आयसीसी १९ वर्षाखालील वनडे विश्वचषक (ICC U19 World Cup) नेहमीच रोमांचक ठरला आहे. या स्पर्धेत युवा खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत वरिष्ठ संघात स्थान मिळवले आहेत. या स्पर्धेची सुरूवात १९८८मध्ये झाली. स्पर्धेच्या पदार्पणातच ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला. पुढची स्पर्धा १९९८मध्ये घेण्यात आली. त्यानंतर दर दोन वर्षानंतर ही स्पर्धा होते. १९९८पासून ते आतापर्यंत या स्पर्धेचे १४ हंगाम खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद जिंकले. त्याचबरोबर भारताच्या कर्णधारांचेही चांगलेच वर्चस्व राहिले आहे.
यातील काही कर्णधारांनी कारकिर्दीत यशाची मोठी शिखरे गाठली असून काही लवकरच हरवले झाले आहेत. या पाच पैकी काही खेळाडूंनी वरिष्ठ आंतरराष्ट्रीय संघात जागा पक्की करत चांगली कामगिरी केली आहे. तर काहींना स्थानिक सामन्यांतही विशेष कामगिरी करण्यात अपयश आले. तर या लेखामध्ये आपण भारताच्या त्या पाच कर्णधारांची माहिती पाहणार आहोत.
मोहम्मद कैफ २०००
भारतीय संघाचा उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक अशी ओळख असलेल्या मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने २०००मध्ये भारताला पहिला १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून दिला. त्या संघात युवराज सिंग, जो पुढे भारताच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यातील संघाचा महत्वपूर्ण खेळाडू ठरला. १९९८मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा कैफ २०००च्या स्पर्धेत अपयशी ठरला. त्याने ८ सामन्यात ३४.५७च्या सरासरीने १७० धावा केल्या.
कैफला वरिष्ठ संघात भारताकडून कमी सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा फॉर्म. त्याला विश्वचषकातील खराब फॉर्ममुळे संघातून वगळले गेले. त्याने २०००मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. मात्र पुन्हा त्याची निराशाजनक कामगिरी झाल्याने त्याला संघातून वगळले गेले. त्याने कारकिर्दीत १३ कसोटी आणि १२५ वनडे सामने खेळले. सध्या तो समालोचन करत आहे.
विराट कोहली (२००८)
विराट कोहली (Virat Kohli) हा १९ वर्षाखालील भारतीय संघातील सर्वाधिक यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने २००८मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या वरिष्ठ संघाचे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये जबरदस्त नेतृत्व केले आहे. आजच्या घडीला तो सर्वोत्कृष्ठ फलंदाजांपैकी एक आहे.
विश्वचषक २००८च्या स्पर्धेत विराटने ६ सामन्यात ४७च्या सरासरीने २३५ धावा केल्या. त्यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. त्याचवर्षी वनडेत भारतीय वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले. २०१४ नंतर एमएस धोनीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याने विराटने जबाबदारी सांभाळली. नंतर तो भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधारही झाला.
सद्यस्थितीत विराट भारतीय संघाचा फलंदाज असून त्याच्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) नेतृत्व करत आहे. तसेच विराट आउट ऑफ फॉर्म असल्याने तो संघाबाहेर आहे. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकार मिळून तीनशेहून अधिक सामन्यात २३००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ७० शतकांचा समावेश आहे. तसेच तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
उन्मुक्त चंद २०१२
विराटने दक्षिण आफ्रिकेत मिळवलेल्या यशानंतर आणखी एका दिल्लीच्या खेळाडूने भारताच्या विश्वचषक विजयी संघाचे नेतृत्व केले. उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याने २०१२च्या विश्वचषक संघाचे कर्णधारपद भुषविले. त्या स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केल्याने त्याची तुलना विराटशी होऊ लागली. तो ही भारतीय संघाचा मोठा खेळाडू होईल अशी भविष्यवाणी करण्यात येऊ लागली. त्याने या स्पर्धेच्या ६ सामन्यांत ४९.२०च्या सरासरीने २४६ धावा केल्या. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात नाबाद शतक केले होते.
दिल्लीसाठी उन्मुक्तची कामगिरी निराशाजनक ठरली. त्याने स्थानिक सामन्यात दिल्लीसाठी ६७ सामन्यात ३१च्या सरासरीने ३३७९ धावा केल्या. दिल्लीसाठी वाईट कामगिरी झाल्याने त्याला भारताकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळता आला नाही. जेव्हा त्याला निवडकर्त्यांनी सतत दुर्लक्ष केले तेव्हा त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अमेरिकेच्या लीगसोबत करार केला.
पृथ्वी शॉ २०१८
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यासाठी २०१८ वर्ष चांगले राहिले आहे. त्याने भारताला त्याचवर्षी १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून दिला. ते भारताचे चौथे विजेतेपद ठरले. त्या हंगामात पृथ्वी भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने ६५.२५च्या सरासरीने २६१ धावा केल्या. तसेच तो आयपीएलच्या पदार्पणात शतकी खेळी करणारा युवा खेळाडू ठरला.
पृथ्वीने आयपीएनंतर स्थानिक सामन्यांच चांगले प्रदर्शन केले. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही धमाकेदार पुनरागमन केले. २०१८मध्ये त्याला वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळण्याची संधी मिळाली. त्याने या मालिकेत २३७ धावा केल्या. २०२०मध्ये ८ महिने डोपिंगच्या बंदीमुळे तो क्रिकेटपासून दूर गेला. २०२२च्या आयपीएल हंगामापूर्वी झालेल्या यो-यो टेस्टमध्ये अपयशी झाल्याने त्याच्या फिटनेशवरही प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्याने २०२२च्या रणजी ट्रॉफीत मुंबईला अंतिम फेरीत पोहोचवले होते. भारताकडून त्याने शेवटचा कसोटी सामना २०२२मध्ये तर वनडे आणि टी२० सामने २०२१मध्ये खेळले आहेत.
यश धूळ २०२२
यावर्षी झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात भारताने इंग्लंडचा पराभव केला. भारताचा हा पाचवा विश्वचषक ठरला आहे. त्याचबरोबर भारत सर्वाधिक १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकणारा संघ ठरला आहे. या स्पर्धेत भारताचा कर्णधार यश धूळ होता. त्याने फलंदाजीत दम दाखवला. यावरून त्याला आयपीएलच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले. मात्र त्याला पदार्पणाची संधीच मिळाली नाही. तसेच त्याने रणजी ट्रॉफीमध्ये धावांचा रतीब घातला. तो जर असाच कामगिरी करत राहिला तर त्याला वरिष्ठ संघात खेळण्याची संधी मिळू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताची गोल्ड मेडलवर नजर! नाणेफेक जिंकत हरमनप्रीतने घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग ११
ख्रिस गेल नावाचे वादळ पुन्हा भारतात येणार! आता २२ दिवस गोलंदाजांची खैर नाही