4 जूनपासून महाराष्ट्र प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम सुरु होत आहे. 18 दिवसांत तब्बल 34 सामन्यांची मेजवाणी क्रिकेटप्रेमींना या माध्यमातून मिळणार आहे. महाराष्ट्रातील दिग्गज क्रिकेटपटू 22 जून रोजी एमपीएल ट्रॉफी उंचवण्यासाठी आपल्या जीवाचं रान करताना दिसतील. रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स आणि कोल्हापूर टस्कर्स हे 6 संघ यावेळी विजेतेपदासाठी जीवाचं रान करताना दिसतील. रत्नागिरी जेट्स संघ दोन वेळा ही स्पर्धा जिंकला आहे. (Top 5 Run Scorers in Maharashtra Premier League 2024 – Most Runs in MPL 2024)
गतवर्षी (2024) या लीगमध्ये तुफानी फटकेबाजी पहायला मिळाली. अंकित बावणेने सलग दुसऱ्या वर्षी ऑरेंज कॅपचा मान मिळवला. जरी त्याच्या संघाला विजेतेपद मिळवता आले नसले तरीही तो दोनही हंगामातील अव्वल फलंदाज ठरला. त्याने 2024 हंगामात 12 सामन्यात 51.88च्या सरासरीने 415 धावा केल्या. यात त्याने 4 खणखणीत अर्धशतके लगावली होती.
अंकित पाठोपाठ त्याचाच संघसहकारी असलेल्या राहुल त्रिपाठीने कोल्हापूरकडून खेळताना 10 सामन्यात 383 धावा केल्या. यात त्याच्या 3 अर्धशतकांचा समावेश होता. तिसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजी किंग्जचा ओम भोसले होता. त्याने 11 सामन्यात 42.22च्या सरासरीने 4 अर्धशतकांच्या मदतीने 380 धावा केल्या. रायगड रॉयल्सच्या सिद्धेश वीरने 43.63च्या सरासरीने 10 सामन्यात 349 धावा केल्या. ईगल नाशिक टायटन्सच्या अथर्व काळेने 13 सामन्यात 48.14च्या सरासरीने 337 धावा केल्या.
याशिवाय ओंकार खाटपे (324), रुतुराज गायकवाड (313) आणि अर्शिन कुलकर्णी (307) हे तीनशेहून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरले.
हा सीझनला फॅन्सला एंट्री फ्री
MPLचे सर्व सामने तसेच WMPLचेही सर्व सामने यावेळी प्रेक्षकांना स्टेडियमवर जाऊन मोफत पाहता येणार आहे. याची माहिती यापुर्वी एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. तसेच फॅन्सने मोठ्या संख्येने स्टेडियमवर येऊन आपली टीम तसेच आवडत्या खेळाडूला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. हे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पुण्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होतील.
घरबसल्या पाहता येणार सामने
ओटीटी प्लॅटफॉर्म जीओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना MPL व WMPLचे सामने घरबसल्या पहायला मिळणार आहेत. तसेच स्टारस्पोर्ट्स चॅनेलवर टीव्हीच्या माध्यमातूनही सामने पहायला मिळणार आहेत. आपल्या गावातील, शहरातील क्रिकेटपटूला थेट टीव्हीवर पहाण्याचा आनंद प्रेक्षकांना या माध्यमातून घेता येईल.






