भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचं आयसीसीला स्पष्ट केलं आहे. भारत सरकारनं बीसीसीआयला पाकिस्तानात संघ न पाठवण्याचा सल्ला दिला.
भारताच्या या निर्णयानंतर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित होणार असल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सुरुवातीला यासाठी नकार दिला होता. मात्र भारताच्या भूमिकेनंतर पाकिस्तानसमोर अन्य कोणताही पर्याय नाही. या स्पर्धेच्या हायब्रीड मॉडेलसाठी आता दोन देशांची नावं समोर येत आहेत. स्पर्धेतील भारताचे सामने या देशांमध्ये खेळले जाऊ शकतात.
‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या रिपोर्ट्सनुसार, आयसीसीनं हायब्रीड मॉडेलसाठी यूएई आणि श्रीलंका या दोन देशांची निवड केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने यूएई किंवा श्रीलंकेत खेळले जाऊ शकतात. यूएई या शर्यतीत आघाडीवर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघानं पाकिस्तानात यावं, यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं भरपूर प्रयत्न केले. स्पर्धेतील भारताचे सर्व सामने सीमेजवळील लाहोर शहरात आयोजित करून भारतानं सामना खेळल्यावर मायदेशात परतण्याचा प्रस्ताव पीसीबीनं दिला होता. मात्र भारत सरकारनं हा प्रस्ताव धूडकावून लावला आहे.
यापूर्वी 2022 मध्ये आशिया चषकाचं आयोजन देखील पाकिस्तानात करण्यात आलं होतं. मात्र भारतानं तेव्हाही स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. यानंतर भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्या आले होते. भारतीय संघ स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचला होता. त्यामुळे अंतिम सामना देखील श्रीलंकेत खेळवण्यात आला होता.
2025 चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठीचं वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होणार होतं. मात्र आता भारताच्या नकारानंतर वेळापत्रक जाहीर होण्यात आणखी थोडा विलंब होऊ शकतो, असं बोललं जातंय.
हेही वाचा –
426 धावा….46 चौकार अन् 12 षटकार!! या फलंदाजाच्या वादळी खेळीनं मोडले सर्व रेकॉर्ड
आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी खूपच खराब, लवकरच दाखवला जाईल बाहेरचा रस्ता
भारतीय संघात रिंकू सिंहवर अन्याय होतोय? माजी क्रिकेटपटूचा मोठा सवाल