कोणत्याही खेळात तुम्हाला काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. क्रिकेटचा खेळ हळूहळू जगाच्या कानाकोपऱ्यात पसरत आहे. यंदाच्या टी20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 20 संघ खेळत आहेत. याआधी या स्पर्धेच्या कोणत्याही आवृत्तीत 16 पेक्षा जास्त संघ खेळले नव्हते. यावेळी तीन नवीन संघांनी पदार्पण केलं आहे, ज्यामध्ये आफ्रिकेतील युगांडा या देशाच्या संघाचाही समावेश आहे. युगांडाच्या एका खेळाडूला टी20 विश्वचषक खेळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
‘जुमा मियागी’ असं या खेळाडूचं नाव असून तो वेगवान गोलंदाज आहे. मियागी अवघ्या 21 वर्षांचा आहे. मियागी याला राहण्यासाठी घर नव्हतं. तो झोपडपट्टीत राहत होता. येथून निघून युगांडा क्रिकेट संघात सामील होणं त्याच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. युगांडाची राजधानी कंपालामध्ये सुमारे 60 टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. जुमा मियागी हा देखील या झोपडपट्टीतील एक रहिवासी आहे.
घर तर सोडा, मियागीच्या कॉलनीत पिण्याचं शुद्ध पाणी देखील नव्हतं. याशिवाय परिसरात सांडपाण्याची व्यवस्था नसल्यानं त्याच्या कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलंय. मात्र इतका त्रास असून देखील मियागीची क्रिकेटची आवड अजिबात कमी झाली नाही. जुमा मियागी प्रथम युगांडाकडून अंडर-19 क्रिकेट खेळला. त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये त्यानं युगांडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
जुमा मियागीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
जुमा मियागीनं आतापर्यंत 21 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 20 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्यानं 11.05 च्या उत्कृष्ट सरासरीनं 34 बळी घेतले. या कालावधीत मियागीनं केवळ 5.78 च्या इकॉनॉमीनं धावा खर्च केल्या आहे. 7 धावा देऊन 3 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नामिबियाच्या रुबेन ट्रम्पेलमननं रचला इतिहास! टी20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
टी20 विश्वचषकात 12 वर्षांनंतर सुपर ओव्हरचा थरार! नामिबियाचा ओमानवर रोमहर्षक विजय
चेंडू चुकून लागल्यानंतर गोलंदाजानं बाद केलं नाही, अशी खिलाडूवृत्ती क्रिकेटमध्येच दिसते! पाहा VIDEO