आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना डब्लिनमधील द व्हिलेज येथे खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने अवघ्या एका धावेने विजय मिळवला. ३६१ धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना आयर्लंडचे फलंदाज केवळ एक धाव काढू शकले. न्यूझीलंडने सामना जिंकला असला तरी, आयर्लंडचे सर्वाधिक कौतुक केले जात आहे. मात्र, त्याचवेळी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने मारलेल्या एका षटकाराचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय.
न्यूझीलंडने जिंकला सामना
या सामन्यात लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय सर्व फलंदाजांनी सार्थ ठरवला. अनुभवी सलामीवीर मार्टिन गुप्टिलने आपल्या वनडे कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. त्याचबरोबर फिन ऍलन, ग्लेन फिलिप्स व हेन्री निकोल्स यांचे देखील महत्वपूर्ण योगदान राहिले. या बळावर न्यूझीलंडने ३६० धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, आयर्लंडसाठी अनुभवी पॉल स्टर्लिंगने झंझावाती शतक ठोकले. त्याच्याप्रमाणेच मधल्या फळीतील युवा फलंदाज हॅरी टेक्टरने मालिकेतील दुसरे शतक झळकावण्याचा मान मिळवला. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर अखेरीच्या फलंदाजांना विजय मिळवून देण्यात अपयश आले. त्यामुळे आयर्लंडला सामना एका धावेने गमवावा लागला. याच बरोबर न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडला व्हाईट वॉश दिला.
https://www.instagram.com/reel/CgDQ55rlCf0/?igshid=YmMyMTA2M2Y=
लॅथमचा खळखट्याक सिक्स
मालिकेतील अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने देखील आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लॅथमने २६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३० धावा केल्या. यादरम्यान त्याने मारलेला एक षटकार सीमारेषेच्या काहीशा जवळ असलेल्या काचेच्या केबिनवर लागला. हा व्हिडिओ या मालिकेचे प्रसारण करणाऱ्या स्पार्क स्पोर्ट्सने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
सचिनचा रेकॉर्ड आता मोहम्मद शमी तोडणार, कर्णधार रोहितकडेही विक्रम रचण्याची संधी
खराब फॉर्मातील विराट करू लागला ‘राम’ नामाचा जप, अनुष्कासोबतचा फोटो व्हायरल