प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शुक्रवारी (11 नोव्हेंबर) तीन सामने खेळले गेले. यातील सर्वात प्रतिष्ठेच्या पुणेरी पलटण विरुद्ध यु मुंबा या महाराष्ट्राच्या संघा दरम्यानच्या महाराष्ट्र डर्बीत यु मुंबाने 34-33 सरशी साधली. यासह या हंगामातील दुसरी महाराष्ट्र डर्बी जिंकत मुंबईने 1-1 अशी बरोबरी साधली.
पुण्याजवळील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या दिवसातील या दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघांनी विजयाच्या इराद्याने मैदानात पाऊल ठेवले. हंगामातील पहिली महाराष्ट्र डर्बी पुणे संघाने आपल्या नावे केली होती. या सामन्यातही पुणे संघाने वेगवान सुरुवात केली. मात्र, मुंबईने अगदी कमी वेळात पलटवार केला. पुणे संघाचे एक-एक गडी बाद करत त्यांनी आघाडी मिळवली. पुण्याच्या मोहित गोयतने आधी रेडिंगमध्ये आणि त्यानंतर सुपर टॅकल करत ऑल आउट टाळला. पहिल्या सत्राच्या अखेरीस दोन्ही संघांकडे 15-15 गुण होते.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला मुंबईने पुणे संघाला ऑल आऊट करत आघाडी घेतली. मात्र, पुणे संघाने आपला डिफेन्स आणि रेडर्स यांचा योग्य ताळमेळ सादर दहा मिनिटात मुंबईला ऑल आउट केले. अखेरच्या आठ मिनिटात दोन्ही संघांमध्ये पुन्हा संघर्ष पाहायला मिळाला. मुंबईसाठी गुमान सिंगने सुपर टेन पूर्ण करत, दोन मिनिटे शिल्लक असताना पुणे संघाला ऑल आउट करत आपल्या संघाला सामन्यात बरोबरी साधून दिली.
त्यानंतर मुंबईने आक्रमण याचा सुरेख मेळ साधत एका गुणाची आघाडी कायम ठेवली. अखेरच्या 40 सेकंदात मुंबईकडे एका गुणाचे आघाडी असताना मोहितने बोनस घेत सामना बरोबरीत आणला. अखेरच्या डू ऑर डाय रेडमध्ये पुणे संघाच्या अबिनेश नादराजनने घाई केल्याने मुंबईच्या आशिष ने गुण घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.