इंडियन प्रीमियर लीगमध्ये षटकार-चौकारांचा वर्षाव पाहायला न मिळणे म्हणजे पूर्व दिशेऐवजी पश्चिमेला सूर्य उगवण्यासारखे आहे. अर्थातच आयपीएल म्हटले की फलंदाजांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच.
संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या आयपीएल २०२०पुर्वी असे म्हटले जात होते की, तेथील मैदाने आकाराने मोठी आहेत. त्यामुळे फार क्वचित षटकार किंवा चौकार पाहायला मिळतील. परंतु, आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या बऱ्याच विस्फोटक फलंदाजांनी ही गोष्ट खोटी ठरवली. कित्येक अनुभवी खेळाडूंपासून ते युवा धुरंधरापर्यंतचे चेंडू सीमारेषेबाहेर गेलेले पाहायला मिळाले आहेत. मात्र यंदा सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांमध्ये परदेशी खेळाडूंपेक्षा जास्त भारतीय खेळाडूंचा वचक पाहायला मिळाला आहे.
या लेखात आम्ही, आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या टॉप-५ फलंदाजांची माहिती दिली आहे.
आयपीएलच्या १३व्या हंगामात सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज –
१) शिखर धवन –
आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासात सलग २ शतके लगावणारा एकमेव खेळाडू म्हणजे शिखर धवन. दिल्ली कॅपिटल्सच्या या सलामीवीर फलंदाजाने आयपीएल २०२०मध्ये नेत्रदिपक प्रदर्शन केले आहे. यासह सर्वाधिक धावा करण्याबरोबरच सर्वाधिक चौकार लगावण्याच्या विक्रमातही त्याने बाजी मारली आहे. पूर्ण हंगामातील १७ सामन्यात ६७ चौकार मारत तो या यादीत अव्वल स्थानावर विराजमान आहे.
२) सूर्यकुमार यादव –
मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव यावर्षी जबरदस्त लयीत असल्याचे दिसत आहे. त्याने या हंगामात दमदार फलंदाजी करत कित्येक चाहत्यांच्या मनात घर केले आहे. गोलंदाजांच्या खराब चेंडूचा फायदा घेत ४ किंवा ६ धावा खिशात घालण्यातही तो माहीर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये १६ सामन्यात त्याने मारलेल्या ६१ चौकारांवरुन ही गोष्ट स्पष्ट होते. आपल्या ६१ चौकारांसह सूर्यकुमार आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक चौकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
३) केएल राहुल –
किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या या शिलेदाराने चौकार मारण्याच्या विक्रमात टॉप-५मध्ये आपले नाव नोंदवले आहे. त्याने या हंगामातील १४ सामन्यात ५८ चौकार ठोकत हा पराक्रम केला आहे.
४) डेविड वॉर्नर –
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेविड वॉर्नर याला त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. वॉर्नरने आयपीएलच्या तेराव्या हंगामात १३४.६४च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. त्याने एकूण १६ सामने खेळले असून ५०० धावांचा आकडा पार केला आहे. दरम्यान त्याने ५२ चौकारही लगावले आहेत. यासह तो आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारा चौथा फलंदाज ठरला आहे.
५) देवदत्त पडीक्कल –
युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल याने आयपीएल २०२०मधील शानदार प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले आहे. हा अनकॅप खेळाडू चौकार-षटकार लगावण्याच्या बाबतीतही कमी पडलेला नाही. त्याने सर्वाधिक चौकार मारण्याच्या विक्रमात टॉप-५मध्ये असलेल्या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. तो या हंगामातील १५ सामन्यात ५१ चौकार ठोकत या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
ट्रेंडिंग लेख-
दांडीगुल गोलंदाजीचा शेर! मुंबईचा ‘हा’ धुरंधर ठरणार पाचव्या जेतेपदाचा शिल्पकार
…आणि क्रिकेटविश्वाला पहिली ‘डबल सुपर ओव्हर’ आयपीएलने दिली
महत्त्वाच्या बातम्या-
जर आयपीएलचा अंतिम सामना टाय झाला तर…
‘दिल्ली कॅपिटल्स माझ्या नि:शुल्क सल्ल्याचा फायदा घेत आहे’, अंतिम सामन्याआधी सेहवागची प्रतिक्रिया
IPL FINAL: रोहित, धवन, पोलार्ड यांच्याकडे असेल कीर्तिमान स्थापन्याची संधी; पाहा काय आहे खास आकडेवारी