नवी दिल्ली – क्रिकेट खेळणारा प्रत्येक संघ एकदा तरी विश्वचषकावर आपले नाव कोरायचे, हे स्वप्न मनात बाळगून असतो. मात्र, प्रत्येक संघ यात यशस्वी होतोच असे नाही. आतापर्यंत मोजकेच संघ आपले हे स्वप्न साकार करु शकले आहेत.
यात भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंका या संघांच्या नावांचा समावेश आहेत. न्युझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ अनेकदा विश्वचषकाचे प्रबळ दावेदार समजले गेले. परंतु अद्याप एकदाही या संघांना विश्वचषक जिंकता आलेला नाही.
ज्या सहा संघांचा वरील विक्रमात समाविष्ट केलेला आहे. त्यात असे संघ आहेत, ज्यांनी आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा पराजय स्विकारला आहे. चला तर पाहुयात कोणते आहेत ते सहा संघ…
६. पाकिस्तान संघ
पाकिस्तानचा संघ एकदा विश्वविजेता बनलेला आहे. मात्र, तरिही विश्वचषकात सर्वाधिक सामने गमावणाऱ्या संघांच्या यादीत पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तानने 1992 साली इमरान खानच्या नेतृत्वाखाली विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. तत्पूर्वी 1975 पासून पाकिस्तानचा संघ विश्वचषक खेळत आहे. 1975 ते 2019 पर्यंत पाकिस्तान संघाने विश्वचषक स्पर्धांमध्ये एकूण 79 सामने खेळले आहेत. त्यापैकी 32 सामने पाकिस्तानने गमावले आहेत.
५. इंग्लंड संघ
क्रिकेटचा जन्मदाता देश म्हणून इंग्लंडकडे पाहिले जाते. मात्र, विश्वचषकात सर्वाधिक वेळा सामना हारणाऱ्या संघांच्या यादीत इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. २०१९ मध्ये म्हणजे मागच्याच वर्षी इंग्लंडने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. इंग्लंड संघाने १९७५ पासून २०१९ पर्यंत विश्वचषकांमध्ये ८३ सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनीही पाकिस्तान संघाप्रमाणे ३२ सामन्यांमध्ये हार पत्करली आहे.
४. न्युझीलंड संघ
२०१९ ला विश्वचषकाने हुलकावणी दिलेला न्युझीलंडचा संघ या यादीत चौथ्या स्थानावर आहे. न्युझीलंडचा संघाने आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकलेला नाही. मात्र, अनेकदा हा संघ विजेतेपदाचा दावेदार मानला गेला आहे. न्युझीलंचा संघाने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत ८९ सामने खेळले आहेत. त्यापैकी ३३ सामन्यांमध्ये कीवींना (न्युझीलंड संघाला) पराभूत व्हावे लागले आहे.
३. वेस्ट इंडिज संघ
क्रिकेट जगतावर ७० आणि ८० च्या दशकात एकट्या वेस्ट इंडिजच्या संघाचा दबदबा होता. क्लाईव्ह लॉइड, सर व्हिव्हिएन रिचर्डस् यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या साहाय्याने वेस्ट इंडिजचा संघ तेव्हा क्रिकेटमध्ये दादा संघ म्हणून ओळखला जात असे. या कॅरेबियन संघाने आतापर्यंत सलग दोन वेळा विश्वचषक जिंकलेला आहे. मात्र, त्यानंतर या संघाच्या कामगिरीला उतरती कळा लागली. वेस्ट इंडिज संघाने आतापर्यंत विश्वचषकांमध्ये एकूण ८० सामने खेळले आहेत. त्यातील ३५ सामन्यात त्यांना प्रतिस्पर्ध्यांकडून हार पत्करावी लागली आहे.
२. श्रीलंका संघ
भारतीय उपखंडातील श्रीलंका संघ हा देखील एकदिवसीय सामन्यांमध्ये तगडा संघ मानला जातो. श्रीलंका संघाने १९९६साली विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. तसेच २००७ आणि २०११ साली श्रीलंका संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांपर्यंत धडक मारली होती. मात्र, त्यांना अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि भारताकडून पराभव स्विकारावा लागला होता. श्रीलंका संघाने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ८० सामने खेळले आहेत. यापैकी ३९ सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाला हार पत्करावी लागली आहे.
१. झिम्बाम्ब्वे संघ
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिकवेळा प्रतिस्पर्धी संघाकडून पराभव पत्करणाऱ्या संघांच्या यादीत प्रथम स्थानावर झिम्बाम्ब्वेचा संघ विराजमान आहे. या संघाने १९८३ पासून २०१५ पर्यंत विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या एकूण विश्वचषकांमध्ये झिम्बाम्ब्वे संघाने ५७ सामने खेळले. त्यापैकी तब्बल ४२ सामन्यांमध्ये झिम्बाम्ब्वे संघाला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली आहे.
टीप : सरासरीचा विचार केल्यास अफगाणिस्तान आणि बर्म्युडा हे संघ या यादीत सर्वात वर येतात. मात्र, त्यांनी अतिशय कमी सामने खेळले असल्याने त्यांचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही.