---Advertisement---

मालिकावीर पुरस्कार मिळाल्यानंतर यशस्वी जयस्वालने केले ‘हे’ भाष्य

On: सोमवार, फेब्रुवारी 10, 2020 8:43 PM
---Advertisement---

काल(9 फेब्रुवारी) पोचेफस्टरूम (Potchefstroom) येथे 19 वर्षाखालील विश्वचषकात(Under 19 World Cup) 19 वर्षाखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षाखालील बांगलादेश संघात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 3 विकेट्सने विजय मिळवत पहिल्यांदाच 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा इतिहास रचला.

या सामन्यानंतर भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वालला (Yashaswi Jaiswal) या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा (मालिकावीर) पुरस्कार देण्यात आला.

यशस्वीने या संपूर्ण विश्वचषकात 6 सामन्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 133.33 च्या सरासरीने 400 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने 19 वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा खास विक्रम केला आहे.

या विश्वचषकात यशस्वी आणि इतर फलंदाजांच्या कामगिरीतील अंतर पाहायचे झाले तर, दुसऱ्या क्रमांकावर असणारा श्रीलंकेचा फलंदाज रवींदू रसांथाने (Ravindu Rasantha) 6 सामन्यात 286 धावा केल्या आहेत. ज्या यशस्वीपेक्षा 114 धावांनी कमी आहेत.

काल झालेल्या अंतिम सामन्यात केवळ जयस्वालने अर्धशतकी खेळी करत एकाकी झूंज दिली. त्याने 121 चेंडूत 88 धावांची खेळी केली. यामध्ये 1 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश आहे.

मालिकावीर पुरस्कार मिळाल्यानंतर जयस्वाल म्हणाला, “मी खरोखर विश्वचषक स्पर्धेचा आनंद घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीवर खेळण्याचा मला चांगला अनुभव आला. मला माहित होते की मला माझा खेळ खेळायचा आहे. पुढे काय खेळायचे आहे याबद्दल आता विचार करीत आहे आणि ही प्रक्रिया आहे. मला त्यावरच लक्ष्य केंद्रित करायचे आहे.”

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 47.2 षटकात केवळ 177 धावा केल्या आणि बांगलादेशला 178 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 15 धावांची गरज असताना पावसाला सुरुवात झाली.

अखेर पावसामुळे सामना 46 षटकांचा करण्यात आला आणि 170 धावांचे आव्हान बांगलादेशला देण्यात आले. तरीही बांगलादेशने 42.1 षटकात 170 धावा करत विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---