱ्यात खेळला. त्याने ९ ऑगस्ट २००५ ला कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध इंडियन ऑईल कपच्या अंतिम सामन्यात खेळताना ५९ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी तो वनडेमध्ये ६ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स २ वेळा घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता.

त्याची सुरुवातीच्या कारकिर्दीत जवागल श्रीनाथबरोबरही चांगली मैत्री होती. एकदा तर तो आणि श्रीनाथ फलंदाजी करत असताना नेहराने चौकार मारला आणि तर श्रीनाथने शून्य धावा केल्या होत्या. पण तरीही डाव संपल्यावर श्रीनाथने बॅट वर उचलून परत चालला होता. त्यावेळी नेहराने त्याला गमतीने म्हटले की चौकार तर मी मारला आणि तू बॅट वर उचलतोय.

नेहराची फलंदाजी तशी काही उत्तम नव्हती पण त्याने काही षटकार असे मारले आहेत, जे कायम लक्षात राहतील. २००२ ला इंग्लंड दौऱ्यात त्याने लॉर्ड्सच्या मैदानात मारलेला षटकारही सर्वांना लक्षात असेल. त्यावेळी भारताच्या ९ विकेट गेल्या होत्या आणि आगरकर ६७ धावांवर खेळत होता. त्यामुळे ११ व्या क्रमांकावर खेळायला आलेल्या नेहराने त्याच्याबरोबर ६० धावांची भागीदारी केली आणि आगरकरचे पहिले शतक होण्यात मोठा वाटा उचलला. त्याचे शतक झाल्यानंतर मात्र नेहरा त्याला म्हणाला, तसंही आपण सामना पराभूत होत आहोत आता मला एक तरी मोठा फटका खेळूदे आणि चक्क नेहराने अँड्र्यू फ्लिंटॉफच्या गोलंदाजीवर एवढा मोठा षटकार मारला की चेंडू मैदानाबाहेर गेला. असे लॉर्ड्सवर केवळ २ वेळा झाले आहे. त्याआधी व्हिव रिचर्ड्स यांनी असा षटकार मारला होता. त्याचबरोबर एकदा शेन बॉन्डच्या गोलंदाजीवरही नेहराने षटकार मारला होता. तेव्हा पुढचा बॉल बॉन्ड शरिरावर वगैरे मारेल असे वाटून नेहरा त्याला गमतीने असेही म्हटले हे बघ हव तर मी तूला माझी विकेट देतो पण उगीच जोरात बॉल टाकू नको.

२००५ नंतर ग्रेग चॅपेल यांच्या मार्गदर्शनाखाली मुनाफ पटेल, आरपी सिंग असे गोलंदाज तयार होत होते. त्यात नेहराचा फॉर्मही खराब झाला. त्यावर कळस म्हणजे त्याला सराव सत्रादरम्यान पुन्हा घोट्याची मोठी दुखापत झाली. त्यामुळे तो संघातून बाहेर पडला. त्यानंतर मात्र त्याला तब्बल ३ वर्षे २९४ दिवस भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही. त्याने २००४ मध्ये त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला. अखेर २००९मध्ये झहिर खानच्या अनुपस्थितीत एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली नेहराने भारतीय संघात पुनरागमन केले. त्यावेळी नेहराला कसोटी क्रिकेट खेळणार का असेही विचारण्यात आले होते, परंतू नेहराने त्यावेळी शरिर इतकी साथ देणार नाही म्हणून यासाठी नकार दिला. तसेच त्यावेळी २०११ विश्वचषकही समोर होता.

नेहरा २००९ ला चॅम्पियन्स ट्रॉफी देखील खेळला. त्याने २००९ मध्ये २१ वनडे सामन्यात ३१ विकेट्स घेतल्या. त्याने त्यावेळी संघात आलेल्या युवा खेळाडूंबरोबर त्याचा अनुभव शेअर करत २०११ च्या विश्वचषकात स्थानही मिळवले. त्याची या विश्वचषकातील कामगिरी समाधानकारक होत होती. पण नेमकी त्याच्या हाताच्या बोटाला अंतिम सामन्यापूर्वी दुखापत झाली. त्यामुळे त्याला अंतिम सामन्याला मुकावे लागले. पण हा अंतिम सामना भारताने जिंकल्याने त्याला विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग होण्याचे भाग्यही लाभले. या विश्वचषकानंतर पुन्हा नेहराने दुखापतीमुळे त्याने संघातील जागा गमावली. २०११ च्या विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धचा उपांत्य सामना त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. त्यानंतर उमेश यादव, वरुण ऍरॉन, भुवनेश्वर कुमार हे खेळाडू संघात आल्याने त्याल पुढे जवळ जवळ ५ वर्षे संघात संधी मिळाली नाही.

Photo Courtesy: Twitter/ BCCI

पण  २०१५ नंतर झहिर खानने निवृत्ती घेतली आणि याचदरम्यान नेहराने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना चांगली कामगिरी केेली. त्यामुळे त्याला २०१६ च्या सुरुवातीला पुन्हा भारतीय संघात संधी मिळाली. त्यानंतर मात्र तो टी२० स्पेशालिस्ट म्हणून खेळला. तो ऑस्ट्रेलिया, श्रीलंका संघाविरुद्ध टी२० मालिका खेळला. त्याचबरोबर आशिया चषकही खेळला. त्याला २०१६ च्या टी२० विश्वचषकासाठीही भारतीय संघात संधी मिळाली. या दरम्यान तो भारतीय संघातील युवा खेळाडूंबरोबरही तो तितकाच रमला. पण २०१६ च्या आयपीएलमध्ये त्याला पुन्हा दुखापत झाली. पण तरीही त्याने पुन्हा भारतीय संघात २०१७च्या सुरुवातीला स्थान मिळाले. पण अखेर त्याने १ नोव्हेंबर २०१७ ला त्याच्या घरच्या मैदानात म्हणजेच फिरोजशहा कोटला स्टेडियमवर शेवटचा सामना खेळण्याचा निर्णय घेतला.

कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात त्याने एक खास विक्रमही केला. त्याच्या सन्मानार्थ फिरोजशाह कोटला मैदानावरील एका एन्डला त्याचे नाव देण्यात आले. त्यामुळे त्याने त्याच्याच नावाच्या एन्डवरुन गोलंदाजी करुन आतंरराष्ट्रीय कारकिर्दीचा निरोप घेतला. त्यावेळी तो आपल्याच नावाच्या एन्ड करून गोलंदाजी करणारा जेम्स अँडरसननंतरचा दुसराच गोलंदाज ठरला होता. त्या सामन्यानंतर भारताच्या खेळाडूंनी त्याला खांद्यावर उचलून मैदानात फेरीही मारली.

नेहमीच साधा राहणारा नेहरा निवृत्तीनंतर कुटुंबासह गोव्यात स्थायिक झाला. तसेच सध्या तो समालोचन करताना दिसतो. त्याचबरोबर तो प्रशिक्षण क्षेत्रातही उतरला. त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपदही सांभाळले.

Photo Courtesy: Twitter/ ICC

ज्यावेळी सर्व क्रिकेटपटू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असताना नेहरा मात्र या सर्व गोष्टींपासून लांब आहे. तो २०१६ पर्यंत नोकीयाचा जूना फोनही वापरत होता. इतका साधा असणारा नेहरा ज्याला त्याच्या मनमोकळ्या आणि विनोदी स्वभावामुळे सचिन तेंडुलकरने पोपट असेही नाव दिले होते. नेहराने अनेकदा चांगली कामगिरी भारतीय संघाकडून केली. पण तो नेहमीच त्याच्या स्वभावामुळे सर्वांच्याच लक्षात राहिला. त्याच्या याच स्वभावामुळे तो दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील खेळाडूंबरोबर खेळूनही सर्वांचा लाडका ‘नेहराजी’ देखील झाला.

गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

You might also like