बंगळुरूमध्ये झालेल्या भगदडीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने न्यायमूर्ती जॉन मायकेल डी’कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला होता. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, या आयोगाने सरकारला दिलेल्या अहवालात चिन्नास्वामी स्टेडियमला सामने किंवा कोणताही मोठा कार्यक्रम घेण्यासाठी अनुपयुक्त व असुरक्षित घोषित केलं आहे. रिपोर्ट्समध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की, भविष्यात जर इथे मोठे कार्यक्रम झाले तर तो जनतेच्या सुरक्षेशी खेळ करण्यासारखं ठरेल.
या रिपोर्ट्स मध्ये आयोगाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) डीएनए एंटरटेनमेंट म्हणजेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन (KSCA) यांना जबाबदार ठरवलं आहे. त्यात असं नमूद करण्यात आहे की, स्टेडियममध्ये आपत्कालीन मार्ग नीट उपलब्ध नाहीत. तसेच प्रवेश आणि निर्गमन द्वारांची संख्या अपुरी आहे. स्टेडियमच्या आसपास कायम ट्रॅफिक असतो, पार्किंगसाठी जागाही पुरेशी नाही.
हा रिपोर्ट अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा काही आठवड्यांतच महिला ODI वर्ल्ड कप 2025 च्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंका (India & Shrilanka) एकत्रितपणे या स्पर्धेची यजमानी करत आहेत आणि यातील चार सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवले जाणार होते. पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरूच्या ह्याच मैदानावर होणार होता.
दुसरीकडे, KSCAने आधीच जाहीर केलं आहे की महाराजा ट्रॉफी ही स्पर्धा ‘क्लोज्ड डोअर’मध्ये प्रेक्षकांविना खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 11 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. IPL आणि WPL मधील सामनेही या मैदानावर खेळले गेले आहेत. पण आयोगाचा अहवाल समोर आल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





