युनाइटेड वर्ल्ड रेसलिंगने 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारतातील काही आघाडीच्या कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
विनेश फोगटने घेतली माघार
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने भारतीय कुस्ती महासंघाला सांगितले की तिच्या प्रवर्गातील काही कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होत नसल्यामुळे तीनेही सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बजरंग पुनिया बुधवारी होईल रवाना
नुकताच लग्नबंधनात अडकलेला वरिष्ठ कुस्तीपटू बजरंग पुनिया बुधवारी (2 डिसेंबर ) अमेरिकेला रवाना होईल. त्याचे प्रशिक्षक शाको बेंटिनिडिस हेही त्याच्यासोबत असतील. अमेरिकेतील मिकीगन येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर 70 किलोग्राम वजनी गटातील स्पर्धेत तो सहभागी होईल. या गटात त्याच्यासमवेत इतर उत्कृष्ट कुस्तीपटूही सहभागी होतील.
बजरंगव्यतिरिक्त नावाजलेले कुस्तीपटू घेतील सहभाग
या स्पर्धेत बजरंगव्यतिरिक्त जॉर्डन ऑलिव्हर, जेम्स ग्रीन, ऍंथनी एशनॉल्ट, जोए मॅकेन्ना, इव्हान हेंडरसन, पॅट लुगो आणि ब्राइस मेरिडिथ यासारखे कुस्तीपटू सहभागी होतील. या स्पर्धेतील विजयी खेळाडूला 25000 अमेरिकन डॉलर ही रक्कम दिली जाईल.
…म्हणून जागतिक कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धा केली होती स्थगित
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या क्रीडा संचालन मंडळाने या महिन्याच्या सुरुवातीला बेलग्रेडमध्ये होणारी जागतिक कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धा स्थगित केली होती. काही सदस्यीय देशांनी कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे बेलग्रेड येथे सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या स्पर्धेऐवजी वैयक्तिक कुस्ती चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
नरसिंग यादवचे पुनरागमन
वयाच्या 26 व्या वर्षी कुस्तीपटू नरसिंग यादव याच्यावर जागतिक डोपिंग विरोधी संस्थेने बंदी घातली होती. ऑगस्ट 2020 मध्ये बंदीचा 4 वर्षाचा कालावधी पूर्ण होताच सप्टेंबर महिन्यात तो राष्ट्रीय कॅम्पमध्ये सहभागी झाला.