इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात काल न्यूझीलंडने अतिशय नाट्यमयरीत्या कसोटी सामना वाचवला. याबरोबर २ सामन्यांची मालिकाही १-० अशी जिंकली.
एकवेळ ७ बाद २१९ अशी अवस्था असताना ईश सोधी आणि निल वॅग्नर यांनी टिच्चून फलंदाजी करताना संघाला पराभवापासून वाचवले. त्यांनी ५व्या दिवशी चक्क ३१.२ षटके खेळून काढली.
ईश सोधीने निल वॅग्नरला हाताशी धरत किल्ला लढवला. २०१ मिनीटं फलंदाजी करताना सोधीने १५८ चेंडूत संयमी ५६ धावांची खेळी केली.
त्याला तेवढीच चांगली साथ दिली ती निल वॅग्नरने. १०६ मिनीटं फलंदाजी करताना निल वॅग्नरने १०३ चेंडूत केवळ ७ धावा केल्या. तो शेवटच्या चेंडूवर बाद झाला. तो बाद झाल्यावर पंचांनी लगेच दिवसाचा खेळ संपला असे घोषीत केले.
याच कामगिरीमुळे आज घोषीत झालेल्या आयसीसी क्रमवारीत पारंपारीक प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलियाला मागे टाकत न्यूझीलंड कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आला.
आयसीसी दरवर्षी कसोटी क्रमवारीप्रमाणे संघांना बक्षिस देते. त्यासाठी यावर्षी ३ एप्रिल २०१८ ही तारीख आयसीसीने आधीच घोषीत केली होती आणि कालच (३ एप्रिल ) बरोबर न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध हा कारनामा केला. त्यामुळे न्यूझीलंडचे कसोटीत १०२.२६३ तर आॅस्ट्रेलियाचे १०२.२०० गुण झाले.
केवळ काही दशांश गुणाच्या फरकाने न्यूझीलंडने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आणि तिसऱ्या क्रमांकाचे २,००,००० डाॅलर मिळवले.
जर ईश सोधीने निल वॅग्नर जोडीने काल ३ तास हा किल्ला लढवला नसता तर त्या सामन्यात पराभव झाल्यामुळे न्यूझीलंड चौथ्या स्थानीच कायम राहिले असते आणि त्यांना केवळ १,००,००० डाॅलर मिळाले असते.
यामुळे त्यांना तब्बल १,००,००० डाॅलरचा फायदा झाला होऊन त्यांना एकूण २,००,००० डाॅलर आयसीसीकडून मिळाले.