---Advertisement---

या आहेत WMPL 2025 च्या सर्वात महागड्या खेळाडू, पुरूष खेळाडूंपेक्षा लागली अधिकची बोली

On: मंगळवार, मे 27, 2025 7:35 PM
---Advertisement---

WMPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) प्रथमच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्ल्यूएमपीएल 2025) आयोजित करत आहे. महाराष्ट्रातील महिला क्रिकेटपटूंसाठी हे व्यासपीठ तयार केले गेले. अशाप्रकारे महिलांची टी20 लीग आयोजित करणारी एमसीए पहिली राज्य क्रिकेट संघटना ठरली. डब्लूएमपीएलची सुरुवात 5 जूनपासून होईल. तत्पूर्वी, एप्रिल महिन्यात झालेल्या खेळाडूंच्या लिलावात सर्वात मोठी बोली लागलेल्या पाच क्रिकेटपटूंविषयी आपण जाणून घेऊया.

मागील वर्षी भारतीय वनडे संघात पदार्पण केलेली तेजल हसबनीस (Tejal Hasbanis) डब्ल्यूएमपीएल 2025 मध्ये सहभागी होत आहे. ती सोलापूर स्मॅशर्स संघाचे नेतृत्व करेल. ती या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरलेली. सोलापूर स्मॅशर्सने 4 लाख 40 हजारांची बोली लावत तिला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. तेजलने भारतीय संघासाठी 6 वनडे सामने खेळताना 46.66 च्या सरासरीने 140 धावा केल्या आहेत.

रेल्वेचे प्रतिनिधित्व केल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र संघात दाखल झालेली अनुभवी फलंदाज श्वेता माने (Shweta Mane) हिला आपल्या संघात घेण्यासाठी अनेक फ्रेंचायझींमध्ये चढाओढ झाली. मात्र, पुणे वॉरियर्सने तिला आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. यासाठी त्यांनी 4 लाख 20 हजार इतकी मोठी रक्कम मोजली. पुणे संघातील इतर युवा फलंदाज पाहता श्वेता हिच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

महाराष्ट्र संघाची प्रमुख अष्टपैलू मुक्ता मगरे (Mukta Magare) ही डब्ल्यूएमपीएल लिलावातील ‘हॉट प्रॉपर्टी’ समजली जात होती. आक्रमक फलंदाजी व वेगवान गोलंदाजी अशी कौशल्य असणारी मुक्ता 4 लाखांच्या किमतीसह सोलापूर स्मॅशर्स संघाचा भाग झाली‌. तिच्यासाठी सर्व चारही फ्रॅंचायझींनी बोली लावलेली. तिच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा सोलापूर संघाला होऊ शकतो.

अंडर 19 महिला टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघासोबत असलेली भाविका अहिरे (Bhavika Ahire) हिच्यासाठी देखील सर्व संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. केवळ 17 वर्षाच्या असलेल्या या डाव्या हाताच्या फलंदाजासाठी रायगड रॉयल्सने 3 लाख 80 हजार रुपये मोजले. ती या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्वात कमी वयाच्या खेळाडूंपैकी एक आहे.

उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज इशा पठारे (Isha Pathare) ही डब्ल्यूएमपीएल 2025 मध्ये रायगड रॉयल्स संघाचाच भाग असेल.‌ आपली गोलंदाजी मजबूत बनवण्यासाठी रायगडने तिच्यावर 3 लाख 80 हजारांची सर्वोच्च बोली लावली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिची कामगिरी पाहता, तिच्यावर या स्पर्धेत अनेक डब्ल्यूपीएल संघांची नजर राहील.

आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही स्पर्धा आयोजित करत असते. या स्पर्धेतील सामने गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विना तिकीट पाहता येतात. डब्ल्यूएमपीएलप्रमाणे MPL चा देखील तिसरा हंगाम यादरम्यान खेळला जाईल. या दोन्ही स्पर्धांचे थेट प्रक्षेपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर JioHotstar व टेलिव्हिजनवर Star Sports 2 चॅनेलवर होईल. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---