पुणे, 26 ऑगस्ट 2022: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू जगन्नाथ दास याने केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर गुजरात जायंट्स संघाने चेन्नई क्विक गन्स संघावर 6 गुणांच्या फरकाने विजय मिळवताना अव्वल स्थानी झेप घेतली. त्याचबरोबर चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्याची त्यांनी परतफेड केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत जगन्नाथ दासने तिसऱ्या सत्रात 3मिनिटे 42 सेकंद संरक्षण करताना गुजरातला 6 बोनस गुण मिळवून दिले. त्याच्या कामगिरीमुळे चेन्नईला तिसऱ्या संत्रा अखेर 42-32 अशी केवळ 10 गुणांची आघाडी घेता आली. त्यानंतर चौथ्या निर्णायक सत्रात दास यानेच चेन्नई चा प्रमुख सरंक्षक महेश शिंदेला अप्रतिम स्काय डाईव्हच्या सहाय्याने बाद करून गुजरातला निर्णयक क्षणी आघाडी मिळवून दिली. गुजरातने हा सामना 50-44 असा जिंकला. दासने आक्रमणात 5 गुण तर सुयश गरगटे 8 गुण मिळवताना गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
त्याआधी गुजरातचा कर्णधार रंजन शेट्टीने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारल्यावर 8 बोनस गुण मिळवले. इतकेच नव्हे तर चेन्नईला पहिल्या सात मिनिटाअखेर 19 गुणांवर रोखले. निलेश जाधव आणि अभिनंदन पाटील यांनी अनुक्रमे 3मिनिटे 6 सेकंद व 3मिनिटे 3सेकंद संरक्षण केले.
दुसऱ्या सत्रात चेन्नईच्या कर्णधार अमित पाटीलने 3मिनिटे 12 सेकंद संरक्षण करताना 4बोनस गुण मिळवले. मात्र गुजरातने चेन्नईचे 18 गडी बाद करताना पहिल्या डावा अखेर 26-23 अशी निसटती पण महत्वपूर्ण आघाडी घेतली.