भारतीय मैदानांमध्ये चौथ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करणं नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे. भारतीय परिस्थितीत चौथ्या डावात 200 धावा करणं देखील खूप कठीण मानलं जातं. त्यामुळेच यथे संघ प्रथम फलंदाजी करणं पसंत करतात.
सामान्यत: भारतीय खेळपट्ट्यांवर चौथ्या डावात फिरकीपटूंना मदत मिळू लागते. त्यामुळे धावांचा पाठलाग करणं कठीण होऊन बसतं. तरीही भारतात अनेकवेळा संघांनी कठीण लक्ष्यांसमोर शरणागती पत्करली नाही. यांनी जिद्दीनं धावांचा पाठलाग करून विजय मिळवला आहे. चला तर मग, भारतातील अशाच टॉप 5 रन चेसवर एक नजर टाकूया.
5. भारत विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरू, 2012
2012 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारतानं न्यूझीलंडचा एक डाव आणि 115 धावांनी पराभव केला. मात्र बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात किवींनी भारताला 262 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य दिलं.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी चांगली सुरुवात करून दिली. या दोन फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 77 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. मात्र, चांगल्या भागीदारीनंतर दोन्ही सलामीवीर लवकरच बाद झाले आणि भारताची धावसंख्या 2 बाद 83 अशी झाली. यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढलं. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडनं शानदार पुनरागमन करत अवघ्या 14 चेंडूत सचिन तेंडुलकर, चेतेश्वर पुजारा आणि सुरेश रैना यांच्या विकेट घेतल्या. यामुळे भारतीय संघ दडपणाखाली आला.
येथून पुढे कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांनी जबाबदारी स्वीकारली. या दोघांनी 96 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला 5 विकेट्सनं विजय मिळवून दिला. अशाप्रकारे त्यामुळे भारतानं मालिका 2-0 ने जिंकली.
4. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, दिल्ली, 2011
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2011 मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला गेला. शिवनारायण चंद्रपॉलच्या शानदार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात 304 धावा केल्या. प्रत्युत्तरात संपूर्ण भारतीय संघ 209 धावांत गडगडला. मात्र, भारतानं उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करत वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात अवघ्या 180 धावांत गुंडाळलं.
दुसऱ्या डावात भारताला विजयासाठी २७६ धावांचं लक्ष्य मिळालं होतं. सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं ५५ धावांची खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. तसेच गौतम गंभीर आणि राहुल द्रविड यांनीही उपयुक्त खेळी खेळली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं 148 चेंडूत 76 धावांची खेळी करत संघाला विजयाच्या समीप नेलं. सचिन बाद झाल्यानंतर ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मणनं ५८ धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला.
3. वेस्ट इंडीज विरुद्ध भारत, दिल्ली, 1987
1987-88 मध्ये, वेस्ट इंडिजचा संघ 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता. दिल्लीत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत अवघ्या 75 धावांत ऑलआऊट झाला. मात्र भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला पहिल्या डावात १२७ धावांत गुंडाळून सामन्यात पुनरागमन केलं.
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी शानदार खेळ करत दिलीप वेंगसरकरच्या शतकाच्या जोरावर 327 धावा केल्या. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला विजयासाठी २७६ धावांचं लक्ष्य मिळालं. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी अवघ्या 114 धावांत 4 विकेट गमावल्या. फिरकीपटू अर्शद अयुबनं गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स आणि विन्स्टन डेव्हिसचे बळी घेत सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. मात्र इथून परिस्थिती बदलली आणि महान फलंदाज व्हिव्ह रिचर्ड्सनं 111 चेंडूत 109 धावांची नाबाद खेळी करत वेस्ट इंडिजला 5 विकेट्सनं विजय मिळवून दिला.
2. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मद्रास, 1986
1986 मध्ये मद्रास (आताचं चेन्नई) येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेला पहिला कसोटी सामना अत्यंत रोमांचक होता. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 574 धावांची मोठी धावसंख्या उभारली. डीन जोन्सनं शानदार द्विशतक झळकावलं. प्रत्युत्तरात, भारतीय संघानं कपिल देवच्या 119 धावांच्या जोरावर 397 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव 5 बाद 170 धावांवर घोषित केला आणि भारताला विजयासाठी 347 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य दिलं. या सामन्यात महान फलंदाज सुनील गावसकरनं आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करत 90 धावांची शानदार खेळी खेळली. तर मोहिंदर अमरनाथ, मोहम्मद अझरुद्दीन आणि चंद्रकांत पंडित यांनीही उपयुक्त खेळी खेळल्या. मधल्या फळीत रवी शास्त्रीनं 48 धावांची नाबाद खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. मात्र त्यानंतर असं काही घडलं जे इतिहासाच्या पानात अजरामर झालं आहे.
भारताला विजयासाठी फक्त 1 धावेची गरज होती आणि शेवटची जोडी क्रीझवर होती. मनिंदर सिंगकडे स्ट्राइक होती आणि रवी शास्त्री दुसऱ्या बाजूला उभे होते. मात्र मनिंदर सिंग खातं न उघडताच बाद झाला आणि अशाप्रकारे हा कसोटी सामना टाय झाला.
1. भारत विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2008
भारतातील हा कदाचित सर्वोत्तम रन चेज होता. 2008 मध्ये इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर होता. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लिश संघानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना 316 धावा केल्या. अँड्र्यू स्ट्रॉसनं 123 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. प्रत्युत्तरात भारतीय संघ २४१ धावांवरच गारद झाला आणि इंग्लंडला ७५ धावांची आघाडी मिळाली.
अँड्र्यू स्ट्रॉसनं दुसऱ्या डावातही शतक झळकावलं आणि अशाप्रकारे भारताला 387 धावांचं लक्ष्य मिळालं. लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं धडाकेबाज खेळी खेळून भारतीय संघाचे इरादे स्पष्ट केले. सेहवागनं 68 चेंडूत 83 धावांची शानदार खेळी करत भारतासाठी प्लॅटफॉर्म तयार केला.
सामन्याच्या शेवटच्या दिवशी जगातील दोन सर्वोत्तम मधल्या फळीतील फलंदाज राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण पॅव्हेलियनमध्ये परतले आणि भारताची धावसंख्या 4 बाद 224 अशी झाली. भारत संकटात सापडला होता, मात्र येथून सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांनी जबाबदारी स्वीकारली. या दोघांनी 169 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. सचिन तेंडुलकरनं 103 धावांची शतकी खेळी तर युवराज सिंगनं 85 धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
वडिलांनी आत्महत्या केली, आईला कॅन्सर झाला; ‘बेझबॉल’चा पोस्टर बॉय बेअरस्टोचा 100 कसोटीपर्यंतचा प्रवास
सीएसकेचा ‘हा’ माजी खेळाडू बनू शकतो पाकिस्तानचा हेड कोच, 2018 मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
धरमशाला कसोटीत युवा फलंदाजाचं पदार्पण, 24 वर्ष जुना विक्रम मोडला