fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १- पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

-आदित्य गुंड

“६ बॉलमध्ये ९ कसं शक्य आहे? हे इथपर्यंत आले हेच खूप झालं?’ मी दादांना म्हणालो.
“जिंकणार रे. तू बघ आता.” देवकुळे काका मला थांबवत म्हणाले. जुन्नरमध्ये त्यावेळी बऱ्याचदा एका लाईनची लाईट जात असे. त्या दिवशी त्यांच्या घरची लाईट गेली म्हणून काका आणि त्यांचा मुलगा संतोषदादा आमच्या घरी येऊन मॅच बघत होते. मॅच होती १९९८ साली झालेल्या इंडिपेंडन्स कपच्या फायनलची. भारत विरुद्ध पाकिस्तान.

पाकिस्तानने ३१४ धावा करून भारतासमोर विश्वविक्रमी ३१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ३१५ धावांचा पाठलाग करताना भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये ६ चेंडूत ९ धावांची गरज होती. कानिटकर आणि श्रीनाथ दोघंजण खेळत होते. श्रीनाथ त्यावेळी का कोण जाणे पण भरवशाचा वाटायचा. आडवे तिडवे फटके मारून का होईना, तो धावा करायचा हे मात्र नक्की. तरीही हे दोघं असं कितीक काय करणार म्हणून मी आशा सोडून दिली होती.

देवकुळे काका मात्र मला माझ्या जागेवरून उठू देत नव्हते. मी जागेवरून उठलो तर अपशकुन होऊन भारत हारेल असे कदाचित त्यांना वाटत असावे. त्यातल्या त्यात शेवटची ओव्हर तेव्हाचा सर्वोत्तम म्हणून ओळखला जाणारा सकलेन मुश्ताक टाकत होता. तरीही या दोघांनीं २ बॉलमध्ये ३ रन्स अशी स्थिती आणून ठेवली. कानिटकर स्ट्राईकवर होता. सकलेनने टाकलेला बॉल त्याने मिडविकेटला जोरात मारला आणि काही कळायच्या आत तो सीमारेषेबाहेर गेला.

आम्ही सगळेजण जोरात ओरडलो. दादांच्या तोंडून त्यांचे नेहमीचे शाबासकीचे शब्द “हे शाबास!” बाहेर पडले. देवकुळे काका लहान मुलासारखे नाचत होते. त्यांच्याकडे पाहून माझी ताई दिप्तीला हसू येत होते. संतोषदादाने घरी जाऊन एक मोठा सुतळी बॉम्ब आणला आणि तो आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर वाजवला. सगळीकडे फटाक्यांचे आवाज येत होते. पुण्याचा हृषीकेश कानिटकर हिरो झाला होता. भारताने पाकिस्तानला हरवले होते.

अनेकांना हा सामना आजही अगदी ठळकपणे आठवत असेल. सामन्याचा मानकरी गांगुली ठरला तरी त्या सामन्याचा स्टार मात्र कानिटकर ठरला होता. आज २० वर्षांनंतरही पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या आठवणी ताज्या आहेत. ह्या सामन्यातल्या आपल्या छोट्याश्या पण महत्वाच्या खेळीने कानिटकर जगाला माहित झाला.

१९९७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या हृषिकेशने भारतासाठी ३४ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळले. तीन वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पाकिस्तानविरुद्धचा चौकार सोडला तर फारसं आठवणीत राहील असं काही हृषीकेश करू शकला नाही. तो एक चांगला क्षेत्ररक्षक होता हे मात्र खरे.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द फारशी चांगली न राहिलेला हृषीकेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र दादा माणूस होता. १९९४ पासून ते अगदी २०१३ पर्यंत म्हणजे जवळजवळ २० वर्षे तो क्रिकेट खेळत होता. रणजी करंडकामध्ये ८००० पेक्षा जास्त धावा केलेल्या मोजक्या पाच फलंदाजांमध्ये हृषिकेशचा समावेश होतो. रणजी करंडकाच्या इतिहासात सुपर आणि प्लेट लीग अशा दोन्ही लीगच्या संघाकडून विजेतेपद मिळविणारा एकमेव कर्णधार म्हणून हृषीकेशचा विक्रम आहे.

कारकिर्दीतले बहुतांश क्रिकेट हृषीकेश महाराष्ट्राकडून खेळला. खेळलेल्या १४६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये हृषिकेशने ५२ च्या सरासरीने ३३ शतके टोलवत १०,४०० धावा काढल्या आणि ७४ बळीही मिळवले. महाराष्ट्राकडून १४ वर्षे खेळल्यानंतर हृषीकेश मध्यप्रदेशकडून दोन वर्षे क्रिकेट खेळला. त्याच दरम्यान त्याने मध्यप्रदेश संघाचे नेतृत्वदेखील केले. दोन वर्षानंतर हृषीकेश राजस्थान संघाकडून एक वरिष्ठ खेळाडू म्हणून खेळू लागला. त्यावेळी रणजी स्पर्धेमध्ये सुपर लीग आणि प्लेट लीग असे स्वरूप नुकतेच सुरु झाले होते.

राजस्थान प्लेट लीगमध्ये खेळत असूनही मुंबई आणि तामिळनाडू या दोन बलाढ्य संघांविरुद्ध विजय मिळवत त्यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अखेरीस अंतिम सामन्यात बडोदयावर विजय मिळवत जेतेपत पटकावले होते. पुढच्या हंगामात राजस्थान सुपर लीगमध्ये खेळले. त्याही वर्षी त्यांनी तामिळनाडूला पराभूत करत लागोपाठ दोन वर्षे रणजी करंडक जिंकला होता. १९६० ते १९७५ मध्ये आठ वेळेस उपविजेते राहिलेल्या राजस्थानला इतक्या प्रदीर्घ कालखंडानंतर विजेतेपद मिळवून देण्यात हृषिकेशचा मोठा वाटा होता. आजतागायत राजस्थान संघाने फक्त याच दोन वेळेस रणजी करंडक जिंकलेला आहे.

मध्यप्रदेश आणि राजस्थान या संघांबरोबर क्रिकेट खेळताना आपण पूर्वीसारखे क्षेत्ररक्षण करू शकत नसल्याचे हृषिकेशला जाणवत होते. केवळ एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून एका नवोदिताची जागा अडविण्यापेक्षा निवृत्ती पत्करलेली बरी असा विचार करून त्याने २०१५ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. मध्यप्रदेश आणि राजस्थानकडून ज्येष्ठ खेळाडू म्हणून खेळतानाच हृषीकेशच्या प्रशिक्षक पदाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली होती.

२०११ च्या आयपीएल मध्ये कोची टस्कर्स केरला या संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी त्याची नेमणूक झाली होती. संघमालकांबरोबर झालेल्या वादामुळे स्पर्धा सुरु होण्याअगोदरच हृषिकेशने प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडली होती. त्यानतंर २०१५-१६ च्या हंगामासाठी त्याने गोवा रणजी संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते.आयपीएलच्या नवव्या हंगामात हृषीकेश रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा सहाय्यक प्रशिक्षक होता. त्यानंतर २०१६ साली तामिळनाडू संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्याने स्वीकारली. त्याच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच हंगामात तामिळनाडू संघाने रणजीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकसारख्या बलाढ्य संघाला हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

उपांत्य फेरीमध्ये त्यांना मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला. त्याच वर्षी या संघाने विजय हजारे करंडक आणि देवधर करंडकही जिंकला होता. परवा बांगलादेशविरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार मारून भारताला विजयी केलेल्या दिनेश कार्तिकच्या गेल्या २-३ वर्षातल्या जडणघडणीत हृषिकेशचाही वाटा असल्याचे तो आग्रहाने सांगतो. २०१७-१८ चा हंगाम मात्र तामिळनाडू संघासाठी फारसा चांगला ठरला नाही. त्यामुळे हृषीकेशला प्रशिक्षक पदाच्या करारामध्ये मुदतवाढ मिळणे सध्यातरी अवघड दिसते आहे.

आपण भारतीय संघांचे प्रशिक्षक व्हायचे हे हृषिकेशचे स्वप्न आहे. २०१६ मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी ५७ अर्ज आले होते. त्यातला एक अर्ज हृषीकेशचा होता. प्रशिक्षक कोण झाले हे सांगण्याची गरज नाही. २०१८ च्या आयपीएल हंगामासाठी चेन्नईच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी हृषिकेशची निवड होणार अशी वदंता होती. मात्र त्याचे पुढे काय झाले याबाबत निश्चित माहिती अजूनतरी उपलब्ध नाही.

मध्यंतरी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र प्रिमियर लीग सुरु केली होती. त्या लीगचे सामने डेक्कन जिमखान्यावर असत.प्रवेश अर्थातच मोफत असे. मी आणि माझा मित्र आदित्य कुलकर्णी मोकळ्या वेळात हे सामने बघायला जात असू. असाच एक सामना बघत असताना हृषीकेश आमच्या शेजारी येऊन उभा राहिला होता. टोपी आणि गॉगलमुळे आम्ही त्याला ओळखले नाही. नंतर जेव्हा तो आमच्यासमोरून चालत गेला तेव्हा आदित्य मला म्हणाला,
“अरे हा बघ कानिटकर. च्यायला इतका वेळ आपल्या शेजारी उभा होता तरी कळलं नाही.”

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दादा असलेला, भारताकडून क्रिकेट खेळलेला हृषीकेश कुठलाही बडेजाव न मिरवता लोकल सामने बघत डेक्कन जिमखान्यावर निवांत फिरत होता.

१९९८ साली शाळा कॉलेजमध्ये असणाऱ्या आमच्या पिढीच्या बहुसंख्य मुलांनी हृषिकेशचा चौकार पाहिला असेलच. तीच पिढी आज मोठ्या संख्येने फेसबुक आणि ट्विटरवर आहे. कदाचित म्हणूनच पदापर्णानंतर जवळजवळ २० वर्षांनीसुद्धा हृषीकेश निवृत्त झाला त्यादिवशी फेसबुक आणि ट्विटरवर तो ट्रेंडिंग होता. त्या एका चौकारामुळे हृषिकेशची ओळख आयुष्यभरासाठी बदलून टाकली. येणाऱ्या अनेक वर्षांसाठी तो भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून दिलेला हिरोच असेल यात तिळमात्रही शंका नाही.

भारतातर्फे आजपर्यंत अनेक खेळाडूंनी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळले आहे. बरेच खेळाडू असे होते की ज्यांच्याकडे प्रतिभा होती, गुणवत्ता होती म्हणून त्यांची संघात निवड झाली. पुढे एखादा सामना किंवा एखादी मालिका सोडली तर हे खेळाडू फार काही करू शकले नाहीत आणि स्मृतीआड गेले. अशाच काही खेळाडूंच्या कारकिर्दीचा गोषवारा घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतून करणार आहे. पहिलीच वेळ आहे त्यामुळे काही चुका असतील तर सांभाळून घ्या. लेख वाचल्यानंतर प्रतिक्रिया कळविण्यास विसरू नका.. पुढच्या रविवारी अशाच एका विस्मृतीत गेलेल्या खेळाडूबद्दल..

गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

You might also like