सिडनी येथे झालेला भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघातील दिवसरात्र कसोटी सामना रविवारी (१३ डिसेंबर) अनिर्णित राहिला. १७ डिसेंबर-२१ डिसेंबर दरम्यान ऍडलेड येथे दोन्ही संघात होणाऱ्या प्रकाशझोतातील दिवसरात्र सामन्याच्या पाश्वभूमिवर हा सामना खेळवण्यात आला होता. अपेक्षेनुसार या सराव सामन्यामुळे भारतीय संघासाठी दिलासादायक गोष्टी घडल्या आहेत.
भारतीय संघासाठी घडल्या सकारात्मक गोष्टी
या सराव सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी जबरदस्त शतकी खेळी केली. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला बराच फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच शुबमन गिल आणि मयंक अगरवाल यांनीही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध शानदार फलंदाजी केली. तर दुसऱ्या बाजूला मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात संघर्ष करताना दिसेलला जसप्रीत बुमराहला लयीत येण्यास मोठी मदत मिळाली आहे.
सराव सामन्याचा अहवाल
गुलाबी चेंडूने खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक नाबाद ५५ धावा केल्या. तर शुबमन गिलने ४३ धावा आणि पृथ्वी शॉने ४० धावा केल्या. परिणामत: भारतीय संघाने पहिल्या डावाखेर १९४ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाकडून गोलंदाजी करताना सिन ऍबॉट आणि जॅक वाइल्डरमिथने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीने ऑस्ट्रेलिया ‘अ’चा पहिला डाव फक्त १०८ धावांवर गुंडाळला. यात मोहम्मद शमी आणि नवदीप सैनीने प्रत्येकी ३ विकेट्स, जसप्रीत बुमराहने २ विकेट्स व मोहम्मद सिराजने एका विकेटचे योगदान दिले. अशाप्रकारे भारतीय संघाला पहिल्या डावात ८६ धावांनी सरशी मिळाली.
दुसऱ्या डावात हनुमा विहारी (१०४ धावा) आणि रिषभ पंत (१०३ धावा) यांनी नाबाद शतकी खेळी केली. मयंक अगरवाल (६१ धावा) आणि शुबमन गिल (६५ धावा) यांनीही अर्धशतके लगावली. यामुळे भारतीय संघाने ४ बाद ३८६ धावांवर दुसरा डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या फलंदाजांनीही प्रशंसनीय फलंदाजी केली. कर्णधार ऍलेक्स कॅरीने ५८ धावा केल्या. शेवटी बेन मॅकडरमॉट (१०७ धावा) आणि जॅक वाइल्डरमिथ (१११ धावा) यांनी नाबाद शतकी खेळी केली. परंतु, ३ दिवसीय सराव सामन्याचा कालावधी संपल्यामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ” संघाला दुसरा डाव ४ बाद ३०७ धावांवर संपवावा लागला. परिणामत: सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
रहाणेच्या नेतृत्त्वाची कमाल! उत्कृष्ट प्लॅनिंगच्या जाळ्यात अडकला ऑस्ट्रेलियन फलंदाज, पाहा व्हिडिओ
इंग्लंडच्या भारत दौऱ्यावरून मुंबई-बंगाल राज्य संघटना बीसीसीआयवर भडकल्या, पाहा काय आहे कारण