वडापाव… वडापाव हा देशभरापासून महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील, शहरातील, जिल्ह्यातील आवडता खाद्यपदार्थ आहे. त्यातल्या त्यात याला सर्वाधिक प्रसिद्धी आहे ती मुंबईत. लहान टपरीपासून ते पंचतारांकित हॉटेल्समध्ये वडापाव मिळणार म्हणजे मिळणारंच. वडापाव म्हणजे श्रीमंतांपासून सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारा खाद्यपदार्थ. पावसात म्हणा किंवा हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत बाकी काही नसले तरी चालतं पण वडापाव मात्र सर्वांच्या प्राधान्याचा विषय. वडापावसोबतच तळलेली मिरची आणि लसणाची किंवा कोथिंबिरीची चटणी लोक फारच आवडीने खातात.
क्रिकेटचं आणि वडापावचं नातंही तसं वेगळंच. वडापाव हा भारतीय क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटूंच्या आवडीचा पदार्थ आहे. त्यामध्ये सचिन तेंडुलकर ते अजिंक्य रहाणे हे खेळाडू वडापावचे चाहते आहेत. हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून आपल्याला दिसते.
आता तुम्ही म्हणाल की, आज वडापावबद्दल एवढी चर्चा का रंगलीय, तर आज जागतिक वडापाव दिन आहे. त्यानिमित्ताने आपण या लेखात भारतीय खेळाडू आणि त्यांना आवडणाऱ्या पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत.
रोहित शर्मा
भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्मा हा एक मुंबईकर म्हणून खाद्यपदार्थांचा खूप मोठा चाहता आहे. त्याला वडापाव आणि पाव भाजी हे पदार्थही आवडतात. असे असले तरी, जेव्हा त्याला निवड दिली जाते, तेव्हा तो नेहमीच आलू पराठ्याचा पर्याय निवडतो. रोहितला चीनी पाककृती आणि अंडी देखील आवडतात.
मर्यादित षटकांचा उपकर्णधार म्हणून रोहित अव्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. ३४ वर्षीय रोहितने भारतीय संघाकडून ४५ कसोटी सामने, २३३ वनडे सामने आणि १३२ आंंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
भुवनेश्वर कुमार
भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीतील मुख्य गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या भुवनेश्वर कुमारला लाजाळू व्यक्ती म्हणूनही ओळखले जाते. जर त्याच्या आवडत्या खाद्यपदार्थाविषयी बोलायचं झाले, तर ३१ वर्षीय भुवनेश्वर घरगुती पदार्थांना प्राधान्य देतो. विशेषत: कढी भात. भुवनेश्वरला त्याच्या आईने बनवलेली उडदाची डाळ फार आवडते.
भुवनेश्वरने भारतीय संघाकडून २१ कसोटी सामने, १२१ वनडे सामने आणि ७२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
आर अश्विन
विरोधी संघाच्या फलंदाजांना चिंतेत टाकणारा भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनलादेखील भुवनेश्वर कुमारप्रमाणे आपल्या आईने बनविलेले घरगुती जेवण आवडते.
जेव्हाही तो आपल्या व्यस्त वेळापत्रकातून मुक्त होतो, तेव्हा तो घरगुती खाद्यपदार्थ खातो. अश्विनला त्याच्या आईने बनविलेली पनीर कॅप्सिकमची भाजी अधिक आवडते. शाकाहारी असल्यामुळे अश्विन दुखापतमुक्त आहे, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
अश्विनने भारतीय संघाकडून ८६ कसोटी सामने, ११३ वनडे सामने आणि ५४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
युझवेंद्र चहल
सामन्यानंतर मुलाखतीसाठी प्रसिद्ध असलेला फिरकीपटू युझवेंद्र चहलला बटर चिकन, लसूण नान, छोले कुल्चे, पाणी पुरी, डाळ तडका आणि हिरवी चटणी खूप आवडते. यावरून दिसते की चहल बर्यापैकी खाद्यपदार्थांचा चाहता आहे.
३२ वर्षीय चहल हा भारतीय ड्रेसिंग रूममधील एक मजेदार खेळाडू म्हणून ओळखला जातो, हे त्याच्या सोशल मीडियावरुन दिसते. तो नेहमी आपल्या संघसहकाऱ्यांना ट्रोल करत सोशल मीडियावर कमेंट करत असतो.
त्याने आतापर्यंत भारतीय संघाकडून ६७ वनडे सामने आणि ६२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
रिषभ पंत
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याला छोले भटूरे, आलू पराठा आणि आईसक्रीम फार जास्त आवडते.
२४ वर्षीय पंत मागील काही महिन्यांपासून दमदार प्रदर्शन करत आहे. पंतने भारतीय संघाकडून आतापर्यंत ३१ कसोटी सामने, २७ वनडे सामने आणि ५४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
केएल राहुल
रिषभ पंतनंतर यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका उत्कृष्टरीत्या सांभाळणारा भारतीय संघाचा केएल राहुलदेखील त्या फलंदाजांमधील एक आहे, ज्यांना परदेशी पदार्थ आवडणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. राहुलला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीप्रमाणेच जापनिज फूड फार आवडते.
न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत ४३ कसोटी सामने, ४५ वनडे सामने आणि ५६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
हार्दिक पंड्या
भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. २८ वर्षीय पंड्याने पाठीच्या दुखापतीतून पुनरागमन केले आहे. त्याने मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या डीवाय पाटील टी२० चषकात ५५ चेंडूत ताबडतोब फलंदाजी करत १५८ धावांची दीडशतकी खेळी केली आहे.
पंड्याने एकदा त्याच्या आवडत्या पदार्थांबद्दल सांगताना म्हटले होते की, त्याला मॅगी आणि ग्रीन टी खूप आवडतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असूनही त्याला या साध्या गोष्टी आवडतात.
पंड्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत ११ कसोटी सामने, ६६ वनडे सामने आणि ६७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
शिखर धवन
भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवनने कठीण परिस्थितीत भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याची सलामीवीर फलंदाज रोहित शर्मासोबतची भागीदारी बऱ्याचदा निर्णायक ठरली आहे.
धवनला ‘गब्बर’ या नावानेही ओळखले जाते. त्याने आपल्या मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याला थाय फूड खूप आवडतात. याव्यतिरिक्त आलू पराठा आणि हैद्राबादी बिर्याणीही त्याचे आवडीचे पदार्थ आहेत.
धवनने भारती संघाकडून आतापर्यंत ३४ कसोटी सामने, १५८ वनडे सामने आणि ६८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
मोहम्मद शमी
भारतीय वेगवान गोलंदाजी ताफ्यातील घातक गोलंदाज मोहम्मद शमीला सर्वप्रकारच्या बिर्याणी आवडते. त्याचे आवडता खाद्यपदार्थ हा मटन बिर्याणी आहे. परंतु तो फीटनेस फ्रीक आहे. तसेच वेगवान गोलंदाज असल्यामुळे आपल्या फीटनेसबाबत खूपच जागृत आहे.
शमीने भारतीय संघाकडून आतापर्यंत ६० कसोटी सामने, ८२ वनडे सामने आणि १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराहचा जगभरातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये समावेश होतो. गुजराती असल्यामुळे त्याला घरगुती पदार्थ फार आवडतात. त्याला ढोकळाआणि सर्वप्रकारचे भारतीय गोड पदार्थही आवडतात. याव्यतिरिक्त बुमराहला त्याच्या फीटनेससाठी आणि यॉर्करसाठी ओळखले जाते.
नुकताच तो आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी धडपडत आहे. परंतु बुमराह गेल्या दोन वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
बुमराहने भारतीय संघाकडून आतापर्यंत ३० कसोटी सामने, ७२ वनडे सामने आणि ५८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मानलं गड्या! छोट्याशा करिअरमध्येच अझरपासून रोहितपर्यंत सर्वांना गिलचा धोबीपछाड
आपल्या समालोचनातून चौफेर फटकेबाजी करणारा ‘ऍलन विल्किंंस’
VIDEO: टीम इंडियाचे मालिकाविजयानंतर ‘फुल्ल धिंगाणा’ सेलिब्रेशन; गिल-ईशानने तर मर्यादा…