होय नाही म्हणता म्हणता अखेर आयपीएलचा १३ वा हंगाम पार पडला. हा हंगाम कोरोनाच्या संकटामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडला. या हंगामाचे मुंबई इंडियन्सने विजेतेपद जिंकले. हा आयपीएल हंगाम अनेक कारणांमुळे गाजला. कधी सुपर ओव्हरमुळे, कधी फलंदाजांच्या धूंवाधार फलंदाजीमुळे तर कधी गोलंदाजांना केलेल्या शानदार कामगिरीमुळे. पण याबरोबरच काही वादही या हगांमात झाले.
हे वाद कधी मैदानावरील तर कधी मैदानाबाहेरील होते. यामुळे आयपीएल आणि वाद ही गोष्ट चाहत्यांनाही काही नवीन नाही. आत्तापर्यंत जवळजवळ प्रत्येक आयपीएल मोसमात काही ना काही लहान-मोठे वाद समोर आले आहेत. या लेखात आपण आयपीएल २०२० मध्ये झालेल्या हंगामातील ५ वादांचा आढावा घेऊ.
१. शॉर्ट रन –
या आयपीएल हंगामातील दुसऱ्याच सामन्यात एक वाद झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात पार पडला. या सामन्यात १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात मयंक अगरवाल आणि ख्रिस जॉर्डनने दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण पंच नितिन मेनन यांना वाटले की जॉर्डनने पहिली धाव घेताना बॅट क्रिजच्या आत टेकवली नाही. त्यामुळे त्यांनी ती शॉर्ट रन घोषित केला.ज्यामुळे पंजाबला केवळ १ धाव मिळाली.
पण नंतर जेव्हा रिप्लेमध्ये पाहिले तेव्हा ती धाव अर्धी (शॉर्ट रन) नसल्याचे लक्षात आले. तो सामना निर्धारित २०-२० षटकांनंतर बरोबरीत सुटला होता. अखेर सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने हा सामना जिंकला. पण जर पंजाबला त्या शॉर्न रनवर पूर्ण धाव मिळाली असती तर कदाचीत तो सामना पंजाबच्या नावावर झाला असता.
२. एकाच चेंडूवर दोनदा रिव्ह्यू –
२२व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबला ६९ धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात एक अनोखी गोष्ट पहायला मिळाली, ती म्हणजे एकाच चेंडूवर २ रिव्ह्यू घेण्यात आले. ही गोष्ट पंजाब संघ हैदराबादने दिलेल्या २०२ धावांचा पाठलाग करत असताना घडली. १४ व्या षटकात हैदराबादकडून खलील अहमद गोलंदाजी करत होता. यावेळी त्याने पाचवा चेंडू फुल लेंथचा टाकला. त्यावेळी पंजाबकडून फलंदाजी करत असलेल्या मुजीब उर रेहमानने बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो चेंडू बॅटच्या जवळून जात यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोच्या हातात गेला.
त्यामुळे बेअरस्टो आणि अन्य हैदराबादच्या खेळाडूंनी यष्टीमागे झेलबादचे अपील केले. यावेळी हैदाराबादला वाटत होते की चेंडू बॅटची कड घेऊन बेअरस्टोच्या हातात गेला आहे. पण त्यावेळी पंचांनी नाबाद दिले. पण काही क्षणातच मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना बंपबॉलची शंका होती. पण रिव्ह्यूमध्ये दिसले की चेंडू हलकासा बॅटची कड घेऊन बेअरस्टोच्या हातात गेला आहे. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी मुजीबला बाद दिले. पण यावेळी मैदानावरील पंचांनी रिव्ह्यू घेतलेला असल्याने त्यात अल्ट्रा एज दाखवले गेले नाही.
त्यावेळी तिसऱ्या पंचांनी मुजीबला बाद दिल्यानंतर तो काही पावले पुढे गेला आणि पुन्हा मागे येऊन त्याने डिआरएसची मागणी केली. हे पाहून सर्वच जण चकीत झाले. यावेळी समालोचन कक्षात अशीही चर्चा झाली की कदाचीत ड्रेसिंगरुममधून कोणीतरी त्याला डिआरएस घेण्यास सुचवले. यावेळी फलंदाजाने रिव्ह्यू घेतल्याने अल्ट्रा एज दाखवण्यात आले, आणि त्यात मुजीबच्या बॅटला चेंडू लागल्याचे स्पष्ट झाले. अखेर मुजीबला पॅव्हेलियनमध्ये परतावेच लागले. मात्र या घटनेची क्रिकेटवर्तुळात बरिच चर्चा झाली.
३. सुनील गावसकर विरुद्ध अनुष्का शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघात आयपीएलचा सहावा सामना पार पडला. यावेळी समालोचन करताना गावसकरांनी बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचे नाव घेऊन टिप्पणी केली होती. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलींगला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात समालोचन करत असलेले गावसकर विराटच्या खराब कामगिरीमुळे गमतीने बोलताना म्हणाले होते की, “त्याने लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काने फेकलेल्या चेंडूचाच सराव केला आहे.”
गावसकरांच्या या वक्तव्यावर भडकलेल्या अनुष्कानेही तिच्या अधिकृत इस्टाग्राम अकाउंटवरुन प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर गावकसकरांनीही दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात दुबई येथे झालेल्या सामन्यादरम्यान या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले होते.
“मी विराट-अनुष्काविषयी कसलेही अश्लिल भाष्य केले नाही. मी केवळ लॉकडाऊनमध्ये अनुष्काच्या गोलंदाजीवर विराटने केलेल्या फलंदाजीचा उल्लेख केला होता. पण अनेकांनी याचा वेगळा अर्थ घेतला. मी जे काही बोललो होतो, ते पुन्हा तुमच्या कानाने लक्ष देऊन ऐका, डोळ्याने पहा आणि नंतरच बोला,” असा सल्ला गावसकरांनी ट्रोलर्सला दिला होता.
४. मुंबई इंडियन्सवर फिक्सिंगचे आरोप –
या हंगामादरम्यान एका ट्विटमुळे मुंबई इंडियन्सवर चाहत्यांनी फिक्सिंगचे आरोप केले. झाले असेल की २७वा सामना मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक होऊन सामन्याची सुरुवात झाल्यानंतर जवळपास ८ मिनिटांनी मुंबई संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केले.
त्या ट्विटमध्ये त्यांनी दिल्ली संघ मुंबईला किती धावांचे आव्हान देईल, याचा अंदाज वर्तवला होता. “पॅटिसन आणि बोल्ट दोघे पावरप्लेमध्ये गोलंदाजी करतील. खाली दिल्ली संघ १९.५ षटकात ५ विकेट्स गमावत १६३ धावा करेल,” असे त्यांनी लिहिले होते. पण आश्चर्याची बाब ही ठरली की, दिल्लीनेही मुंबईविरुद्धच्या त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १६२ धावा केल्या. म्हणजे मुंबईने ट्विटमध्ये दिलेल्या धावसंख्येच्या जवळपास त्यांनी धावा केल्या.
त्यानंतर मात्र चाहत्यांनी मुंबईला त्यांच्या ट्विटवरुन दिल्लीविरुद्धची मॅच फिक्स केल्याचे आरोप करायला सुरुवात केली. पाहता-पाहता चाहत्यांनी मुंबईला ट्विटरवर ट्रोल करायला सुरुवात केली. हे पाहता मुंबईने ते ट्विट डिलिट केले.
https://twitter.com/VickyVjMsd/status/1315316455290798080
५. धोनी झाला ट्रोल –
१३ ऑक्टोबरला दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या संघात झालेल्या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी चाहत्यांच्या निशाण्यावर आला. हैदराबादचा संघ चेन्नईने दिलेल्या १६८ धावांचा पाठलाग करत असताना १९ वे षटक चेन्नईकडून वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर टाकत होता. त्याने षटकातील दुसरा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्नात वाईडच्या रेषेबाहेर टाकला. पण मैदानावरील पंच पॉल रेफेल वाईडचा निर्णय देत असतानाच धोनी आणि शार्दूल यांनी हातवारे करून विरोध केला. धोनी आणि शार्दूलने केलेला विरोध पाहून पंचानी वाईड चेंडू असा निर्णय देण्यासाठी वर घेतलेला हात पुन्हा खाली घेतला आणि तो चेंडू वाईड असल्याचा निर्णय दिला नाही.
https://twitter.com/ac89_tweets/status/1316087323302547457
पंचाच्या त्या वादग्रस्त निर्णयाविरुद्ध आणि धोनीच्या हावभावांविरुद्ध अनेकांनी नाराजी व्यक्त केली.