जवळजवळ ४ महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. साऊथँम्पटन येथे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ८ जूलैपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात अनेक विक्रमही झालेले पहायला मिळाले, त्यातीलच एक खास विक्रम इंग्लंडचा प्रभारी कर्णधार बेन स्टोक्सने केला आहे.
स्टोक्स पहिल्यांदाच इंग्लंडचे नेतृत्व करत आहे. नेतृत्व करताना त्याने त्याची कामगिरीही चांगली केली आहे. त्याने या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडकडून सर्वाधिक ४३ धावा केल्या. एवढेच नाही गोलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात ४९ धावा देत ४ विकेट्सही घेतल्या. या डावातील इंग्लंडकडून हे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन होते.
त्यामुळे कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आपल्या संघाकडून सर्वाधिक धावा आणि सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या मॉन्टी नोबेल आणि भारताच्या लाला अमरनाथ यांनी असा पराक्रम केला होता.
नोबेल यांनी १९०३ मध्ये इंग्लंड विरुद्ध सिडनी येथे खेळताना पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. त्या सामन्यात त्यांनी पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक १३३ धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना पहिल्या डावात ९९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. या डावातील ऑस्ट्रेलियाकडून हे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन होते.
तसेच अमरनाथ यांनी १९४७ ला ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्यांदा भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी त्यांनी त्या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना २२ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे या डावात भारताकडून ही सर्वोत्तम धावसंख्या होती. तसेच गोलंदाजी करताना अमरनाथ यांनी भारताकडून पहिल्या डावात सर्वोत्तम प्रदर्शन केले होते. त्यांनी ८४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी –
मुंबईकर रहाणे म्हणतो, ‘ती’ गोष्ट केल्याशिवाय गप्प बसणार नाही
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजांत अँडरसनचा समावेश, पहा पहिले ४ कोण आहेत?
८ तासांत कसोटीत त्रिशतक करणारे जगातील एकमेव फलंदाज, ४६ चौकारांचा दिला गोलंदाजांना प्रसाद