fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

त्याच्या वडीलांनी त्याला सांगितले होते, काहीही झाले तरी बाद व्हायचे नाही. हेच लक्षात ठेवत त्याने २००२ ची नेटवेस्ट सिरिजचा अंतिम सामना खेळला. त्याला संघात खेळता यावे म्हणून द्रविडने यष्टीरक्षणाची जबाबदारीही सांभाळली. तो वरिष्ठ भारतीय संघाकडून विश्वचषक कधी जिंकू शकला नसला तरी त्याने १५ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. त्याला आजही भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणले जाते. तो क्रिकेटपटू म्हणजे मोहम्मद कैफ.

१ डिसेंबर १९८०ला उत्तरप्रदेशमधील अलाहबाद येथे एका सर्वसामान्य कुटुंबात मोहम्मद कैफचा जन्म झाला. त्याने वडील मोहम्मद तारिफ आणि मोठा भाऊ मोहम्मद सैफ हे क्रिकेट खेळायचे. हे दोघेही रणजी ट्रॉफीमध्ये खेळले आहेत. कैफचे वडील क्रिकेटपटू असल्याने त्याला आणि त्याच्या भावाला क्रिकेटचे बाळकडू लहानपणीच मिळाले होते. त्याच्या वडीलांनी ६० प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत. त्यामुळे कैफ आणि त्याचे भाऊ लहानपणी क्रिकेटकडे आकर्षित झाले. सुरुवातीला कैफ त्याच्या भावाला नेटमध्ये चेंडू टाकण्यासाठी वैगरे जायचा. त्यात घरी क्रिकेटला पोषक वातावरण असल्याने तो वडील आणि भावंडांबरोबर क्रिकेट सामनेही टीव्हीवर पहायचा. पुढे त्याची कानपूरमधील स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये १२ व्या वर्षी निवड झाली. तिथे त्याचा क्रिकेट सराव सुरु झाला. त्या हॉस्टेलमध्ये स्लाईड ग्राऊंड असल्याने कैफला निडर क्षेत्ररक्षण करण्याची सवय तिथेच लागली. पुढे त्याची १५ वर्षांखालील भारतीय संघातही त्याची निवड झाली. तो १९९६ ला १५ वर्षांखालील विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभव करत तो विश्वचषक जिंकला होता.

त्या विश्वचषकादरम्यान कैफबरोबर एक मजेशीर घटना घडली होती. झाले असे की त्याला हॉटेल रुममध्ये जाण्यासाठी रिसेप्शनिस्टकडून चावी हवी होती. त्यामुळे जास्त इंग्लिशचे ज्ञान नसलेला कैफ फक्त ‘की (Key)’ एवढेच म्हणाला, पण रिसेप्शनिस्टने त्याला योग्य वाक्य बोलून चावी मागण्यास सांगितली. त्यामुळे अखेर कैफ त्याच्या मित्राकडे गेला आणि त्याने थोडेफार इंग्रजी येणाऱ्या मित्राला सांगितले तूच चावी आण.

१५ वर्षांखालील विश्वचषकानंतर कैफने १९ वर्षांखालील विश्वचषकातही स्थान मिळवले. १९९८ ला १९ वर्षांखालील पहिला विश्वचषक खेळला. त्यावेळी संघात विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग हे खेळाडू देखील होते. त्यानंतर कैफने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही उत्तरप्रदेशकडून पदार्पण केले. १९९८-९९ च्या मोसमात कैफने रणजी ट्रॉफीमध्ये ४ सामन्यात १ अर्धशतकासह १४८ धावा केल्या. यानंतर त्याची २००० चा १९ वर्षांखालील विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. त्या विश्वचषकात कैफच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी करत अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले होते आणि पहिल्यांदाच १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. त्या विश्वचषकात कैफ बरोबरच युवराज सिंग, वेणूगोपाल राव, अजय रात्रा असे खेळाडूही खेळले. ज्यांनी पुढे जाऊन वरिष्ठ भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व केले. तसेच त्या विश्वचषकात भारतीय संघाने उपांत्य सामन्यात मायकल क्लार्क, शेन वॉटसन, मिशेल जॉन्सन अशा दिग्गजांचा समावेश असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले होते. त्यामुळे कैफ त्यावेळी खूप चर्चेत होता. त्यातच त्याने १९९९-०० च्या मोसमातही रणजी ट्रॉफीमध्ये केवळ ४ सामने खेळताना ६९.४० च्या सरासरीने १ शतक आणि २ अर्धशतकांसह ३४७ धावा केल्या होत्या.

त्यामुळे त्याला लगेचच भारताच्या वरिष्ठ संघातही स्थान देण्यात आले. त्याने २००० साली मार्चमध्ये बंगळुरु येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण या सामन्यात त्याला खास काही करता आले नाही. पुढे त्याला संघातून वगळण्यात आले. या एका सामन्यानंतर तो जवळ जवळ दीडवर्ष भारताकडून खेळला नाही. त्यावेळी त्याची बंगळुरुमध्ये स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या पहिल्या प्रशिक्षणार्थींच्या यादीत निवड झाली होती. त्या यादीत गंभीर, हरभजन, युवराज, मुरली कार्तिक, रतिंदर सोधी, झहीर खान यांचीही निवड झाली होती. देशांतर्गत क्रिकेट गाजवत असलेल्या कैफला नंतर पुन्हा श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळाली. त्या मालिकेनंतर त्याची वनडे संघातही निवड झाली. २००२ मध्ये कानपूर येथे २८ जानेवारीला कैफचे इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्पण झाले.

एव्हाना त्याने त्याच्या फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणानेही सर्वांना प्रभावित केले होते. खरंतर फलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षण हेच कैफसाठी त्याची जमेची बाजू होती. पण कैफच्या कारकिर्दीत महत्त्वाचा दिवस ठरला तो १३ जूलै २००२ ला झालेला नेटवेस्ट मालिकेचा अंतिम सामना. या सामन्यात इंग्लंडने ३२६ धावांचे भलेमोठे आव्हान भारताला दिले होते. तेव्हा भारताने १५० धावा करायच्या आतच ५ विकेट्स गमावल्या होत्या. पण कैफने युवराज सिंगबरोबर ६ व्या विकेटसाठी केलेल्या १२१ धावांची भागिदारी करत या सामन्याला रोमांचक वळण दिले होते. युवी बाद झाल्यावर कैफने हरभजन सिंग आणि झहीर खान यांना हाताशी घेत धावफलक हलता ठेवला होता. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात अखेर कैफ आणि झहीरने विजयी धाव घेत भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. त्या सामन्यात कैफने सर्वाधिक नाबाद ८७ धावांची खेळी केली होती. तसेच युवराजने ६७ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्यावेळी विजयानंतर गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्ट काढून विजयाचे सेलिब्रेशन केले होते. त्याच्या या सेलिब्रेशनची खूप चर्चा झाली होती. याबरोबर कैफ या विजयानंतर चांगलाच प्रकाशझोतात आला.

त्यावेळीचा एक गमतीदार किस्सा म्हणजे, ज्यावेळी या सामन्यात सचिन बाद झाला तेव्हा मैदानातील अनेक प्रेक्षक भारत सामना हरणार असे समजून मैदानातून निघून गेले होते. या प्रेक्षकांप्रमाणेच कैफचे कुटुंबियही सचिन बाद झाल्यानंतर टीव्ही बंद करुन घराजवळ असणाऱ्या थेटरमध्ये देवदास चित्रपट पहाण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यावेळी कैफची फलंदाजी लाईव्ह पाहिलीच नाही. पण जेव्हा भारताने हा सामना जिंकला तेव्हा अनेकजण त्यांच्या घरी आले होते. पण कुटुंबिय चित्रपट पहाण्यासाठी गेल्याने घराला कुलुप होते. तेव्हा घरी आलेल्यांना वाटले यांनी मुद्दामहुन कुलुप लावले आहे. पण जेव्हा त्यांना कळाले की ते चित्रपट पहाण्यासाठी गेले आहेत, तेव्हा सर्वांनी थेटरच्या बाहेर गर्दी केली. अखेर कैफच्या कुटुंबियांना चित्रपट अर्धवट सोडून बाहेर यावे लागले. तेव्हा त्यांना कळाले की कैफने सामना जिंकवला आहे. जेव्हा हा सामना जिंकून कैफ घरी आला तेव्हाही त्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत झाले होते.

या सामन्यानंतर कैफ भारतीय संघातील नियमित सदस्य बनला. त्यावेळी त्याला भारताचा कर्णधार असलेल्या गांगुलीकडून मोठा पाठिंबा मिळत होता. गांगुली त्याला म्हणायचा फलंदाजीत तू जरी ३० धावा केल्या आणि क्षेत्ररक्षणात तू जर २० धावा वाचवणार असशील तर तू नक्कीच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कैफही गांगुलीचा हा विश्वास खरा करत अनेकदा भन्नाट झेल घेत कधी चांगला थ्रो करत धावा वाचवत होता. त्यात असे असले तरी कसोटीत मात्र कैफला त्याची जागा पक्की करता आली नव्हती. २००१ नंतर तो कसोटीत थेट २००४ मध्ये खेळला. त्याआधी तो २००३ च्या विश्वचषकातही खेळला. भारत उपविजेता ठरलेल्या या विश्वचषकात कैफला खास काही करता आले नाही.

पण २००४ चा पाकिस्तान दौरा कैफसाठी सर्वोत्तम ठरला. या दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात त्याने कराची येथे ४६ धावांची खेळी केली होती. एवढेच नाही तर भारताकडून जबरदस्त क्षेत्ररक्षणही केले होते. ३५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला शेवटच्या ८ चेंडूत १० धावा हव्या होत्या. याचवेळी झहीर खानच्या चेंडूवर शोएब मलिकने मोठा फटका मारला. तेव्हा तो षटकार जाणार असे वाटत होते. पण त्याचवेळी हेमांग बदानी आणि कैफमध्ये चेंडू पकडण्याच्या नादात टक्कर होणार असे वाटत असताना कैफने ही टक्कर टाळत भन्नाट झेल घेतला आणि सामन्याला वळण दिले. शेवटच्या षटकात नेहराने केवळ ३ धावा दिल्याने भारत हा सामना ५ धावांनी जिंकला. त्यावेळी कैफने ‘कॅचेस विन द मॅचेस’ असं का म्हटलं जातं ते दाखवले होते.

त्याच मालिकेत पहिला सामना भारत जिंकल्यानंतर पाकिस्तानने पुढचे २ सामने जिंकत ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे चौथा सामना महत्त्वाचा होता. त्या सामन्यात द्रविड आणि कैफने नाबाद १३२ धावांची भागीदारी करत भारताला सामना जिंकून दिला होता. ती भागीदारी करत असताना एकावेळेला कैफची बॅटही तुटली होती. त्या बॅटवर सामना संपल्यावर द्रविडने एक संदेश लिहीला होता. त्याने लिहीले होते की ‘वेल प्लेड कैफ. द्रविड-कैफ पार्टनरशिप १३२ नॉटआऊट’. कैफ पुढे २००६ पर्यंत नियमितपणे भारताच्या वनडे संघाकडून खेळला. कसोटीत मात्र तो आत-बाहेर करत राहिला. त्याने कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका २००६ ला वेस्ट इंडिज विरुद्ध खेळली. या मालिकेत त्याने शतकही झळकावले. वनडेतही तो शेवटचे नोव्हेंबर २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्यानंतर त्याचा खराब फॉर्म आणि नंतर संघात आलेल्या युवा क्रिकेटपटूंमुळे पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवणे त्याला कठीण गेले.

असे असले तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला खेळ करत होता. त्याने उत्तर प्रदेशचे नेतृत्व करताना २००५-०६ च्या मोसमात रणजी ट्रॉफीचे विजेतेपदही मिळवले होते. अनेक वर्ष उत्तरप्रदेश कडून खेळल्यानंतर कैफ २०१४ नंतर आंध्रप्रदेशकडून खेळू लागला. त्या संघाचेही त्याने नेतृत्व केले. २०१५-१६ मोसमापर्यंत तो आंध्रप्रदेशकडून खेळला. नंतर त्याने मार्गदर्शक आणि खेळाडू म्हणून छत्तीसगढ़कडून खेळण्यास सुरुवात केली. कैफने १८६ प्रथम श्रेणी सामन्यात ३८.६० च्या सरासरीने १०२२९ धावा केल्या.

कैफ तसा खूप स्लेजिंक वैगरे करणारा खेळाडू नव्हता. पण तो शांत बसणाराही नव्हता. याबाबतचे त्याचे काही किस्से मनोरंजक आहेत. २००१ ला ऑस्ट्रेलिया जेव्हा भारत दौऱ्यावर आली होती तेव्हा नागपूरला सराव सामना सुरु होता. त्यावेळी युवा असलेल्या कैफने थेट स्टिव्ह वॉलाच स्लेजिंग करायला सुरुवात केली. तेव्हा काही कळायचे वय नसल्याने तो वॉ फलंदाजी करत असताना ‘गेट हीम आऊट, सेंड हीम बॅक’ असे म्हणत स्लेजिंग करत होता. त्यावेळी काहीवेळासाठी वॉ काही बोलला नाही. पण एका क्षणाला त्याने कैफकडे वळून एक भेदक नजर टाकली. ते पाहून मात्र नंतर कैफ घाबरला होता.

२००२ च्या नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावेळीही कैफ फलंदाजी करत असताना नासिर हुसेनने त्याला बस ड्राईव्हर वैगरे म्हणत डिवचले होते. पण कैफने त्यावेळी काही न बोलता सामना संपल्यावर हुसेनला याबाबत पुन्हा खडेबोल ऐकवले होते.

आणखी एक किस्सा म्हणजे २००५ ला इडन गार्डनवर पाकिस्तान विरुद्धचा सामना सुरु असताना कैफ त्या सामन्यात अंतिम ११ जणांमध्ये नव्हता, त्यामुळे तो राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आला होता. त्यावेळी पाकिस्तानचा युसुफ योहाना (आत्ताचा नाव बदललेला मोहम्मद युसुफ) त्यावेळी फलंदाजी करत होता. त्याने ८७ चेंडूत २२ धावा केल्या होत्या. त्याचा हा धीमा खेळ पाहुन कैफने त्याला स्लेजिंग करायला सुरुवात केली. तो म्हणाला, क्षेत्ररक्षकांनी आऊटफिल्डला थांबायलाच नाही पाहिजे कारण युसुफ बाऊंड्रीच मारत नाही. त्यानंतर जेव्हा अब्दुल रझाक फलंदाजीला आला तेव्हा कैफ त्याला म्हणाला, ‘गोलंदाजीच्या वेळीतर इतका बडबड करतो. आता नाही करणार का’. हा सामना भारत १९५ धावांनी जिंकला होता.

कैफने भारतीय संघातून वगळल्यानंतरही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळेणे सुरु ठेवले होते. त्याने आयपीएलमध्येकी सुरुवातीचे काही मोसम खेळले. पहिल्या मोसमात तर तो राजस्थान रॉयल्सचा सर्वात महागडा खेळाडू होता. त्यानंतर त्याने किंग्स इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांचेही प्रतिनिधित्व केले. पण तो आयपीएलमध्ये खूप यशस्वी होऊ शकला नाही.

यादरम्यान २०१४ च्या लोकसभा निवडणूकीतही तो उभा राहिला होता. पण त्याचा पराभव झाल्याने त्याने राजकारणाचा रस्ता सोडून देत पुन्हा क्रिकेटकडे मोर्चा वळवला होता.

Photo Courtesy: Twitter/ DelhiCapitals

अखेर कैफने २०१८ मध्ये १३ जूलैला म्हणजेच २००२ ला झालेल्या नेटवेस्ट ट्रॉफीच्या विजेतेपदाला १६ वर्ष पूर्ण झाली त्यादिवशी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने त्यानंतर आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. तर अनेकदा आता तो समालोचन करतानाही दिसतो. एकवेळी कर्णधारपदाचा दावेदार समजला जाणारा कैफ खराब फॉर्ममुळे चांगला फिटनेस असतानाही भारतीय संघात टीकू शकला नाही. पण त्याच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाने त्याने चाहत्यांच्या मनात कायमचे आदराचे स्थान मिळवले. जे आजही कायम आहे. आजही भारताचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असे म्हटल्यावर त्याचे नाव आल्याशिवाय राहत नाही.

याच लेखमालेतील अन्य लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

You might also like