बुधवारी (२ फेब्रुवारी) भारताच्या १९ वर्षाखालील संघाने विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि स्पर्धेचा अंतिम सामना गाठला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या केली आणि प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघ स्वस्तात सर्वबाद झाला. भारताने हा सामना ९६ धावांनी जिंकला. भारतीय संघाच्या यष्टीरक्षक फलंदाज दिनेश बाना (dinesh bana) याचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले. बानाच्या भारतीय १९ वर्षाखालील संघापर्यंतच्या प्रवासात प्रशिक्षक रनवीर जाखर (ranveer jhakar) यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. जाखर यांनी बानाच्या इथपर्यंतच्या प्रवासाविषयी माहिती दिली आहे.
बानाने या उपांत्य सामन्यात ५०० च्या स्ट्राईक रेटने एकूण चार चेंडू खेळले आणि यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २० धावा केल्या. मैदानात एकदा झेल घेण्याचा सराव सुरू असताना प्रशिक्षक जाखरांची नजर बानावर पडली आणि त्यानंतर त्यांनी बानाला प्रशिक्षक देण्यास सुरुवात केली होती. न्यूज १८ सोबत बोलताना रनवीर जाखर म्हणाले की, “वीनू मंकड स्पर्धेच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये त्याला (दिनेश बाना) हरियाणासाठी खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पुढच्या तीन सामन्यात सलग तीन अर्धशतके करून बानाने स्वतःला सिद्ध केले होते. तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.”
प्रशिक्षकांनी यावेळी असाही खुलासा केला की, मागच्या नोव्हेंबर महिन्यात खेळल्या गेलेल्या चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये बानाने ९८ चेंडूत १७० धावा केल्या होत्या, यामध्ये त्याच्या १० चौकार आणि १४ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर निवडकर्त्यांची त्याच्यावर नजर पडली होती. याच कारणास्तव त्याला १९ वर्षाखालील संघात संधी मिळाली. जाखडने सांगितल्याप्रमाणे बाना आंतर जिल्हा स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, पण वीनू मंकड स्पर्धेत त्याला खालच्या फळीत संधी दिली जाते. त्याला जर वरच्या फळीत संधी दिली गेली, तर तो अधिक चांगले प्रदर्शन करू शकतो. बाना एक चांगला यष्टीरक्षक असून रोज ८ ते ९ तास सराव करतो, असेही जाखर म्हणाले.
जाखरने पुढे अशीही माहिती दिली की, दिनेशचे वडील महावीर बाना हरियाणा पोलीसमध्ये कार्यरत आहेत. दिनेशला एक लहान बहीण आहे आणि त्याची आई एक गृहिणी आहे. त्याच्या वडिलांची इच्छा होती की मुलाने इंजिनीयर बनावे, पण बानाची मेहनत पाहून जाखरने त्याला खेळण्याची संधी दिली. दिनेश बाना भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा एक मोठा चाहता आहे. सचिनला तो स्वतःचा आदर्श मानतो.
विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात दिल्यानंतर आता अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमने सामने असतीस. स्पर्धेचा हा अंतिम सामना ५ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.