भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 मध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडला 100 धावांनी पराभूत करून टीम इंडियाने सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सहा विजेतेपदे जिंकणारा भारत हा एकमेव संघ ठरला आहे, तर ऑस्ट्रेलियाने चार वेळा हा किताब जिंकला आहे.
अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 411 धावा केल्या. ज्यामध्ये वैभव सूर्यवंशीने 80 चेंडूंमध्ये 175 धावांची सनसनाटी खेळी केली. त्याने त्याच्या डावात 15 चौकार आणि 15 षटकार मारले. त्याने अवघ्या 55 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले.
कर्णधार आयुष म्हात्रेने 51 चेंडूंमध्ये 53 धावा करून संघाला मजबूत पाया मिळवून दिला. त्याच्यासोबत अभिज्ञान कुंडूने 31 चेंडूंमध्ये 40 धावा केल्या, तर कनिष्क चौहानने 20 चेंडूंमध्ये नाबाद 37 धावा केल्या. या दमदार फलंदाजीमुळे इंग्लंडसमोर 412 धावांचे मोठे लक्ष्य ठेवण्यात आले.
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जोसेफ मूर्स (17) पाचव्या षटकात बाद झाला. बेन मेयस आणि बीजे डॉकिन्स यांनी काही वेळ संघाला सावरले, परंतु 13व्या षटकात खिलान पटेलने डॉकिन्सला बाद केले. कर्णधार थॉमस रेव (31) कनिष्क चौहानच्या गोलंदाजीवर बाद झाला.
इंग्लंडकडून कॅलेब फॉकनरने सर्वाधिक 115 धावा केल्या. भारताच्या गोलंदाजीमध्ये दीपेश देवेंद्रनने 2 बळी, आर.एस. अंबरीशने 2, कनिष्क चौहानने 2, तर खिलान पटेल आणि आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. अखेरीस, इंग्लंडचा संघ 40.2 षटकांत 311 धावांवर सर्वबाद झाला. वैभव सूर्यवंशीचे स्फोटक शतक आणि आयुषच्या अर्धशतकामुळे भारताला सहावा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा मान मिळाला. अंतिम सामन्यात सर्वच विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून भारताने इतिहास रचला.






