पुणे, 17 ऑगस्ट 2022: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या चौथ्या दिवशी गुजरात जायंट्स संघाने मुंबई खिलाडीज संघावर सलग दुसऱ्यांदा मात करताना सलग तिसऱ्या विजयासह हॅट्रिक नोंदवली. रंगतदार झालेल्या लढतीत रंजन शेट्टीच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंट्स संघाने मुंबई खिलाडीज संघावर १८ गुणांच्या फरकाने विजय मिळवला याआधीच्या सामन्यात त्यांनी २५ गुणांच्या फरकाने पराभूत केले होते.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सामन्यात रंजन शेट्टीने कर्णधाराला साजेसा खेळ करताना आक्रमणात सहा गुणांची नोंद केली. विनायक पोकर्डे आणि निलेश पाटील यांनी अनुक्रमे ८ आणि ७ गुणांची कमाई करताना त्याला उत्कृष्ट साथ दिली. मुंबई खिलाडीज संघाकडून दुर्वेश साळुंखे याने आक्रमणात ११ गुणांची नोंद करताना केलेली झुंज एकाकी ठरली.
रंजन शेट्टीला सामन्यातील बेस्ट अटॅकर हा पुरस्कार नुकत्याच बर्मिंगघम येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत ३००मीटर स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदक विजेत्या अविनाश साबळे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी अविनाश साबळे म्हणाला कि, कोणतीही स्पर्धा खेळण्यापूर्वी याआधीच्या स्पर्धेत मिळवलेला विजय विसरण्याचा प्रयन्त करतो, ज्यामुळे आगामी स्पर्धेत माझे ध्येय मला गाठता येईल. केनियाच्या खेळाडूंनी कधीही असा विचार केला नव्हता कि, पहिल्या तीन स्थानात कोणी आशियाई देशातील खेळाडू मजल मारेल. या स्पर्धेचा फॉरमॅटमुळे या खेळाला एक नवे रूप प्राप्त झाले आहे. तसेच, या स्पर्धेमुळे खो खो खेळाला एक चांगले व्यासपीठ मिळाले असून या खेळाचा प्रसार आणखी वाढण्यात नक्कीच मदत मिळेल, असे मला वाटते.
सामन्यात बेस्ट डिफेंडर पुरस्कार सुयश गरगटे(गुजरात जायंट्स) याने, बेस्ट अटॅकर पुरस्कार रंजन शेट्टी(गुजरात जायंट्स) याने आणि अल्टीमेट खो खो पुरस्कार दुर्वेश साळुंखे(मुंबई खिलाडीज) याने पटकावला.
त्याआधी गुजरात जायंट्स संघाने पावरप्ले मधून सुरुवात करताना अक्षय भांगारे, अभिनंदन पाटील यांचे वझिरात रूपांतर केले. हा निर्णय कमालीचा फायदेशीर ठरला आणि त्यांनी कर्णधार विजय हजारे, रोहन कोरे आणि विसाग एस हि मुंबईची पहिली तुकडी २मिनिटे ७ सेकंदात तंबूत परतवून एकूण १० बचाव पटू टिपताना आपल्या संघाला २५-००अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या बाजूला मुंबई खिलाडीज संघाने सुद्धा पावरप्लेमधून बचावाला प्रारंभ करताना गुजरातची पहिली तुकडी १मिनिट ३० सेकंदात तंबूत परतवली. साळुंखेने या तुकडीतील अखेरचा खेळाडू खांबावरून सूर मारत बाद केला. साळुंखेने चार बचावपटू टिपताना मुंबईकडून एकूण ११ गुणांची कमाई केली. पहिल्या डावाअखेर दोन संघांमध्ये २७-२७ अशी बरोबरी झाली होती. गरगटेने दोन बोनस गुणांसह २मिनिटे ३० सेकंद संरक्षण करताना गुजरातकडून कडवी झुंज दिली.
गुजरात जायंट्स संघाने दुसऱ्या डावात वेगवान आक्रमण करताना एकूण ३७ गुणांची कमाई केली. त्यानंतर मुंबई सर्वोत्तम कामगिरी करूनही त्यांना अखेरच्या सात मिनिटांत केवळ २१ गुण मिळवता आले. त्यामुळे गुजरात जायंट्स संघाला मुंबई खिलाडीज संघावर सलग दुसऱ्या विजयाची नोंद करता आली. गुजरात जायंट्स संघ अद्याप अपराजित आहे.
रात्री उशिरा झालेल्या दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने ओडिशा जुगरनट्स संघाचा 54-49 असा पराभव केला. चुरशीच्या लढतीत गुजरात जायंट्स संघाने ओडिशा जुगरनट्सवर 5गुणांच्या फरकाने संघर्षपूर्ण विजय मिळवला. ओडिशा जुगरनट्सने सुरेख सुरुवात करत पहिल्या डावात सुरुवातीला 23-04 अशी आघाडी घेतली. महेश पी याने पहिल्या सातच मिनिटात गुजरातच्या तीन गडी बाद करून 8 गुणांची कमाई केली व यामध्ये त्याने दोन डाईव्ह मारल्या. त्यानंतर अनिकेत पोटे व जगन्नाथ दास यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले व सामन्यात गुजरातचे आव्हान कायम राखले. पहिल्या डावात पिछाडीवरून जोरदार कमबॅक करत गुजरातने ओडिशा विरुद्ध 26-25 अशी स्थिती निर्माण केली.
ओडिशा जुगरनट्स संघाने दुसऱ्या डावात पहिल्या सातच मिनिटात 24 गुणांची कमाई करत 49-26 ,अशी आघाडी मिळवली. पण गुजरातच्या कर्णधार रंजन शेट्टीने कमालीचा खेळ करत संघाला 49-48 अशी स्थिती निर्माण करून दिली. सामना संपण्यास 90 सेकंद शिल्लक असताना गुजरातच्या रंजन शेट्टीने ओडिशाचा डिफेडरला बाद करून संघाला 54-49 असा सनसनाटी विजय मिळवून दिला.
शुक्रवार, १९ ऑगस्ट रोजी पाहिला सामना राजस्थान वॉरियर्स विरुद्ध ओडिशा जुगरनट्स यांच्यात, तर दुसरा सामना मुंबई खिलाडीज विरुद्ध चेन्नई क्विक गन्स यांच्यात होणार आहे.