पुणे: टायफून्स आणि ऑल स्टार या संघांत पूना क्लबच्या वतीने आयोजित पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. जेट सिंथेसायझर, मदर्स रेसिपी आणि जितेंद्र घडोक ग्रुप हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत.
पूना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत टायफून्स संघाने सेलर्स संघावर ५ धावांनी मात केली. यात सेलर्स संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून टायफून्स संघाला ६ बाद ५३ धावांत रोखण्यात यश मिळवले. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना सेलर्सच्या फलंदाजांनी निराशा केली. सेलर्स संघाला ७ बाद ४८ धावाच करता आल्या. यात सेलर्सचा सलामीवीर सुमिरन मेहताने दिलेली लढत एकाकी ठरली. त्याने १८ चेंडूंत २६ धावा केल्या. टायफून्सकडून अश्विन शहाने तीन गडी बाद केले.
दुस-या उपांत्य लढतीत ऑल स्टार संघाने लायन्स संघावर ६ गडी राखून मात केली. लायन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ६६ धावा केल्या. यात मनोपाल सेहंबेय याने १४ चेंडूंत नाबाद ३४ धावा केल्या. ऑल स्टार संघाने विजयी लक्ष्य रौनक ढोले पाटीलच्या अर्धशतकाच्या जोरावर ५.१ षटकांत २ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. रौनकने २० चेंडूंत ५ षटकार व २ चौकारांसह नाबाद ५३ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – १) टायफून्स – ६ षटकांत ६ बाद ५३ (सुजीत आध्ये १०, रजित परदेशी २-६, हर्ष चव्हाण २-३) वि. वि. सेलर्स – ६ षटकांत ७ बाद ४८ (सुमिरन मेहता २६, अश्विन शहा ३-१३, रविकांत सरोज १-८).
२) लायन्स – ६ षटकांत ३ बाद ६६ (मनोपाल सेहंबेय नाबाद ३४, किरण देशमुख १५, हृतिक उत्तेकर १-७, रौनक ढोले पाटील १-६) पराभूत वि. ऑल स्टार – ५.१ षटकांत २ बाद ६८ (रौनक ढोले पाटील नाबाद ५३, रोहित आचार्य १३, अमिताभ अगरवाल १-१०).