क्रिकेटमध्ये जसे फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू क्रिकेटपटू महत्त्वाचे असतात तसेच यष्टीरक्षकही महत्त्वाचा असतो. यष्टीरक्षकाची भूमिका क्रिकेट सामन्यांमध्ये बऱ्याच दृष्टीने महत्त्वाची ठरत असते. यष्टीरक्षक एकप्रकारे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा दुसरा कर्णधारच असतो. कारण तो ज्या जागेवर उभा असतो तिथून त्याला सगळीकडे लक्षही ठेवता येते, तसेच फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांच्या जवळही तोच असतो. त्यामुळे यष्टीरक्षक हा कोणत्याही संघासाठी महत्त्वाचा भाग असतो.
आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऍडम गिलख्रिस्ट, मार्क बाऊचर, कुमार संगकारा, एमएस धोनी, ऍलेक स्टिवर्ट असे अनेक दिग्गज यष्टीरक्षक होऊन गेले आहेत. पण काही क्रिकेटपटू असे आहेत की ज्यांना अचानकपणे यष्टीरक्षकाची भूमिका त्यांच्या संघासाठी निभवावी लागली. हे क्रिकेटपटू मुळ यष्टीरक्षक नाहीत पण एक किंवा थोड्या सामन्यांसाठी त्यांना संघासाठी ही भूमीका स्विकारावी लागली. अशाच ५ क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
अचानकपणे यष्टीरक्षकाची भूमिका स्विकारावी लागेलेले ५ क्रिकेटपटू –
५. मार्कस ट्रेस्कोथिक –
इंग्लंडचा माजी सलामीवीर फलंदाज मार्कस ट्रेस्कोथिकने २००० ते २००६ दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना अनेकदा शानदार खेळी केल्या. त्याने ७६ कसोटीत ५८२५ धावा, १२३ वनडेत ४३३५ धावा केल्या. ट्रेस्कोथिक हा जसा चांगला सलामीवीर फलंदाज होता, तसाच तो चांगला स्लिपला क्षेत्ररक्षण करायचा. याबरोबरच तो कधीतरी गोलंदाजीही करायचा.
पण अनेकांना हे माहित नाही की त्याने ५ वनडे सामन्यांमध्ये यष्टीरक्षकाची भूमिकाही निभावली आहे. त्याने सर्वात आधी यष्टीरक्षण २००२ ला भारताविरुद्धच्या कानपूर वनडेत केले होते. त्यानंतर त्याने त्याचवर्षी न्यूझीलंड दौऱ्यात ४ वनडे सामन्यांमध्ये यष्टीरक्षण केले होते. त्याने यष्टीरक्षक म्हणून ४ झेल घेतले आहेत.
४. सलीम मलिक –
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलीम मलिक हा १९९२ विश्वचषक जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाचा सदस्य होता. त्याने १९८२ ते १९९९ च्या दरम्यान १०३ कसोटी खेळले, त्यात त्याने ५७६८ धावा केल्या आहेत. तसेच त्याने २८३ वनडे सामने खेळले असून त्यात ७१७० धावा केल्या आहेत. याबरोबरच ८९ वनडे विकेट्सही घेतल्या आहेत. पण त्याची कारकिर्द मॅच फिक्सिंगमध्ये अडकल्याने संपली.
तो एक चांगला फलंदाज म्हणून ओळखला गेला असला तरी त्याने एका सामन्यात यष्टीरक्षण केले आहे. २३ ऑक्टोबर १९८९ ला त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एमआरएफ वर्ल्डसिरिजमध्ये मुंबई येथे खेळताना यष्टीरक्षण केले होते. त्या सामन्यात त्याने १ झेलही घेतला होता.
३. जस्टिन लँगर –
जस्टिन लँगर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंमधील एक नाव. त्यांनी सलामीवीर म्हणून मोठी कारकिर्द घडवली. त्यांनी १०५ कसोटी सामने खेळताना त्यांनी ४५.२७ च्या सरासरीने ७६९६ धावा केल्या. वनडेमध्ये त्यांनी ८ सामने खेळताना १६० धावा केल्या. ते २००० च्या दशकातील बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातील या प्रमुख सदस्य होते.
ते चांगले क्षेत्ररक्षकही होते. बऱ्याचदा ते स्लिपला क्षेत्ररक्षण करत. पण त्यांच्या वनडे कारकिर्दीतील ८ सामन्यांपैकी ४ सामन्यात ते यष्टीरक्षक होते. १९९४ ला ४ वनडे सामन्यात यष्टीरक्षण केले होते. यावेळी त्यांनी यष्टीरक्षक म्हणून १ झेल घेतला होता आणि १ यष्टीचीत केले होते.
२. गॅरी कर्स्टन –
दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन यांनी खेळाडू म्हणून कारकिर्द घडवल्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. प्रशिक्षक म्हणूनही ते यशस्वी ठरले. त्यांनी खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०१ कसोटी सामने आणि १८५ वनडे सामने खेळले. कसोटीत त्यांनी ७२८९ धावा तर वनडेत ६७९८ धावा केल्या.
कर्स्टन चांगेल क्षेत्ररक्षकही होते. पण त्यांनी एका वनडे सामन्यात यष्टीरक्षकाची भूमीका निभावली होती. त्यांनी १४ डिसेंबर १९९६ ला मुंबई येथे भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात यष्टीरक्षण केले होते. त्यावेळी त्यांनी यष्टीरक्षक म्हणून त्यावेळीचा भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनचा झेल घेतला होता. तसेच सलामीवीर फलंदाज सचिन तेंडुलकरला यष्टीचीत केले होते.
१. युनुस खान –
पाकिस्तानचा दिग्गज माजी क्रिकेटपटू युनुस खानने २००० ते २०१७ दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना अनेकदा महत्त्वाच्या खेळी केल्या. तो पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजांमध्ये गणला जातो.
त्याने त्याच्या कारकिर्दीत ११८ कसोटी, २६५ वनडे सामने आणि २५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १००९९ धावा, वनडेत ७२४९ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ४४२ धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ विकेट्सही घेतल्या आहेत.
या व्यतिरिक्त युनुसने ३ वनडे सामन्यांमध्ये यष्टीरक्षणही केले आहे. त्याने २००४ मध्ये तिरंगी मालिकेतील २ सामन्यात आणि २००५ ला पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका सामन्यात यष्टीरक्षण केले होते. यावेळी त्याने यष्टीरक्षक म्हणून ४ झेलही घेतले.
वाचनीय लेख –
भारतीय संघाचे सर्वाधिक शिकलेले ७ क्रिकेटर्स; एक आहे इंजीनिअर, तर दुसरा…
वनडेमध्ये ५ हजार धावा आणि शंभर बळी घेणारे ३ भारतीय क्रिकेटपटू, एक आहे युवराज तर..
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १०: “जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली आहे, चल लवकर.”