गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

-प्रणाली कोद्रे

कपिल देव, मनोज प्रभाकर यांच्या निवृत्तीनंतर त्याने भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची धूरा ७-८ वर्षे समर्थपणे सांभाळली. वेगवान गोलंदाज असूनही तो भारताच्या वळणाऱ्या खेळपट्टीवर कमालीचा यशस्वी ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले. एवढेच नाही तर तो वनडे विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही आहे. तो गोलंदाज म्हणजे जवागल श्रीनाथ.

३१ ऑगस्ट १९६९ ला म्हैसुर येथे श्रीनाथचा जन्म झाला. त्याच्या वडील स्वत: व्हॉलिबॉल खेळाडू होते. मोठ्या स्थरावर खेळले नसले तरी त्यांनी खेळाचे बाळकडू श्रीनाथला दिले होते. पुढे श्रीनाथने क्रिकेटमध्ये रस घेतला. १२ व्या वर्षापासून त्याने शालेय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पुढे त्याने महाविद्यालयिन क्रिकेटही खेळले. शालेय स्तरापासून चमकत असलेल्या श्रीनाथने १९८९-९० प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाकडून पदार्पण केले. त्याने हैद्राबाद विरुद्ध पहिला सामना खेळताना पहिल्या डावात हॅट्रिक घेतली. तसेच दुसऱ्या डावातही त्याला हॅट्रिकची संधी होती. त्याने या सामन्यात शानदार कामगिरी करत हॅट्रिकसह ७ विकेट्स घेत पदार्पण गाजविले. त्याने या मोसमात रणजी ट्रॉफीच्या ६ सामन्यात २५.०८ च्या सरासरीने २५ विकेट्स घेतल्या. त्याच्या पुढच्या मोसमातही त्याने 7 सामन्यात २२.८० च्या सरासरीने २० विकेट्स घेतल्या.

त्याची ही कामगिरीपाहून त्याला विल्स ट्रॉफीसाठी संधी मिळाली. त्या स्पर्धेतून त्याने पाकिस्तान विरुद्धच्या वनडे सामन्यातून शारजा येथे १८ ऑक्टोबर १९९१ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या पुढच्याच महिन्यात त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यावेळी भारतीय संघात कपिल देव, मनोज प्रभाकर हे गोलंदाज असताना श्रीनाथ हा भारतीय संघाचा तिसरा वेगवान गोलंदाजच राहिला. त्याच भारतात जेव्हा सामने व्हायचे तेव्हा फिरकीपटूंचे संघात वर्चस्व असल्याने त्याला जास्त संधी मिळाली नाही. पण तरीही तो त्याची वेगळी छाप पाडत होता. त्यामुळे श्रीनाथने १९९२साली वर्षातील सर्वात्तम भारतीय क्रिकेटरचा पुरस्कारही मिळवला होता. पण याचवेळी तो अभियांत्रिकीचे शिक्षणही घेत होता. तसेच विजया बँकमध्ये नोकरीलाही होता. या बँकेनेही त्याला पाठिंबा दिला. क्रिकेटमुळे अनेकदा श्रीनाथच्या शिक्षणात अडथळा येत होता. पण तो क्रिकेटमध्ये आपली छाप पाडत होता.

कपिल देव आणि प्रभाकर यांनी निवृत्ती घेतल्यानंतर श्रीनाथचे भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीच्या नेतृत्वाची जबाबदारी हाती घेतली. कपिल आणि प्रभाकर यांच्या निवृत्तीनंतर वेगवान गोलंदाज म्हणून श्रीनाथ बरोबर व्यंकटेश प्रसाद होता. श्रीनाथ आणि वंकटेश प्रसाद यांच्यात चांगले मैत्रीचे नाते आहे. त्यांच्यातीलच एक गमतीशीर किस्सा असा की एकदा कानपूरला सामना सुरु होता. सामना भारतात असल्याने अर्थातच भारतीय संघाने केवळ एक वेगवान गोलंदाज म्हणून श्रीनाथला खेळवले होते. तर प्रसाद १२ वा खेळाडू होता. त्यावेळी श्रीनाथने फलंदाजाला पायचीत करुन एक विकेट घेतली होती. त्यानंतर काहीवेळाने प्रसाद पाणी घेऊन आला. त्यावेळी श्रीनाथने त्याला विचारले, ‘रिप्ले पाहिला का?’ त्यावर प्रसादने ‘हो’ असे उत्तर दिले. मग श्रीनाथचा त्याला पुढचा प्रश्न ‘काय झाले?’ त्यावर प्रसाद म्हणाला, ‘तो चेंडू चौथ्या स्टंप सोडून बाहेर जात होता. फलंदाज नाबाद होता. पंचानी बाद कसे काय दिले माहित नाही. पण तू मात्र लकी ठरला इतकचं.’ एवढे बोलल्यानंतर कॅमेरा जवळ येतोय हे पाहिल्यावर मात्र प्रसादने श्रीनाथच्या पाठिवर थोपटायला सुरुवात केली.

याकाळात श्रीनाथने इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटमध्येही पदार्पण केले. त्याने १९९५ ला ग्लॉस्टरशायरकडून खेळताना एका मोसमात ८७ विकेट्स घेतल्या. कौंटी क्रिकेटमध्ये नंतर त्याने लेसेस्टरशायर आणि डरहॅम या संघांचेही प्रतिनिधित्व केले. श्रीनाथने त्याच्या आवडता प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत १९९६-९७ ला शानदार कामगिरी केली. पण त्याचदरम्यान १९९६ ला श्रीनाथला खांद्याची दुखापत झाली. त्यामुळे त्याला शस्त्रक्रियेलाही सामोरे जावे लागले. त्यावेळी त्याला चेन्नईमध्ये असलेल्या एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये डेनिस लिली यांचे मार्गदर्शन मिळाले. या दुखापतीनंतर तो पुनरागमन करेल यावर त्यावेळी अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले. पण श्रीनाथने योग्य सराव करत पुनरागमनसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. त्याचबरोबर या काळात त्याने त्याचे अभियांत्रिकीचे शिक्षणही पूर्ण केले. याबद्दल तो सांगतो, ज्यावेळी मला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे होते. परंतू मला तेवढे गुण नसल्याने पालकांनी डोनेशनवैगरे भरुन मला चांगले कॉलेज मिळवून दिले होते. त्याचवेळी मी ठरवले होते की शिक्षण पूर्ण करायचे. १९९२ लाच मला डिग्री पूर्ण करायची होती. पण ती अखेर १९९७ ला पूर्ण झाली. श्रीनाथच्या म्हणण्यानुसार क्रिकेट जरी पॅशन असले तरी शिक्षण हे महत्त्वाचेच. शिक्षण तूम्हाला सुरक्षितता देते. शिक्षण घ्यायला पाहिजे.

पुढे श्रीनाथने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून नोव्हेंबर १९९७ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पुनरागमन करताना त्याने पहिल्याच सामन्यात ७ विकेट्स घेतल्या. पुढे तो भारताकडून नियमित खेळला. १९९९ ला त्याने पाकिस्तानविरुद्ध कोलकाता येथे खेळताना तब्बल १३ विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना अनेक क्रिकेट चाहते विसरलेले नाहीत. एवढेच नाही तर श्रीनाथ हा वेळ पडेल तेव्हा फलंदाजीत योगदान द्यायचा त्याने त्याच्या कारकिर्दीत ५ अर्धशतकही केली आहेत. 

श्रीनाथ असा क्रिकेटपटू होता जो खूप शांत असायचा. तो स्लेजिंग वैगरे गोष्टींपासून लांब असायचा. त्याच्या म्हणण्यानुसार स्लेजिंगपेक्षा बॉलने उत्तर द्यायला त्याला जास्त आवडायचे. एकदा तर गमतीशीर किस्सा त्याच्याबाबतीत झाला. वेलिंग्टन कसोटीत जेव्हा त्याने टाकलेला एक उसळता चेंडू स्टिफन फ्लेमिंगच्या हेल्मेटला लागला तेव्हा श्रीनाथ स्लेजिंग करत असल्याचे फ्लेमिंगला वाटले. त्यामुळे तो श्रीनाथ जवळ जाऊन हुज्जत घालायला लागल्यावर श्रीनाथने त्याला सांगितले की ‘मी तु ठीक आहे की नाही’ हे विचारत होतो. श्रीनाथ हा  नेहमी एक मितभाषी खेळाडू म्हणून ओळखला गेला.

श्रीनाथ हा नेहमी संघाला महत्त्व देणारा खेळाडू होता. त्याच्या म्हणण्यानुसार विकेट किती घेतो यापेक्षा मी संघाच्या विजयात किती वाटा उचलतो हे महत्त्वाचं आहे. याबाबतचा एक खास किस्सा म्हणजे, दिल्ली येथे १९९९ला झालेल्या कसोटी सामन्यात अनिल कुंबळेने दुसऱ्या डावात १० विकेट्स घेतल्या. त्या डावात कुंबळेने ९ विकेट्स घेतल्यानंतर श्रीनाथने विकेट घेणे टाळण्यासाठी आणि १० वी विकेटही कुंबळेलाच मिळावी म्हणून वाईड बॉल टाकले होते. त्याबद्दल श्रीनाथ म्हणतो, विकेट न घेता मी इतिहासाचा भाग होत होतो.

श्रीनाथचे पाकिस्तान खेळाडूंबरोबरही चांगली मैत्री होती. तो अनेकदा वकार युनुस, वासिम आक्रम यांच्याशी चर्चा करायचा. तसेच इम्रान खानला तो गोलंदाजीत आदर्श मानायचा.

भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला गेलेला श्रीनाथ भारताकडून ४ विश्वचषक खेळला. या ४ विश्वचषकात मिळून त्याने ४४ विकेट्स घेतल्या आहेत. २००३ विश्वचषक श्रीनाथच्या कारकिर्दीतील अखेरचा विश्वचषक ठरला. सुरुवातीला कपिल, प्रभाकर, मधल्या काळात प्रसाद, कुंबळे, नंतर युवा झहीर, इरफान यांच्यासह श्रीनाथ खेळला. स्वभावाने शांत असला तरी तो गोलंदाजी करताना तितकाच आक्रमक वाटायचा. त्याने अन्य गोलंदाजांपेक्षा स्वत:ची वेगळी अशी छाप पाडली होती. त्याने उगीच कुणाला दुखावले नाही. त्यामुळे त्याची अन्य देशांच्या खेळाडूंशीही चांगली मैत्री झाली.

२००२ ला त्याने तो आता दमला असल्याचे स्पष्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यावेळी त्याला वनडे संघातूनही वगळण्यात आले. पण त्यावेळीचा भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने श्रीनाथवर विश्वास दाखवत त्याला २००२ ला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पुन्हा संघात घेतले. या स्पर्धेत अंतिम सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि श्रीलंकेला संयुक्तरित्या विजेतेपद देण्यात आले होते. त्यानंतर श्रीनाथने कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक २००३ ला खेळला. या विश्वचषकात त्याने ११ सामन्यात १६ विकेट्स घेत भारताला अंतिम सामन्यात पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. मात्र अंतिम सामन्यात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

२००३ ला भारताकडून विश्वचषकातील अंतिम सामन्यानंतर श्रीनाथने क्रिकेट कारकिर्दीला पूर्ण विराम दिला. मात्र क्रिकेट शरिरातच भिनले असल्याने श्रीनाथ कधीही क्रिकेटपासून दूर राहू शकला नाही. अनेक क्रिकेटपटू निवृत्तीनंतर समालोचन, प्रशिक्षण अशा क्षेत्रात काम करण्यास सुरुवात करतात. पण श्रीनाथने यापेक्षा वेगळे असे असे सामनाधिकारी म्हणून २००६मध्ये काम करण्यास सुरुवात केली. तो आत्ताच्या घडीला आयसीसीमधील एक अव्वल दर्जाचा सामनाधिकारी असून त्याने आत्तापर्यंत सामनाधिरारी म्हणून तब्बल ३५९ आंतरराष्ट्रीय सामन्यात काम पाहिले आहे. तो सर्वाधिक सामन्यात सामनाधिकारी असणाऱ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. असा हा क्रिकेटपटू ज्याने क्रिकेट चाहत्यांना अनेक आठवणी दिल्या. ९० च्या दशकातील एक उत्तम वेगवान गोलंदाज असणाऱ्या म्हैसुर एक्सप्रेस श्रीनाथला विसरणे अशक्यच.

याच लेखमालेतील अन्य लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालेतील काही खास लेख-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!

-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर 

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

You might also like