भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये कानपूर येथे सुरू असलेला पहिला कसोटी सामना रोमांचक घडीवर आहे. पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतलेल्या भारतीय संघाने त्यांचा दुसरा डाव २३४ धावांवर घोषित केला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी २८५ धावांचे आव्हान मिळाले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना पाचव्या दिवसातील दुसऱ्या सत्रापर्यंत न्यूझीलंडला संघ १२५ धावा जोडू शकला. यात सलामीवीर टॉम लॅथम याच्या अर्धशतकी खेळीचाही समावेश आहे. या अर्धशतकासह त्याने एक खास विक्रमही केली आहे.
२९ वर्षीय लॅथमने सलामीला फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात धावांची पन्नाशी पार केली. त्याने १४६ चेंडूंमध्ये ३ चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. भारतीय फिरकीपटू आर अश्विन याने त्याला त्रिफळाचीत करत त्याच्या खेळीवर अंकुश लावला. तत्पूर्वी न्यूझीलंडच्या पहिल्या डावातही लॅथमने अर्धशतक ठोकले होते. या डावात त्याने २८२ चेंडूंचा सामना करताना १० चौकारांच्या मदतीने तब्बल ९५ धावा जोडल्या होत्या. यावेळी तो भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलचा शिकार बनला होता.
अशाप्रकारे दोन्ही डावात अर्धशतके झळकावत लॅथम हा वर्ष २०११ नंतर भारतात भारताविरुद्ध कसोटी सामन्यातील दोन्ही डावात धावांची पन्नाशी गाठणारा जगातील पहिलाच सलामीवीर ठरला आहे. त्याच्यापूर्वी कोणत्याही सलामीवीराला हा पराक्रम करता आलेला नाही.
याबरोबरच भारतात भारताविरुद्ध कसोटी सामन्यातील दोन्ही डावात ५० किंवा त्यापेक्षा धावा करणारा तो न्यूझीलंडचा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी नाथन ऍस्टल आणि क्रेग मॅकमिलन यांनी हा कारनामा केला होता. या दोन्ही खेळाडूंनी २००३ मधील अहमदाबाद कसोटीत ही कामगिरी केली होती.
लॅथमच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीवर नजर टाकायची झाल्यास, या यष्टीरक्षक फलंदाजाने २०१४ साली आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत ६० कसोटी सामने खेळताना ४१ च्या सरासरीने त्याने ४०५६ धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान २६४ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली आहे. तसेच त्याने कसोटीत ११ शतके आणि २० अर्धशतकेही केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एकमेवाद्वितीय! तब्बल ११ देशात कसोटी शतक करणारा एकमेव क्रिकेटर