न्यूझीलंडनं 2024 टी20 विश्वचषकातील आपला अखेरचा सामना पापुआ न्यू गिनीविरुद्ध खेळला. या सामन्यात किवी संघानं 7 गडी राखून शानदार विजय मिळवला.
न्यूझीलंडचा संघ आधीच या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. अशाप्रकारे संघाचा दिग्गज गोलंदाज ट्रेंट बोल्ट याचा टी20 विश्वचषकातील हा अखेरचा सामना होता. तो आता यानंतर टी20 विश्वचषकात खेळताना दिसणार नाही. त्यानं हा टी20 विश्वचषक माझा अखेरचा असेल, अशी घोषणा आधीच केली होती.
34 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यानं न्यूझीलंडच्या केंद्रीय करारातून स्वत:ला बाहेर केलं आहे. मात्र तो गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक आणि या वर्षी टी20 विश्वचषक खेळताना दिसला. त्यानं नुकतीच घोषणा केली होती की, या टी20 विश्वचषकात तो शेवटचा खेळताना दिसेल. स्पर्धेच्या आपल्या अखेरच्या सामन्यात बोल्टनं पापुआ न्यू गिनीविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकांत केवळ 14 धावा देऊन 2 विकेट घेतल्या.
ट्रेंट बोल्टनं 2011 मध्ये न्यूझीलंडसाठी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो किवी संघाच्या ‘गोल्डन जनरेशन’चा महत्त्वाचा सदस्य राहिला आहे. त्यानं न्यूझीलंडसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. तो 2014 पासून 4 टी20 विश्वचषकांमध्ये खेळला आहे.
ट्रेंट बोल्टनं 2013 मध्ये इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडसाठी पहिला टी20 सामना खेळला होता. त्यानं किवी संघासाठी 61 टी20 सामन्यांमध्ये 83 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 21.43 आणि इकॉनॉमी रेट 7.68 एवढा राहिला. 13 धावा देऊन 4 बळी ही त्याची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
यजमान वेस्ट इंडिजची दादागिरी, अफगाणिस्तानवर 104 धावांनी मिळवला शानदार विजय
मोठी बातमी! न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचा हा शेवटचा टी20 विश्वचषक असेल, स्वत: केली घोषणा
टी20 विश्वचषकात निकोलस पूरनचा कहर! एकाच षटकात ठोकल्या 36 धावा, अनेक विक्रम मोडले