भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. ही मालिका रंगतदार होईल, असे अनेकांनी मत मांडले आहे. कारण भारतीय संघ काहीदिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकून परतला आहे, तर इंग्लंड संघाने श्रीलंकेला श्रीलंकेत कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. त्यामुळे दोन्ही संघ आत्मविश्वासाने पूर्ण भरलेले आहेत. त्यातही भारतीय संघात काही युवा खेळाडू आहेत, ज्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताकडून कसोटीत एकूण ५ क्रिकेटपटूंनी पदार्पण केले आहे. त्यातील ३ खेळाडूंचा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या २ सामन्यांसाठीही भारताच्या कसोटी संघात समावेश आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध हे युवा क्रिकेटपटू कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
या लेखात आपण ४ अशा युवा खेळाडूंच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीबद्दल जाणून घेऊ, जे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी भारताच्या संघात आहेत.
४. शुबमन गिल – भारताकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फलंदाजीत युवा खेळाडूंपैकी कोणी प्रभावी कामगिरी केली असेल तर तो शुबमन गिल आहे. गिलने भारताकडून मेलबर्न कसोटीतून पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने ४५ आणि नाबाद ३५ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने २ अर्धशतकेही झळकावली. यात ब्रिस्बेन येथे केलेल्या महत्त्वपूर्ण ९१ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. तसेच तो या कसोटी मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज होता. त्याने ६ डावात मिळून ५१.८० सरासरीने २५९ धावा केल्या होत्या.
त्यामुळे ऑस्ट्रेलियात पदार्पणाच्या कसोटी मालिकेत प्रभाव पाडणाऱ्या गिलची इंग्लंडविरुद्ध मायदेशात कशी कामगिरी होणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.
३. वॉशिंग्टन सुंदर – अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरने ब्रिस्बेन कसोटी केलेल्या त्याच्या अष्टपैलू खेळाने अनेकांना थक्क केले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात स्थानही मिळाले. सुंदरने ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच पहिल्या डावात ३ विकेट्स घेतल्या.
तसेच भारताकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना महत्त्वपूर्ण ६२ धावांची खेळी साकारली. ही खेळी साकारताना त्याने शार्दुल ठाकूरसह सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी केली. याबरोबरच त्याने भारताच्या दुसऱ्या डावातही महत्त्वपू्र्ण २२ धावांची खेळी करत रिषभ पंतला योग्य साथ दिली होती. याबरोबरच त्याने गोलंदाजीत दुसऱ्या डावात १ विकेटही घेतली होती. त्याच्या या खेळामुळे त्याचे कौतुकही भरपूर झाले होते. त्यामुळे आता त्याच्याही कामगिरीकडे लक्ष राहाणार आहे.
२. मोहम्मद सिराज – ऑस्ट्रेलिया दौऱ्यात युवा खेळाडूंपैकी सर्वाधिक प्रभावशाली कामगिरी कोणी केली असेल तर तो म्हणजे मोहम्मद सिराज. त्याच्यासाठी हा ऑस्ट्रेलिया दौरा अनेक अर्थांनी भावनिक ठरला. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचून आठवडाही झाला नव्हता की, सिराजचे वडिल मोहम्मद गौस यांचे निधन झाल्याची दु:खद घटना घडली होती. तरीही आपल्या काळजावर दगड ठेवत त्याने भारतात न परतण्याचा कठीण निर्णय घेतला होता.
यानंतर त्याने वडिलांची आठवण ठेवत भारताकडून कसोटीत शानदार कामगिरी केली. सिराजने मेलबर्न कसोटीतून पदार्पण करताना पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ३ अशा मिळून एकूण ५ विकेट्स घेतल्या. तसेच त्या पुढील सामन्यात सिडनी येथे त्याने २ विकेट्स घेतल्या. तसेच ब्रिस्बेन कसोटीत त्याने पहिल्या डावात १ आणि दुसऱ्या डावात ५ अशा मिळून ६ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत ३ सामन्यात १३ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
दरम्यान भारताचे मुख्य गोलंदाज शेवटच्या ब्रिस्बेन कसोटीतून बाहेर झाल्याने त्याने भारताच्या गोलंदाजी फळीचे नेतृत्वही केले. त्यामुळे आता तो इंग्लंडविरुद्ध कसोटीत कशी कामगिरी करणार हे पाहावे लागेल.
१. शार्दुल ठाकूर – शार्दुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ब्रिस्बेन कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यातून शार्दुलने २ वर्षांनी कसोटीत पुनरागमन केले होते. त्याआधी शार्दुलने सन २०१८ ला १ कसोटी सामना खेळला होता. मात्र, त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता.
पण, त्यानंतर ब्रिस्बेन कसोटीत मात्र त्याने शानदार कामगिरी करताना सर्वांची वाहवा मिळवली. शार्दुलने भारताकडून फलंदाजी करताना पहिल्या डावात ११५ चेंडूत ६७ धावा केल्या होत्या. तसेच त्याने ६२ धावा करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर बरोबर १२३ धावांची भागीदारीही केली होती. त्याचबरोबर त्याने गोलंदाजीतही शानदार कामगिरी केली. त्याने गोलंदाजी करताना पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या.
आता त्याला इंग्लंडविरुद्ध चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीही भारतीय संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे तो आता कशी कामगिरी करतो हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
PAK vs SA : फिरकीच्या जाळ्यात फसला पाहुणा संघ, कराची कसोटीत पाकिस्तानचा दमदार विजय
इंग्लंडकडे काही दमदार खेळाडू आहेत, जे भारताला देऊ शकतात आव्हान, माजी दिग्गजाचे भाष्य
“रिषभ पंत भविष्यातील स्टार”, भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकांनी केली मुक्तकंठाने प्रशंसा