महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी (30 जून) पार पडला. रत्नागिरी जेट्स व कोल्हापूर टस्कर्स यांच्यातील हा सामना नियोजित वेळेत पावसामुळे पूर्ण होऊ न शकल्याने, गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या रत्नागिरी जेट्स संघाला विजयी घोषित करण्यात आले. ही स्पर्धा गाजवत पाच खेळाडूंनी विशेष छाप पाडली.
1. अंकित बावणे
कोल्हापूर टस्कर्स संघाचा अनुभवी सलामीवीर अंकित बावणे याने फलंदाजीने ही स्पर्धा गाजवली. अंकित स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने स्पर्धेत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 72.4 च्या लाजवाब सरासरीने सर्वाधिक 362 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतकेही झळकावली. यादरम्यान 105 ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या होती. सर्वाधिक धावांसाठी दिली जाणारी ऑरेंज कॅप त्याने पटकावली.
2. अर्शिन कुलकर्णी
एमपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये ईगल नाशिक टायटन्स संघाचा युवा फलंदाज अर्शिन कुलकर्णी याचाही क्रमांक लागतो. अर्शिन स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. अर्शिनने खेळलेल्या फक्त 3 सामन्यात 65 च्या सरासरीने 195 धावा कुटल्या. यामध्ये एका शतकाचाही समावेश होता. याव्यतिरिक्त मध्यमगती गोलंदाज करताना सहा बळी देखील त्याने टिपले.
3. सचिन भोसले
पुणेरी बाप्पा संघाचा वेगवान गोलंदाज सचिन भोसले हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या सचिनने 8 च्या इकॉनॉमी रेटने 14 बळी मिळवले. सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजाला देण्यात येणारी पर्पल कॅप त्याने आपल्या नावे केली.
4. विजय पावले
टेनिस क्रिकेटमधील नामांकित खेळाडू असलेल्या विजय पावले याने पहिल्या सामन्यापासून विरोधी संघांसमोर आव्हान निर्माण केले. त्याने वैविध्यपूर्ण वेगवान गोलंदाजी करत स्पर्धेत दहा बळी मिळवत सर्वाधिक बळी घेत गोलंदाजांच्या यादीत चौथे स्थान पटकावले. पहिल्या सामन्यात तसेच क्वालिफायर एकच्या सामन्यात प्रत्येकी तीन बळी मिळवत त्याने संघासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्याची सरासरी नऊ पेक्षा कमी राहिली.
5. रोहन दामले
पुणेरी बाप्पा संघाचा अष्टपैलू रोहन दामले याची देखील कामगिरी संघासाठी लक्षवेधी ठरली. फिरकी गोलंदाजी तसेच वरच्या फळीत फलंदाजी करताना त्याने संघासाठी योगदान दिले. 100 पेक्षा जास्त धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. तसेच नऊ बळी देखील त्याने टिपले.
(Top Five Match Winners In MPL 2023 Ankeet Bawne Arshin Kulkarni Vijay Pawale)
महत्वाच्या बातम्या-
पुण्याने गमावली एमपीएल ट्रॉफी, पण सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत पुणेकरांचीच आघाडी
BREAKING: रत्नागिरी जेट्सने उंचावली MPL 2023 ची ट्रॉफी! कोल्हापूर टस्कर्सच्या पदरी निराशा